कॉंग्रेसला हात आणि भाजपला कमळ कसं मिळालं?

शेक्सपियर म्हणून गेलाय नावात काय आहे? जर भारतात निवडणुकीवेळी आला असता तर त्याला कळाल असत की नावात लई काय काय आहे. अहो आमच्या इथ अगदी पुराण काळापासून निवडणुकीला उमेदवार एक स्ट्रॅटेजी हमखास वापरतात. ती म्हणजे आपल्या विरोधी उमेदवाराच्या सेम नावाचा डमी उमेदवार उभा करणे. अशावेळी मतदारांना एकच सहारा असतो तो निवडणूकचिन्हाचा !!

आपल्या पैकी अनेकांना आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची नावे माहित नसतात. माहित असली तरी सध्या त्याचा मुक्काम कोणत्या पक्षात आहे हे कन्फ्युजन असते. उमेदवारांची आयडीयोलॉजी किती का बदलेना मतदारांनी आपली आयडीयोलॉजी ठरवलेली असते. आणि  ज्या मतदारांना आयडीयोलॉजीशी काही देणे घेणे नाही त्यांना दारू आणि पैसे पोच झाल्लेले असतात आणि त्याला सांगितलेलं असत की कुठल्या चिन्हापुढे शिक्का मारायचा. आधी शिक्का असायचा आता बटन दाबतो.

यामुळेच भारतात लढाईतल्या मुख्य हत्यारां इतकं महत्वाच स्थान या निवडणूक चिन्हाला आहे. तर चला मग जाणून घेऊ भारतातल्या मुख्य दोन पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास.

कॉंग्रेस. 

१९५२ ला स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली. सगळ्यांना वाटलं कॉंग्रेस आपल्या चरखा चिन्हावर निवडणूक लढवेल. स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्या आंदोलनामुळे चरखा घराघरात पोहचला होता. याचा फायदा नेहरू नक्की उचलतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण त्यांनी आपल्या पक्षाचं चिन्ह बैलजोडी निवडली.

या आधी त्यांनी बैलजोडी आणि नांगर हे चिन्ह मागितलेल होत पण नांगर या चिन्हावरून वाद झाला आणि अखेर कॉंग्रेसने आपल्या पारंपारिक शेतकरी मतदाराला कनेक्ट करण्यासाठी बैलजोडी निवडली. तिथून पुढे जवळपास वीसवर्ष कॉंग्रेसने याच चिन्हावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या.

साधारण १९६६ मध्ये स्वर्गीय नेहरूंची पॉप्युलॅरीटी कॅश करून निवडणूक जिंकावी म्हणून त्यांच्या गुंगी गुडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोरीला म्हणजेच इंदिरा गांधीना कॉंग्रेस श्रेष्ठीनी पंतप्रधान बनलं. पण काहीच वर्षात त्यांच आणि कॉंग्रेस श्रेष्ठींशी बिनसलं. इंदिराजींनी स्वतःचा कॉंग्रेस पक्ष स्थापन केला त्याच नाव कॉंग्रेस (आर).

निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षामध्ये चिन्हावरून वाद झाले. अखेर जुन्या कॉंग्रेसला बैलजोडी हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली तर इंदिरा गांधीनी आपले चिन्ह म्हणून वासराला दुध पाजणारी गाय निवडली. अतिशय विचार करून निवडलेल हे चिन्ह होतं. आपलीच कॉंग्रेस खरी हे पटवण्यात इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या आणि चिन्ह बदलूनही त्यांनी १९७१च्या निवडणुकीत भरघोस यश मिळवले.

१९७७च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली इथून पडल्या. कॉंग्रेसमध्ये परत फुट पडली. इंदिरा गांधी यांच्या पक्षाला आय कॉंग्रेसं म्हणून ओळखले जाऊ लागले. असं म्हणतात पराभवामुळे हताश झालेल्या इंदिरा गांधी अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी शंकराचार्य चन्द्रशेखर swami यांच्या जवळ पोहचल्या. त्यावेळी मौनात असणाऱ्या स्वामींनी त्यांना आशीर्वादासाठी हात वर केला. इंदिरा गांधीना हा आशीर्वादाचा हात कायमचा लक्षात राहिला.

