मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..

नव्वदच्या दशकातली गोष्ट. मायानगरी मुंबईमध्ये जागा सोन्याच्या किंमतीने विकल्या जात होत्या. गगनचुंबी टॉवर्स उभे राहत होते. मूळचा मराठी माणूस शहराच्या बाहेर फेकला जात होता. बिल्डर्स खोऱ्याने पैसे कमवत होते. या पैशांचा वास लागून मुंबईची अंडरवर्ल्ड गॅंग देखील यात उतरली.

मुंबईचे अंडरवर्ल्ड तेव्हा ऐनभरात होते. स्मगलिंगचा उद्योग मागे पडला होता. बाकीच्या काळया धंद्याबरोबर बॉलिवूड पासून ते बिल्डर्स पर्यंत खंडणी गोळा करणे ही पैसे कमवण्याची सोपी टेक्निक त्यांना सापडली होती. त्यांचे लागेबांधे थेट राजकारण्यांशी जोडले गेले होते. त्यामुळेच पोलिसांची कारवाई होत नव्हती.

त्याकाळात मुंबईचा सर्वात मोठा डॉन होता दाऊद इब्राहिम. एका पोलीस हवालदाराचा मुलगा मात्र वाईट संगतीला लागून खिसे कापू झाला तिथून बिघडत बिघडत थेट सराईत गुंड बनला. किरकोळ मारहाण करण्यापासून ते थेट अपहरण, स्मगलिंग, हत्या करणारा सर्वात मोठा डॉन बनला.

त्याच्या माफिया गँगला डी कंपनी म्हणून ओळखलं जायचं. 

याच डी कंपनीमध्ये त्याचा एक साथीदार होता. नाव सलीम तलवार. डोंगरी भागात हातात तलवार घेऊन गुंडगिरी करत असल्यामुळे त्याला हे नाव पडलं होतं. दाऊदच्या नावावर त्याची बरीच दादागिरी चालायची. त्या भागात त्याने अनेक ठिकाणी अवैध बांधकामे बांधली होती. इतरांच्या जागा बळकावणे न दिल्यास मारहाण करणे अशा गोष्टी तो करायचा. तिथल्या आमदाराचा देखील त्याच्यावर वरदहस्त होता. त्यामुळे कोणी पोलीस कम्प्लेंट लिहून घ्यायचे नाहीत.

सलीमच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने अवैध बांधकामाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याची फिर्याद दाखल केली. तर तिच्या नवऱ्याला सलीम तलवार आणि त्याच्या साथीदारांनी मारलं. पोलीस सुद्धा काही करत नाहीत हे कळल्यावर तिला कोणी तरी मुंबई महानगरपालिकेत जायला सांगितलं.

तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेत अतिक्रमण हटवण्याच्या विभागाला पहिल्यांदाच एक स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आला होता. त्याच नाव होतं,

गो.रा.खैरनार 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी लढा देणारा अधिकारी म्हणून खैरनार याना ओळखलं जायचं. डोंगरी भागातली ती महिला सलीम तलवार विरुद्ध आपली कम्प्लेंट घेऊन त्यांच्याकडे आली. तलवारीने पाच मजली इमारत उभी करून शेजाऱ्यांच्या खिडक्या कायमच्या बंद करून टाकल्या होत्या. त्याच्या घरात एके ४७ एके ५७ चा साठा देखील लपवलेला आहे हि माहिती खैरनार यांना देण्यात आली.

तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त सामरा यांच्यामदतीने खैरनार यांनी पोलीस संरक्षण घेतले आणि ऑक्टोबर १९९२ मध्ये आपल्या तोडफोडीस सुरवात केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात दाऊदच्या खास माणसाचं अतिक्रमण पाडलं जात होतं. दाऊद पासून टायगर मेमन पर्यंत अनेकांनी प्रयत्न केले पण कोणालाही ते थांबवता येत नव्हतं. 

ते मुंबईच्या कुप्रसिद्ध दंगलीचे दिवस होते. बाबरी पडल्यानंतर दोन्ही समाजातील तेढ वाढीस लागली आणि सर्वत्र जाळपोळ खूनखराबा सुरु झाला. पोलिसांना इतर ड्युटी असल्यामुळे अतिक्रमण विभागाचे संरक्षण कमी झाले. अशातच सलीम तलवारने खैरनार यांची टीम आपलं घर पाडत असताना मुद्दामहून धार्मिक अपमान करत अशी बोंब ठोकली. पडलेल्या बांधकामात फाटक्या कुराणाचा फोटो वर्तमानपत्रात छापून आणण्यात आला. हि दंगल पेटवण्याची योजना होती. मात्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात इतर फोटो टाकून गैरसमज पसरण्यापासून थांबण्यास मदत केली.

