एका सभेला परवानगी नाकारण्यावरुन सुरु झालेल्या वादाचा शेवट भाजपच्या स्थापनेनं झाला…

भारतीय जनता पक्ष. सलग दुसऱ्यांदा सत्तेत येऊ शकलेला काँग्रेस नंतरचा दुसरा पक्ष. सध्या या पक्षाचा वारू चौफेर आहे. केंद्रात स्वतःचे ३०० पेक्षा जास्त खासदार, सलग दुसऱ्यांदा देशावर सत्ता, सोबतच १० हुन अधिक राज्यात आपले मुख्यमंत्री असा संपूर्ण देशभरात पसारा. एकेकाळी अवघ्या २ खासदारांवरून सुरुवात केलेल्या भाजपचा इथपर्यंतचा प्रवास मात्र मोठा रंजक राहिला आहे.

आणि त्याहून रंजक आहे त्यांच्या स्थापनेचा इतिहास…

या पक्षाच्या स्थापनेसाठी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा कारणीभूत ठरला होता हे आपण सगळेच जाणतो, मात्र त्याच्या ही आधीच जनता पक्ष आणि जनसंघाच्या नेत्यांमध्ये एका वादाला सुरुवात झाली होती. त्याच कारण ठरलं होतं ती एक सभा. याच सभेला परवानगी देण्यावरून सुरु झालेला वाद शमला तो भाजपाची स्थापना होऊनच.

गोष्ट आहे १९७८ सालची. केंद्रात पहिलं बिगर काँग्रेसी जनता पक्षाचं सरकार होतं. जनता पक्षाचा म्हणजे समाजवादी, जनसंघ, स्वतंत्र पक्ष आणि जुने काँग्रेसी यांनी  स्थापन केलेला पक्ष. याच पक्षाचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई. त्यांच्या सरकारमध्ये जवळपास सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला होता.

यात समाजवादी गटातून येणारे राजनारायण आरोग्यमंत्री होते, तर जनसंघाच्या गटाचे अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. जनसंघाचेच आणखी एक नेते शांता कुमार हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी होते. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत गुण्यागोविंदाने असा कारभार सुरु होता.

अशा या सरकारमध्ये पहिला खडा पडला जून १९७८ मध्ये. त्यावेळी आरोग्यमंत्री असलेल्या राजनारायण यांना हिमाचल प्रदेशमधील शिमलाच्या रिज मैदानात युवा जनताची एक सभा घ्यायची होती. त्याच्या काही दिवस आधीच इथं अटलबिहारी वाजपेयींची देखील सभा झाली होती. पण तरीही शांत कुमार यांच्या सरकारनं राज नारायण यांच्या सभेला परवानगी नाकारली.

साहजिकच त्यामुळे त्यांच्या अहंकार काहीसा दुखावला गेला.

राज नारायण म्हणजे देशातील एकेकाळचा समाजवादी नेत्यांच्या यादीमधील मोठं नाव. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले अशी त्यांची दुसरी ओळख. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे आणीबाणी लागू झाली. आणि दुसरे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीमध्ये १९७७ साली. ते ही थोडक्या नाही तर तब्बल ५५ हजार मतांनी.

अशा या मोठ्या नेत्याच्या आणि केंद्रीय मंत्र्याच्या सभेला नकार मिळेल अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. पण तो मिळाला. यावरून दोघांच्यात चांगलंच बिनसलं. या सगळ्या नंतर देखील २५ जून १९७८ रोजी राजनारायण यांनी आपली नियोजीत सभा घेतलीच. या सभेनंतर जनता पक्षातील समाजवादी आणि जनसंघाच्या नेत्यांमध्ये मतभेद सुरु झाले. ते इतके टोकाला गेले की जनसंघानं मोरारजींच्या कानावर ही गोष्ट घातली गेली.

याचा परिणाम चार दिवसांमध्येच दिसून आला. २९ जून रोजी राजनारायण यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून गच्छंती झाली.

