आपल्याला थलैवाचा अर्धा चेहरा दिसतो…थेटर जणू फेसाळत्या लाटेसारखं उसळलं…

किस्सा खरा खोटा वेंकटेश्वर जाणे…

तेव्हा जयललीता तामिळनाडूच्या पंतप्रधान (तिथं पंतप्रधानच असतात) होत्या आणि त्यांची काहीतरी ठसन होती याच्याबरोबर. तेव्हा याच्या घरापासूनच्या रस्त्यावर वाहनबंदी लावली त्यांनी. आता हा कामाला निघेल की नाही माणूस. पण गाडी काढूच शकत नाही तर कसं व्हायचं?

पर्वा इल्ले… साहेब घरातून निघाले पायी चालत… थोड्या पुढेच जयललीतांचा बंगला होता…

झालं काय तिथ पर्यंत पोहोचेपर्यंत लोकांनी याला रस्त्यावर बघून नुसता हैदोस घातला होता पण शिस्तीत. शेवटी लोकांचा प्राणप्रिय थलैवा ना. हा चालतोय अन मागून वाढत जाणारा जनसमुदाय. जयललीतांच्या बंगल्याजवळ येताच साहेबांनी थोडी विश्रांती घेतली. तिकडेच एखादा जिल्हा होतोय की काय अशी पाळी. जयललीतांना काय ते समजलं. वाहनबंदी तात्काळ निघाली. (या किश्यावर बेतलेला सीन या वर्षीच्या मोहनलालच्या ल्युसिफर मध्ये घेतलाय दिग्दर्शक अभिनेता पृथ्वीनं. मोहनलालची एन्ट्री)

रजनीकांत (थ) …

१९८३ च्या ‘अंधा कानून’ मधन जेव्हा हिंदीमध्ये आला तेव्हाच याची कशी कोण जाणे आमच्या इथं मुंबईत क्रेझ होती. मुंबईचं कॉस्मो कल्चर कारण असावं. पण रजनीकांत हा हिरो मराठी माणूस, शिवाजीराव गायकवाड आहे हे खूप उशिरा पसरलं. त्या आधीच साऊथचा एक टेरिफिक अभिनेता (अंधा कानून मध्ये एका प्रसंगात तो डोळे लालमलाल करून बघतो हा एक पुरावा) आता बॉलिवूड काबीज करायला आलाय ही खबर मात्र वणव्यासारखी पोहोचली होती.

रजनी समहाऊ कमल सारखा क्लासेस मध्ये अडकला नाही. त्याचे गंगवा, जॉन जानी जनार्दन, महागुरू वगैरे हिंदी चित्रपट येतच होते. तामिळ आणि दक्षिणेकडे तर तो मोठा हिरो होताच (बच्चनचा ‘डॉन’ रजनीने ‘बिल्ला’ म्हणून केलता) रजनीकांत म्हणजे मुंबईतल्या बॉलिवूड प्रेक्षकांसाठी नेहमीच आवडता आणि पैसा वसूल हिरो होता. धारावी मधला, माटुंग्यामधला कष्टकरी दक्षिण भारतीय समाज रजनीच्या सिनेमांची आतुरतेने वाट बघत असे आणि त्यात थलैवा जर बच्चन बरोबर असेल तर .. आय्यो रामा.. तो गिरफ़्तार मध्ये पाहुणा कलाकार म्हणून आला तरी तो आणि बच्चन म्हणजे शिव आणि विष्णू… मग बच्चन एकीकडून अन हा दुसरीकडून खलनायकाची पिटाई करणार…

“करण से बचोगे तो हुसेन से पिटोगे, और हुसेन से बचोगे तो करण से पिटोगे.”