याच काळात आंध्रप्रदेश वगैरे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने आय कॉंग्रेसला गायवासरू च्या ऐवजी आपले नवीन चिन्ह निवडण्यास सांगितले. त्यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ मंत्री बुटासिंग यांनी आंध्रमध्ये प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या इंदिरा गांधीना फोन केला. त्यांनी सांगितलं आयोगाने कॉंग्रेसला हत्ती, सायकल आणि हात या पैकी एक चिन्ह निवडण्यास सांगितलं आहे.

इंदिरा गांधीनी आपल्या राजरतन्म या सहकारयाच्या सल्ल्याने हात हे चिन्ह निवडले. त्यांनी तसं बुटासिंगना फोन वर सांगितलं. पण लाईन मध्ये गडबड असल्यामुळे बुटासिंगन वाटलं हत्ती. ते फोन वर हाथी हाथी असं म्हणू लागले. इंदिराजींना कळेना की आता याला कसे समजावू. तेव्हा शेजारी असणाऱ्या पीव्ही नरसिंहराव यांनी फोन घेतला आणि बुटासिंगन स्पष्ट शब्दात सांगितलं,

“हमारा चिन्ह होगा हात का पंजा !!”

बुटासिंग यांच्या गडबडीमुळे कॉंग्रेसचे चिन्ह हत्ती झाले असते. पण नरसिंहराव यांच्यामुळे कॉंग्रेसला हात मिळाला.  याच चिन्हाच्या जोरावर कॉंग्रेसने आणि इंदिरा गांधीनी राजकारणात जोरदार कमबॅक केले. तेव्हा पासून आजपर्यंत कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा हेच आहे.

भाजपा-

सध्या भारतीय जनता पार्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाचे मूळ नाव जनसंघ. स्वातंत्र्यापूर्वी स्वतःला राजकारणपासून दूर ठेवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षाची आवश्यकता जाणवली. यासाठीच त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

१९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे चिन्ह होते पणतीचा दिवा. आपल्या जुन्या परंपराशी व हिंदुत्वाशी असलेलं नात दर्शवण्यासाठी जनसंघाने हे चिन्ह निवडले होते. पुढे अनेक वर्ष जनसंघाने याच चिन्हावर निवडणुका लढवल्या. कित्येक वर्ष त्यांचे हाताच्या बोटावर निवडून येतील एवढेच खासदार लोकसभेत जात होते.

१९६७ मध्ये त्यांचे ३५ खासदार जिंकले. हळूहळू त्यांना जनाधार मिळू लागला होता. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणी विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी एकसाथ इंदिराजींच्या हुकुमशाही विरुद्ध लढा द्यायचं ठरवलं. जयप्रकाश नारायण यांच्या जनता पार्टीच्या छत्राखाली सगळे विरोधी पक्ष विलीन करण्यात आले. यात जनसंघ देखील होता.

१९७७च्या निवडणुका या जनता पार्टीने नांगर धारी शेतकरी या चिन्हावर लढल्या. इंदिरा गांधीचा न भूतो न भविष्यती असा पराभव केला. पण काहीच वर्षात या अनेक विचारधारा एकत्र आलेलं कडबोळीवाल जनता सरकारमधल्या कुरबुरी सुरु झाल्या. पक्ष फुटला.

१९८० साली वाजपेयी, अडवाणी या जनसंघच्या नेत्यांनी पक्षाचं नव्याने पुनरुज्जीवन करायचं ठरवल. या नव्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष असं ठेवण्यात आलं. या भाजपाचं निवडणूक चिन्ह होत कमळ. 

कमळ हेच चिन्ह का निवडल या बद्दलच्या अनेक कथा आहेत. काही जण म्हणतात की १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातल्या वीरांनी एकमेकांना संदेश पोहचवण्यासाठी चपाती आणि कमळाचे बीज हे चिन्ह वापरल होत. इतिहासाशी नाते जपण्यासाठी भाजपा नेत्यांनी आपले चिन्ह कमळ हे निवडले. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल देखील आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.