वाजपेयींनी पुढाकार घेतल्यामुळे मोदींच्या मोढ घांची समाजाला ओबीसीचा हक्क मिळाला

महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. फक्त राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत असतो. आपल्या भारतात निम्म्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची असल्यानं हा मुद्दा चर्चेत असणं साहजिकच आहे.

एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येण्यामागचं कारण होतं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण. निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या एका भाषणात त्यांनी आपल्या जातीचा उल्लेख केला होता. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर देताना, ते म्हणाले होते…

‘हां, ये सही है कि मैं नीच जाति में पैदा हुआ हूं, पर मेरा सपना है एक भारत, श्रेष्ठ भारत. आप लोग मुझे चाहे जितनी गालियां दो, मोदी को फांसी पर चढ़ा दो, लेकिन मेरे नीची जाति के भाइयों का अपमान मत कीजिए.’

मोदी हे गुजरातच्या मोढ घांची जातीचे आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या जातीचा आणि आपण ओबीसी समुदायातले असल्याचा उल्लेख केला आहे. या मोढ घांची जातीला आरक्षण कसं मिळालं याची गोष्ट मात्र रंजक आहे.

सगळ्यात आधी जाणून घेऊ मोढ घांची समुदायाबद्दल-

गुजरातच्या वडनगरमध्ये मोढेश्वरी देवीचं मंदिर आहे. अनेक पिढ्यांपासून नरेंद्र मोदी यांचं कुटुंब याच गावात राहायचं. त्यांचा जन्मही इथेच झाला. मोढेश्वरी देवीचे उपासक मोढ म्हणून ओळखले जाऊ लागले. जे लोक तेल काढण्याच्या पारंपारिक व्यवसायात होते, ते मोढ घांची म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे तेल काढण्यासाठी कारखाने उभे राहिले, तेव्हा या लोकांनी किराणा मालाची दुकानं सुरू केली. त्यामुळं त्यांना मोदी म्हणून ओळख मिळाली.

विशेष म्हणजे, मोढ घांची समुदाय जसा हिंदूंमध्ये आहे, तसाच मुस्लिमांमध्येही. मुस्लिम मोढ घांची समुदायाला आरक्षण मिळालं होतं. मात्र हिंदू समुदाय मात्र ओबीसीमध्ये येत नव्हता. त्यामुळं हिंदू मोढ घांची समाजाकडून सातत्यानं आरक्षणाची मागणी केली जात होती.

तत्कालीन मुख्यमंत्री बाबुभाई पटेल यांच्या सरकारनं न्यायधीश बक्षी आयोगाची स्थापना केली. त्यांनी १९७८ मध्ये बक्षी आयोगानं ८२ जातींचा मागास समुदायात समावेश करण्याची शिफारस केली होती. पुढे छबिलदास मेहता यांच्या कार्यकाळात १९९४ मध्ये मोड घांची सह ३८ जातींचा मागास समुदायात समावेश झाला.

थेट जाऊयात दशकाच्या शेवटी…

तेव्हा गुजरातमध्ये केशूभाई पटेल यांच्या नेतृत्वातलं सरकार होतं. भाजपचे संघटन सचिव असणाऱ्या नरेंद्र मोदींना राज्याच्या राजकारणात मोठं पद मिळण्याची चर्चा होती. पण तिथपर्यंतचा रस्ता फारसा सोपा नव्हता. अशी चर्चा होती, की ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊन मोदी मातब्बर केशूभाई पटेल यांना शह देतील.

या चर्चांना पूरक घटना त्यावेळी घडल्या. गुजरात सरकारमधले तत्कालीन मंत्री, भारत बारोट यांच्या द्वारे मोढ घांची जातीचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मागवण्यात आला.

त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातलं सरकार होतं. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या महिनाभर आधी केंद्राकडून मोढ घांची जातीचा ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत आदेश दिले. पुढे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांची राजकीय घौडदौड सुरू झाली.

मोढ घांची समाजाला आरक्षण मिळाल्यानं गुजरातमध्ये भाजपच्या मतदारांमध्ये वाढ झाली. अजूनही गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भारत बरोट यांनी मोक्याच्या क्षणी दिलेला प्रस्ताव आणि वाजपेयींनी त्यावर उमटवलेली मोहोर मोदींसाठी गेम चेंजिंग ठरली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.