असं तत्वतः व्हीलनचं मानसिक खच्चीकरण करणारे संवाद आपल्या सदोष हिंदीत (पर्वा इल्ले) ऐकवत आणि गॉगल दोन हातात झिगझाप् फिरवत डोळ्यावर चढवत, हात कंबरेच्या पातळीवर ठेवत तिथूनच पंजातली सिगरेट साटकन तोंडात रादर दातात फेकणे असे अचाट अभिनयाविष्कार घडवत रजनी लोकांना खुश करायचा. त्याच्या नंतरच्या मुकुल आनंदच्या खून का कर्झ मध्ये त्याची एन्ट्री कचऱ्याच्या ढकलगाडीत आहे, आधी आपल्याला हवेत उंच फेकलेली सिगरेट दिसते मग हा त्या सिगरेटवर हवेत असतानाच गोळी झाडतो, ती पेटते आणि अलगद याच्या ओठात येऊन पडते मग हा झुरका घेतो…

फुल टाळ्या ना !

दक्षिणेत तर प्रचंडच काम केलंय माणसाने. मी हिंदी पुरतं बोलेन जितकं माहीत आहे तितकं, पण एक तमिळ फिल्म बघितली होती.१९९१. माटुंग्याचं अरोरा थिएटर म्हणजे थलैवाचं मंदिर. थलपथीचं भव्य कट आऊट लागलेलं, त्याला किंग्ज सर्कल एवढा हार घातलेला. पिक्चर सुरू होतं. एक आई आपल्या नवजात बाळाला मालगाडीच्या डब्यात रडत रडत ठेवते. सुंदर गाणं आहे. शब्द कळत नाहीत. मग डायरेक्ट फाईट सीन. मणी सरांचं टेकिंग…

पाऊस…बस्ती…लोक तणावाखाली उभेत… मध्ये दोन पुरुष… कॅमेरा एकाच्या मागे खांद्यावरून संथ डावीकडे फिरतो आणि वीज कडाडते…आपल्याला थलैवाचा अर्धा चेहरा दिसतो…थेटर जणू फेसाळत्या लाटेसारखं उसळलं… कुणीतरी मला बखोटीला धरून उभं केलं…

आफ्टर आल थळेवा ऑन स्क्रीन सार, यू हैव टू स्टेण्ड अप डा !

रजनी असा हिस्टेरिया आणतो पब्लिकमध्ये.. अर्थात ते चांगलं वाईट याची समीक्षा नाही करणार पण झोपेचे पाच तास सोडले तर दिवसातले एकोणीस तास हे उद्याच्या जेवणाची, पोराबाळांची चिंता करण्यात आणि आजच्या चुलीची सोय लावण्यात आयुष्य घालवणाऱ्या माणसांना कायच्याकाय स्वप्नरंजन, सुप्रीमसीच्या गुदगुल्या, आवेश आणि उभारी देणारा फेनॉमिना म्हणजे रजनीकांत!

रजनीकांत हा थलैवा बनण्यात त्याच्या चांगुलपणाचा, समाजकार्याचा फार मोठा वाटा आहे.

बऱ्याच आधी पासून टिपिकल दाक्षिणात्य नायकासारखं प्रसिद्धीपासून दूर रहात त्याने प्रचंड प्रमाणात लोकांना मदत केलीय म्हणतात. त्याची आध्यात्मिक बाजू हे अजून एक कुतूहल. त्याचे हिमालयाच्या यात्रेतले फोटो खूप प्रसिद्ध झाले होते..(चित्रपटाबाहेर आपलं टक्कल, आपलं सामान्य दिसणं न लपवणारा प्रांजळ इसम) त्याच्या आध्यात्म्याच्या गोडीची आवड कदाचित त्याच्या लहानपणी रामकृष्ण मठात झालेल्या शिक्षणात असावी. एकदा मित्र कमलहासन (पुरोगामी माणूस) याने गमतीत रजनीला म्हटलं सुद्धा, “काय गरज आहे तुला हिमालयात जायची? लोकं आल्प्सला जायची वाट बघतात.” रजनी हसत म्हणाला, ‘ते तुला नाही कळणार, जे हिमालयात आहे ते आल्प्समध्ये नाही.” असा हा तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी आणि हिंदी (आपली मराठी सुद्धा बरं का) सृष्टीतला सर्वांचा आवडता माणूस आहे हा ते याच्या साधेपणामुळे…

