चंद्राबाबूंच्या सासूने प्रतिज्ञा केली, ‘जावई सत्तेत आहे तोवर पतीचे अस्थिविसर्जन होणार नाही’
पेरिले ते उगवते…
आता हे सांगायच कारण म्हणजे,आंध्रप्रदेशच्या विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने तेलुगु देसम पार्टीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू व्यथित झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसढसा रडले. आणि शपथ घेत म्हंटले,
जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही.
असाच एक पण चंद्राबांबूच्या सावत्र सासूने केला होता. तो पण होता जोपर्यंत चंद्राबाबू सत्तेतून पायउतार होत नाही तोपर्यंत आपल्या नवऱ्याच्या अस्थीकलशाच विसर्जन करणार नाही. सासू म्हणजे अम्मा लक्ष्मी पार्वती तर सासरे म्हणजे एन टी रामाराव.
आज सगळे विसरले असतील, कदाचित चंद्राबाबू पण. मात्र भिडू कधी विसरत नाही. तर चंद्राबाबूंना राजकारणात आणलं त्यांच्या सासऱ्यांनी. NT रामा राव यांनी.
कॉंग्रेसी नेत्यांचा होत असणारा अपमान, दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेलगु अस्मिता या मुद्यावर NTR यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना केली. NTR हे तेलगु फिल्म इंडस्ट्रीतले सर्वात नावाजलेले अभिनेते होते, पण जेव्हा त्यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हा मात्र त्यांच फिल्मी करियर संपुष्टात आलं होतं अस सांगितलं जातं. तरिही एखादा जादूई करिष्मा व्हावा तशी आंध्रामध्ये NTR नावाचं वादळ निर्माण झालं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात NTR आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
२९ मार्च १९८२ साली स्थापन झालेला पक्ष १९८३ साली आंध्रप्रदेशच्या फक्त मुख्य राजकिय प्रवाहातच नव्हता तर तो एकट्याच्या हिंमत्तीवर सत्तेत जावून बसला होता. त्यानंतरच्या काळात NTR तीन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झाले.
याच काळात म्हणजे १९८५ साली त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आली ती अम्मा लक्ष्मी पार्वती. लक्ष्मी पार्वती हि लेखक होती. NTR यांच्यावर पुस्तक लिहण्याच्या निमित्ताने त्यांची आणि NTR यांची ओळख झाली.
ओळखीच प्रेमात रुपांतर होण्यास वेळ लागला नाही. NTR हे लपवून ठेवणाऱ्यापैकी नेते नव्हते. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा NTR यांच वय होतं ७० वर्ष आणि लक्ष्मी यांच वय होतं ३८ वर्ष. मात्र या प्रेमात त्यांच वय कधीच आडवं आलं नाही. १९९३ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, NTR यांच्या या निर्णयाचा राग येण्यासारख्या इतर व्यक्तींही त्यांच्या आयुष्यात होत्या. NTR यांना एकूण ७ मुले आणि ३ मुली होत्या. घरातील या सर्वांनाच ७० वर्षांच्या वयात NTR यांनी लग्न करण्याचा निर्णय रुचला नाही. अशात १९९४ सालच्या निवडणुका लागल्या NTR यांच्यासोबत लक्ष्मी यांनी या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. लक्ष्मी यांच्या योगदानामुळेच तेलगु देसम २९४ पैकी २१४ जागा घेवून विजयी झाल्याचं सांगितलं जात.
त्यानंतरच्या काळात NTR यांना अर्धांगवायूचा झटका आला. NTR जागेवर बसून राहू लागेल. पक्षाची संपुर्ण जबाबदारी लक्ष्मी पाहू लागल्या. लोक त्यांना अम्मा म्हणू लागल्या व याचा सर्वात मोठ्ठा त्रास NTR यांची ७ मुले व ३ मुली यांना होवू लागला. NTR यांची पारंपारिक जागा समजल्या जाणाऱ्या तेकाली विधानसभेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. या जागेवरुन कोण उमेदवारी घेणार हा प्रश्न चर्चेत आला. NTR यांच्या जागेवरुन लक्ष्मीच जागा लढवतील अशी शक्यता असताना त्याविरोधात NTR यांचा मुलगा हरिकृष्ण यांनी दावा ठोकला. कौटुबिंक वाद नको म्हणून हि जागा NTR यांनी तिसऱ्याच उमेदवाराला दिली.
या प्रकरणातनंतर मात्र कुटूंबाचा वाद चार भिंतीत राहिला नाही. लक्ष्मी यांची ताकद पक्षाच्या पातळीवर वाढू लागली. NTR यांच्या उतरत्या काळात त्या चोवीस तास त्यांच्यासोबत राहून पक्षासाठी वेळ देत होत्या. आमदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा उल्लेख अम्मा असा केला जावू लागला.
NTR यांचा लक्ष्मी यांना असणारा पाठिंबा पाहून शेवटी त्यांच्या मुलांनी व मुलींनी त्यांच्या विरोधात बंड करण्याच ठरवलं, व या बंडाचा चेहरा होते NTR यांचे जावई चंद्राबाबू नायडू.
चंद्राबाबू नायडू तेव्हा पक्षात सक्रिय होते, ते तेलगु देसम पक्षाचे आमदार होते सोबतच आंध्रप्रदेशच्या सरकारमध्ये सहकार मंत्री देखील होते. या बंडात NTR यांच्या जवळचे लोकच फक्त त्यांच्यासोबत थांबून राहिले. २१४ आमदारांपैकी २०-२५ आमदारच NTR यांच्यासोबत राहील अस सांगितलं जातं. बाकीच्या सर्व आमदारांनी नव्या राजकारणाची दिशा ओळखून निर्णय घेतला.
या घटनेनंतर पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या हाती आला, ज्या पक्षाला NTR यांनी उभे केले त्याच पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आले. NTR यांनी खचून शेवटचा निर्णय घेतला तो म्हणजे त्यांनी सार्वजनिक पातळीवर आपल्या तीन मुलींचा आणि सात मुलांच्या कुटूंबाचा त्याग केला. त्यांच्याबरोबरचे संबध संपुष्टात आल्याच जाहिर केलं. अशाच काळात NTR यांच १८ जानेवारी १९९६ रोजी निधन झालं.
NTR यांना शेवटच्या दिवसात ज्या चंद्राबाबूंमुळे मनस्ताप झाला तेच कारण पुरेस होत अम्मा लक्ष्मीना. त्यांनी ठरवलं जोपर्यंत चंद्राबाबूची मुख्यमंत्री पदाची खुर्ची जात नाही तोपर्यंत अस्थी कलशाच विसर्जन करणार नाही.
त्या अस्थी कलशाच विसर्जन झालं २००४ साली. चंद्राबाबू पायउतार झाल्यावरच. आणि आता तर ते रडले सुद्धा याच खुर्चीच्या पायात.
हे ही वाच भिडू
- हा कलाकार राजकारणात गेला आणि त्याने आंध्र प्रदेश येथील काँग्रेसची सत्ता उलथून लावली
- महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यामुळे संपूर्ण देशात स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या..
- कोरोना लसीच्या मागणीसाठी जगन रेड्डी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांचा एक आवाज बनू पाहताहेत..