रिज मैदान आणि राजनारायण यांना हटवण्यापासून सुरु झालेला वाद शमण्याची चिन्ह नव्हती.

अशातच एक दिवस जेष्ठ नेते मधू लिमये यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पक्षात मागणी केली कि पक्षाचा कोणताही सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेशी संबंध ठेऊ शकत नाही. जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दुहेरी सदस्यत्व ठेऊ शकत नाही. त्यांच्या या मागणीला पंतप्रधान मोरारजी देसाई, पक्षाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वांमुळे असमाधानी असलेल्या नेत्यांचं देखील समर्थन मिळालं.

राज नारायण आणि त्यांच्या समर्थकांना लिमयेंच्या या मागणीमुळे आयत कोलीतच मिळालं, त्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. सोबतच मोरारजी देसाईंना पंतप्रधान पदावरून हटवून चरणसिंगांना पंतप्रधान बनवण्याची मोहीम हाती घेतली. परिणामी मोरारजी देसाईंनी पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत १५० खासदारांनी केलेल्या मागणीच्या आधारे राजनारायण यांना २ एप्रिल १९७९ रोजी पक्षातून देखील काढून टाकलं.

त्यानंतर जुलै १९७९ येईपर्यंत जनता पक्ष वाऱ्याच्या वेगाने विखरूला. हा वेग इतका होता की, बहुमतात सत्तेत असणाऱ्या पक्षाला १९८० च्या निवडणूकांमध्ये अवघ्या ३१ जागा मिळाल्या. इंदिरा गांधींनी अवघ्या साडेतीन वर्षात सत्तेत कमबॅक केलं.

त्यानंतर जनसंघाच्या नेत्यांना बळीचा बकरा बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली, समाजवादी विचारांच्या नेत्यांना आणि त्यात देखील मधू लिमये यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पटत नव्हती. ते संघाला उद्देशून अनेकदा म्हणायचे,

” उनके दिमाग का किवाड़ बंद है. उसमें कोई नया विचार पनप नहीं सकता. बल्कि  RSS की यह विशेषता रही है कि वह बचपन में ही लोगों को एक खास दिशा में मोड़ देता है. पहला काम वे यही करते हैं कि बच्चों और नौजवानों की विचार प्रक्रिया को ‘फ्रीज़’ कर देते हैं. उन्हें जड़ बना देते हैं. जिसके बाद कोई नया विचार वे ग्रहण ही नहीं कर पाते”

दुहेरी सदस्यत्वाचा वादाने चांगलाच जोर पकडला होता. .

२५ फेब्रुवारी १९८० रोजी जगजीवनराम यांनी पक्षाध्यक्ष चंद्रशेखर यांना दुहेरी सदस्यत्वाचा मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे हे आता फिक्स झालं होत कि जनसंघातून आलेल्या नेत्यांचं जनता पक्षात राहणं अवघड आहे. पुढे ४ एप्रिल १९८० रोजी जनसंघातील अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, सुंदरसिंग भंडारी यांच्यासारखे अनेक दिग्गज जनता पक्षापासून वेगळे झाले.

५ एप्रिल १९८० रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर एक बैठक झाली, यात अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी, सिकंदर बख्त, राम जेठमलानी, शांती भूषण असे सगळे जण उपस्थित होते तर अध्यक्षपदी होत्या राजमाता विजयाराजे सिंधिया. या आगामी पक्षाला साहजिकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद मिळाला होता.

दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल १९८० रोजी नव्या पक्षाची घोषणा झाली, नाव ठेवलं भारतीय जनता पक्ष.

अटल बिहारी वाजपेयी यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर विजयराजे सिंधिया आणि राम जेठमलानी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. लालकृष्ण आडवाणी, सिकंदर बख्त आणि सूरज भान यांना महासचिव बनवलं गेलं, त्यादिवशी संध्यकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुत्व नाकारत गांधी समाजवादाच्या स्थापनेला आपल्या पक्षाचा मुख्य अजेंडा म्हणून घोषित केलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.