वर्षा बंगल्याचा कायापालट झाला, ज्याचं श्रेय बॅरिस्टर अंतुलेंना जातं

वर्षा बंगला, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान. राज्यात नवे मुख्यमंत्री निवडून आले की, ते वर्षावर कधी शिफ्ट होणार यांच्या चर्चा हमखास रंगतात. खरंतर या बंगल्याचं नाव काही सुरुवातीपासूनच वर्ष नव्हतं. इंग्रजांच्या कळतंय उभा राहिलेला हा बंगला, डग बिगन या नावानं प्रसिद्ध होता.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे वर्षामध्ये राहायला नव्हते. त्यातच मुख्यमंत्र्यांसाठी नियोजित असलेल्या शासकीय निवासस्थानात कन्नमवार यांचं निधन झालं. वसंतराव नाईक यांनी त्यामुळे दुसऱ्या निवासस्थानाची निवड करण्याचं ठरवलं आणि त्यांनी डग बिगन हा बंगला निवडला. या बंगल्यात घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे असं वसंतरावांचं म्हणणं होतं. ते या बंगल्यात स्थायिक झाले आणि तिथून पुढे वर्षा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे समीकरण नक्की झालं.

या वर्षा बंगल्यात राहिलेले आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात फेमस झालेले मुख्यमंत्री म्हणजे बॅरिस्टर ए. आर. अंतुले. 

अंतुले यांचा राजकीय प्रवास संघर्षाचा होता. स्वातंत्र्यलढ्याच्या वातावरणात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेही वयाच्या १९ व्या वर्षी. त्यांनी गावात वेगवेगळी कामं करुन आपल्या राजकीय भविष्याची पायाभरणी केली. त्यानंतर, ते इंग्लंडला वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले. तिथंही त्यांनी आपलं चळवळीचं काम सोडलं नाही. गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान असलेल्या पुस्तकाविरोधात त्यांनी आंदोलन उभं केलं.

देशाच्या बाहेर राहूनही त्यांनी राजकीय वजन असं तयार केलं, की त्यांची तरुण वयातच काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीवर निवड झाली. ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही झाले. सलग दोनवेळा विधानसभेत निवडून गेल्यावर त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. राज्यसभेत निवडून गेल्यावर, त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बनवायला सुरुवात केली. आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली, मात्र अंतुलेंनी आपली निष्ठा कायम ठेवली.

याच निष्ठेचं फळ म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. अंतुलेंनी घेतलेले धाडसी निर्णय, त्यांच्या कामाचा धडाका, घोटाळ्याचे आरोप आणि पदावरुन झालेली उचलबांगडी या सगळ्यासोबतच अंतुले आणखी एका गोष्टीमुळे ते लक्षात राहतात, ते म्हणजे वर्षा बंगला.

वर्षा बंगला हा एकमजली होता, तिथून थोड्याच अंतरावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय होतं. अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या बैठका वर्षावरच व्हायच्या. जागा कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना पाहुण्यांसमोर ये-जा करणं अवघड व्हायचं. त्यामुळे अंतुले यांनी वरच्या मजल्यावर दोन बेडरुम्स बांधून घेतल्या.

पण तरीही एक समस्या होतीच.

वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री आपल्या कार्यालयाकडे निघाले, की वेगवेगळे प्रश्न घेऊन आलेली जनता त्यांना गाठायची. त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यात, निवेदनं स्विकारण्यात मुख्यमंत्र्यांचा बराच वेळ जायचा. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असलेलं कार्यालय गाठायला मुख्यमंत्र्यांना बराच वेळ लागायचा. ही समस्या सोडवण्यासाठी अंतुले यांनी एक आच्छादित मार्ग उभारला. ज्यामुळे गर्दीला टाळून कार्यालय गाठणं मुख्यमंत्र्यांना शक्य होऊ लागलं.

 

थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाईल असा भुयारी मार्ग उभारण्याचंही अंतुले यांचं स्वप्न होतं, मात्र ते पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि भुयारी मार्गाचं काम प्रत्यक्षात उतरलं नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.