रोबोट च्या वेळेला त्यानेच प्रेसमध्ये सांगितलेला किस्सा,

शूट साठी तो कुठं तरी बेंगलोर का एम पी ला गेला होता तिकडे त्याला एक जुना मारवाडी मित्र भेटला ज्याचा बॉलिवूडचे सिनेमे या पलीकडे काही कल्पना नव्हती, त्याने रजनीकांतला म्हटलं कसं चाललंय वगैरे काही काम मिळतं का या वयात वगैरे विचारलं आणि म्हणाला आता ऐश्वर्या रायचं शूटिंग आहे म्हणे.. नवीन सिनेमा येतोय तिचा… रजनी त्याला हळूच म्हणाला, “अच्छा? हिरो कोण आहे मग?” हा किस्सा सांगून रजनीकांत क्षणभर थांबतो आणि सगळी प्रेस हास्यकल्लोळात बुडते…

हाच साधेपणा कॅमेराच्या समोर मात्र कुठल्या कोपऱ्यात जातो माहीत नाही. जगाच्या पाठीवर, इतिहासात, नकाशात थलैवासारखा स्वॅग, स्टाईल असणारा अभिनेता मला तरी ठाऊक नाही… त्याच्या स्वतःच्या तुलनेत कमी हिट ‘बाबा’ या सिनेमातलं मनीषा कोईराला बरोबरचं ‘बाबा किचू किचुथा’ या गाण्यात त्याने जे काही केलं ते बघून हसून वाट पण लागते आणि ती स्टाईल फक्त तोच करू शकतो याची खात्री सुद्धा पटते…

हल्लीचे त्याचे कबाली आणि काला जरी टिपिकल रजनीपट जरी नसले तरी काळाच्या कसोटीवर नक्कीच उतरतील असे दर्जेदार आहेत…

टिपिकल रजनीपट म्हणजे ज्यात अचाट, अतर्क्य मारामारीचे नवनवोन्मेष असतात जसं की पावलाने मातीत वर्तुळ काढून त्याचे चक्रीवादळ बनवणे, बास्केटबॉलच्या चेंडूने व्हॉलीबॉल खेळणाऱ्या लुक्क्यांना तो चेंडू आपल्या तर्जनीवर सुदर्शन चक्रासारखा फिरवत ठेवून चोपणे…आणि जोडीला तुफान संवाद ज्यात समोरच्याला आपण जन्मच का घेतला याची शंका यावी इतकी इज्जत काढलेली असते…ह ह ह ह कण्णा (बाळा) पणीथा कुटमा वरूम… (डुकरं भरदोल येत्यात) सिंगु…सिंगलाथा वरूम (वाघ येकटा नडतोय)…

शाहरुखच्या रा.वन मध्ये एक शॉट मध्ये चिटी रोबोटला पक्षी थलैवाला आणायचं गिमिक कसंही असलं तरी कपुरांची करीना लगेच डोईवर पदर घेऊन दोन्ही हात गालाला लावून थलैवाला श्रद्धेने नमस्कार करते हा सॉलिड पंच होता. लोकांची भावना जवळपास तशीच आहे.

क्रिकेट मध्ये एक सचिन आणि सिनेमात थलैवा!

या दोन्ही विभूती काही शक्य करू शकतात (हा खासकरून रजनीकांत बद्दलचा समज, डिजिटल सोशल मीडियाला एक वरदानच आहे कन्टेन्ट बनवायला) एक्सट्रिम आणि अशक्य विरुद्ध रजनीकांत अशी जुगलबंदी लावायची आणि मग लोकांच्या डोक्यात काय काय येईल सांगता येत नाही…

अशाच लोकप्रिय कोटीचा आधार घेऊन म्हणतो…

येय… बर्थडेय… हापि रजनीकांत टू यू!

माईंड इट!\

  • गुरूदत्त सोनसुरकर.

#CinemaGully #HappyBirthdayRajnikanth

Leave A Reply

Your email address will not be published.