ऐटीत चालणारी अँबेसिडर पीक अप व्हॅन बनली तेव्हाच कळलं आता पडता काळ सुरु झाला आहे…

पुढारी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट सहज उभी राहते. पांढराशुभ्र झब्बा, तसेच शुभ्र धोतर. डोक्यावर गांधी टोपी आणि अंगात नेहरू जॅकेट. भारतात मंत्री असू दे नाही तर सरपंच प्रत्येकाचा हा गणवेश फिक्स. या सगळ्याला सूट करायला आणखी एका गोष्टीची गरज असायची.

दारात अँबेसिडर गाडी.

या गाडीशिवाय तुम्हाला एखाद मानाचं पद आहे हे कोणाला पटायचंच नाही. भले मर्सिडीज घेण्याची ऐपत असू दे पण तरीही पुढारीपणा करण्यासाठी अँबेसिडर घेऊन फिरणारे महाभाग आजही आपण अनेक ठिकाणी पाहतो.

या गाडीची निर्मिती केली गांधीजींचे सर्वात मोठे भक्त म्हणवल्या जाणाऱ्या घनश्याम दास बिर्ला यांनी.

कलकत्याच्या बिर्ला या सुप्रसिद्ध मारवाडी व्यापारी कुटुंबात जमलेले घनश्यामदास बिर्ला खूप कमी वयातच घरच्या बिझनेसमध्ये आले. ज्यूटचे कारखाने सुरु केले. काही काळातच धंदा डबल चौबल करून ठेवला. पहिल्या महायुद्धात बिर्लानी प्रचंड पैसे छापले. देशभर बिझनेस पसरला.

त्यांनी साधारण १९४२ साली स्थापना केली हिंदुस्थान मोटर्स या कंपनीची.

गुजरातच्या पोर्ट ओखा या बंदराजवळ या कंपनीचा छोटासा कारखाना उभारण्यात आला. बिर्ला यांनी तेव्हा इंग्लंडच्या मॉरिस कंपनीशी करार केला होता. इंग्लंडहून भारतात आयात होणाऱ्या मॉरिस कार ओखा बंदरावर उतरायच्या. त्याच असेम्ब्ली बिर्लांच्या कारखान्यात व्हायची.

भारताला स्वातंत्र्य देखील याच काळात मिळालं. इंग्रज देश सोडून गेले आणि काँग्रेस सत्तेमध्ये आली.

नवे राज्यकर्ते आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक नवे उद्योग सुरु होत होते.

१९५६ साली बिर्लांच्या हिंदुस्थान मोटर्सला गाडीची निर्मिती करायची परवानगी मिळाली. पुढच्या दोनच वर्षात त्यांच्या बंगालच्या कारखान्यातून पहिली हिंदुस्थान अँबेसिडर कार बाहेर पडली.

या अँबेसिडर कारचे पहिले मॉडेल मार्क-१ म्हणून ओळखले जाते. तिथून पुढे एकूण मार्क ७पर्यंत या गाडीचे व्हर्जन आले. पण गंमतीची गोष्ट म्हणजे १९५८ ते २०१४ असे ५६ वर्षे अँबेसिडरचं मेन डिझाईन सेमचं राहिलं.

पण कोणी काहीही म्हणो अँबेसिडर गाडी बनली होतीच भारतासाठी. अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ता कसाही असो अँबेसिडर बिनदिक्कतपणे तिथं जाऊन पोहचायची.१५०० सीसी इंजिन, कमीतकमी मेंटेनन्स, जबरदस्त मायलेज हि तिची वैशिष्ट्ये होती.

बाकीच्या गाडयांना जाहिरात करायला ब्रँड अँबेसिडर लागतात मात्र अँबेसिडर ही अख्ख्या भारताची ब्रँड अँबेसेडर होती.

मंत्र्यापासून मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण अँबेसिडर वापरु लागला. का कुणास ठाऊक अँबेसिडर गाडीकडे बघितलं तर ती गांधी टोपीवाल्या साखरसम्राटासारखी कुर्रेबाज दिसायची.

हिंदुस्थान मोटर्सची सर्वात गाजलेली गाडी अँबेसिडर ठरली. पण पुढच्या काळात मारुती पद्मिनी सारख्या गाड्या येऊ लागल्या. सगळं जग बदलू लागलं. भारत सुद्धा बदलत होता. तेव्हा बिर्लांनी अँबेसिडरमध्येच काही बदल करून एक नवीन गाडी लॉन्च करायचं ठरलं.

हिंदुस्थान पोर्टर

त्याकाळात भारतात टाटा, अशोक लिलॅन्ड वगैरे कंपन्यांचे भले मोठे ट्रक होते पण छोट्या वस्तूंची ने आण करण्यासाठी पीक अप व्हॅन नव्हते. बिर्लांनी हेच मार्केट कॅप्चर करायचं ठरवलं. अँबेसिडरची गांधी टोपी आहे तशी ठेवून मागील भागात काही छोटे मोठे बदल केले आणि त्यांनी पीक गाडी काढली. 

म्हणजे समोरून ती अँबेसिडरच वाटायची पण मागे पीक अप व्हॅन. ज्या काळात अँबेसिडरला मंत्री राजकारण्यांप्रमाणे मान होता त्याकाळात ही गाडी जराही खपली नाही. पोर्टर काढून बिर्लांनी अँबेसिडरचा शान घालवलं अशी चर्चा सुरु झाली.

अखेर हिंदुस्थान मोटर्सने हि गाडी मागे घेतली.  

१९९१ नंतरच्या जागतिकीकरणानंतर सगळं जगच बदललं होतं. परदेशातून मोठमोठ्या स्टाईलिश दिसणाऱ्या सेदान गाड्या येऊ लागल्या.एसी, पॉवर स्टियरिंग, सेंट्रल लॉक, एबीएस वगैरे अत्याधुनिक सुविधा आल्यावर म्हाताऱ्या अँबेसिडरला त्यांच्या बरोबरच वेग पकडणे जमेनासे. तरी सरकारी कार्यालयात हट्टाने अँबेसिडर गाड्या असत होत्या. 

अशातच हिंदुस्थान मोटर्सने शेवटचा प्रयोग म्हणून आपल्या पोर्टर गाडीला नव्या रूपात म्हणजेच हिंदुस्थान वीर या नावाने पुन्हा लॉन्च केलं. आता तर मार्केटमध्ये टाटा एस उर्फ छोटा हत्ती, महिंद्रा पीक अप अशा ढिगाने गाड्या आल्या होत्या. अँबेसिडर जिथे टिकत नव्हती तिथं हि नवी वीर कोणता पराक्रम करणार होती ? 

अखेर २०१४ साली हिंदुस्थान मोटर्सने आपलं कलकत्ता युनिट मधील अँबेसिडर गाडीचे प्रोडक्शन थांबवणार असल्याची घोषणा केली. एक युग संपले.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.