हत्ती सांभाळणाऱ्या माहुताचा मुलगा हॉलिवूड मध्ये झळकणारा पहिला भारतीय हिरो ठरला..

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सिनेमे नेहमीच आपली वेगळी छाप सोडतात. गेल्या काही वर्षांपासून हॉलीवूडमध्येही बॉलिवूडची बरीच चर्चा सुरूये. यातली गाणी, ऍक्शन, रोमान्स याचं अख्ख जग मोठं फॅन आहे. आपल्या सिनेमांचं कलेक्शन सगळीकडेचे विक्रम मोडत आहेत.

म्हणूनच काय जगभरातील बॉलिवूड स्टार्सच्या लोकप्रियतेमुळे हॉलीवूडचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांना काम देण्यास सुरुवात केलीये.

अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय, अनिल कपूर, दीपिका पादुकोण, अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी आणि तब्बू यांच्यासह हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार अमेरिकेत जाऊन हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकत आहेत. कित्येक हॉलिवूड स्टार्सही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत.

आज भारतीय सिनेमाचा डंका हॉलिवूडमध्ये देखील वाजतोय, मात्र याची सुरुवात नव्वद वर्षांपूर्वी केली होती 

तो होता साबू दस्तगीर.

साबू हा पहिला भारतीय अभिनेता आहे, ज्याने पहिल्यांदा हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. हॉलीवूडमध्ये ‘एलिफंट बॉय’ या नावाने प्रसिद्ध असलेला साबू हॉलिवूड चित्रपटात पाऊल टाकणारा पहिला भारतीय अभिनेता म्हणूनच नव्हे तर 1960 मध्ये प्रतिष्ठित ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ मध्ये दिसणारा पहिला भारतीय कलाकार देखील होता.

साबू दस्तगीरने 1930-40 च्या दशकात हॉलिवूड (अमेरिकन आणि ब्रिटिश) चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळविली. साबूने वयाच्या 13 व्या वर्षीवर्षी पहिल्यांदा हॉलिवूड चित्रपटांमध्ये डेब्यू केला. 1934 मध्ये एलिफंट बॉय’ चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात भारतात आलेले अमेरिकन चित्रपट निर्माते रॉबर्ट जे. फ्लेहर्टी आणि त्यांची पत्नी फ्रान्सिस फ्लेहर्टी त्याचा शोध लावला होता.

साबू दस्तगीरचा जन्म 27 जानेवारी 1924 रोजी करापूर, म्हैसूरमध्ये झाला. त्याचे वडील म्हैसूरच्या महाराजासाठी माहूत म्हणून काम करायचे.

लहान वयातच वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर साबूने बराच वेळ हत्तीच्या तसोबतच घालवले. या दरम्यान, चित्रपट निर्माते रॉबर्ट जे. फ्लेहर्टीने त्याच्या ‘एलिफंट बॉय’ या चित्रपटाच्या हिरोच्या शोधात म्हैसूरला आले तिथे त्यांना साबू सापडला. त्यांनी त्याला माहुतची मुख्य भूमिकेत दिली.

हा चित्रपट प्रख्यात लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘Toomai of the Elephants’ या शॉर्ट स्टोरीवर आधारित होता. त्याची कथा हत्तींसोबत आयुष्य घालवणाऱ्या तरूण माहुताबद्दल होती.

एलिफंट बॉय हा सिनेमा अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर प्रचंड सुपरहिट ठरला आणि साबू एका रात्रीत स्टार बनला. या चित्रपटात समीक्षकांनी साबूच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. यानंतर, साबूने हॉलिवूड आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

यावेळी त्याने ‘द ड्रम (1938), थीफ़ ऑफ़ बगदाद (1940), जंगल बुक (1942), अरेबियन नाइट्स (1942), कोबरा वुमन (1944), सॉन्ग ऑफ़ इंडिया (1949) अशा बर्‍याच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय त्याने इतरही अनेक चित्रपट केले.

मात्र हे सगळं सुरु असताना एकही बॉलिवूडचा चित्रपट केला नाही

साबूने कोणत्याही हिंदी चित्रपटात भूमिका केली नाही आणि त्याला बहुतेक लोकप्रियता फक्त हॉलिवूड चित्रपटांमध्येच मिळाली. या काळात हॉलिवूडमध्ये त्याला इतके प्रेम मिळाले की तो तिथे कायमचाच राहिला. 1938 च्या ‘द ड्रम’ चित्रपटात त्याने ‘प्रिन्स अजीम’ ची भूमिका साकारली, ज्याची भारतात चांगलीच प्रशंसा झाली.

‘मदर इंडिया’मध्ये मुख्य भूमिका साकारण्यास दिला नकार

1957 मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मेहबूब खान यांनी ‘मदर इंडिया’ या क्लासिक चित्रपटात साबूला मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली, पण साबूने नकार दिला. नंतर ते पात्र अभिनेता सुनील दत्तने साकारले होते. या चित्रपटाला नकार देण्यामागील कारण म्हणजे साबू त्यावेळी अमेरिकन नागरिक झाला होता आणि त्याला भारतात वर्क परमिट मिळू शकले नाही.

हीरोपासून बनला ‘वॉर हिरो’

साबू फक्त एक ‘हिरो’ नाही तर ‘वॉर हिरो’ देखील होता. 1944 मध्ये अमेरिकन नागरिक झाल्यानंतर ते दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन हवाई दलात रुजू झाला. यावेळी त्याने ‘बी -24 एअरक्राफ्ट’ मध्ये टेल गनर आणि बॉल टूरेंट गनर म्हणून काम केले.

साबूच्या या सेवेसाठी त्यांना ‘स्पेशल फ्लाइंग क्रॉस’ आणि इतर लष्करी पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

2 डिसेंबर, 1963 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने साबूचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. साबूने अमेरिकन अभिनेत्री मर्लिन कूपरशी लग्न केले होते, त्यांना 2 मुले आहेत. साबूचा अखेरचा चित्रपट ‘ए टायगर वॉक्स’ होता, ज्यात त्याने भारतीय पशु प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती, जो त्याच्या मृत्यूच्या 3 महिन्यांनंतर मार्च 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. योगेश says

    डॉ. श्रीकांत मुंदर्गी यांच्या ‘मधुबाला’ या पुस्तकात साबूवर एक प्रकरण आहे. त्या मधील माहिती नुसार साबूला हॉलीवूड मध्ये पाठवायला त्याचे वडील तयार नव्हते. म्हणजेच हॉलीवूडला भावा सोबत गेला तेव्हा वडील जिवंत होते. मदर इंडिया बाबत माहिती चुकीची वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.