खैरनार यांना लक्षात आलं की हि मंडळी आपल्या कामासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात. त्यांच्या मनात आपल्या बद्दल भीती निर्माण झाली आहे याचा देखील खैरनार यांना अंदाज आला. म्हणूनच दंगल शांत झाल्यावर त्यांनी आपली मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी त्यांच्या रडारवर खुद्द दाऊद इब्राहिमचं घर आलं. 

कादरी बिल्डिंग, ३६ पाकमोडिया स्ट्रीट, भेंडीबाजार हा पत्ता. बारा भाडेकरू असलेली हि जुनी इमारत. मूळ मालक कादरी. पण पुढे १९९२ साली दाऊद इब्राहिमने ती विकत घेतली. एव्हाना तो दुबईला पळून गेला होता. मात्र आपल्या पत्नीच्या नावाने त्याने हि इमारत विकत घेतली होती.

नाव देखील तिचेच दिले होते. मेहजबीन

इमारत जुनी होती. तिची दुरुस्ती करण्यासाठी देखील गृहनिर्माण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार होते. दाऊदने कादरी बिल्डिंग खरेदी केल्या केल्या तिथल्या सर्व भाडेकरूंना चार लाख रुपये प्रत्येकी दिले आणि त्यांना जागा खाली करायला लावली. या किरकोळ रकमेत काही करता येत नसल्यामुळे त्यातले कित्येकजण देशोधडीला लागले.मध्यंतरी इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्याचा फायदा घेऊन दाऊदने ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं आणि संपूर्ण इमारत पाडून पाच मजल्याची नवीन बिल्डिंग उभी केली.

दंगली सुरु होण्यापूर्वी सर्व इमारत बांधून पूर्ण झाली होती. असं म्हणतात की पूर्ण बिल्डिंग वातानुकूलित होती. समोरचा भाग आणि माळ्यावरील भाग खास आयात केलेल्या बेल्जीयम काचांनी सुशोभित करण्यात आला होता. जमिनीला संगमरवर लावण्यात आले होते. त्याचा मुख्य अड्डा या इमरतीच्या अगदी समोर होता. अड्ड्यावर नजर राहावी म्हणून सगळ्या जवळच्या नातेवाईकांना राहण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करून हि इमारत बांधण्यात आली होती.

सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे यांनी हि इमारत गो.रा.खैरनार यांना दाखवली. दाऊदसारख्या असामाजिक तत्वांकडून बेकायदा उभी करण्यात आली असून त्यावर कारवाई करावी अशी पत्रे महानगरपालिकेकडे येत होतीच. खैरनार यांनी आपला हातोडा उगारायच ठरवलं.

हि बातमी दाऊद पर्यंत वेगाने पोहचली. त्याच्या बायकोने कारवाई होण्याच्या आधी त्यावर स्थगितीचा अर्ज न्यायालयात केला. पण याला मिळत असलेली प्रसिद्धी पाहून नायायालयाने स्थिगिती देण्यास नकार दिला. महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी गो.रा.खैरनार यांच्या कामात अडथळा आणण्यास सुरवात केली.

खैरनार आपल्या एकाकी झुंझ या आत्मचरित्रात सांगतात की दाऊदच्या इमारतीच्या तोडफोडी ची कारवाई सुरु झाल्यावर खासदार बनातवाला आणि आमदार बशीर पटेल दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना भेटले. काहीरनार यांची बदली करावी आणि तोडफोडीची कारवाई थांबवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पाच कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

पण मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खैरनार यांची बदली तर केलीच नाही शिवाय त्यांच्या दाऊदच्या घराचं बांधकाम पडण्याच्या कारवाईला रोखले देखील नाही.

खुद्द गो.रा.खैरनार यांना दहा कोटी रुपये देण्यात येणार होते पण त्यांनी हि लाच नाकारली.

दरम्यानच्या काळात मुंबईत बॉम्बस्फोटाचा प्रकरण घडून गेले. दाऊद इब्राहिम हा फक्त मुंबईचा कुख्यात गँगस्टर नसून एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी आहे असं समोर आलं. गो.रा.खैरनार यांनी त्यांच्यावर असलेला सगळं दबाव झुगारून मेहजबीन इमारत पाडण्यास सुरवात केली.

तोडफोड सुरु करण्याआधी बॉम्बशोधक पथकाद्वारे आत कोणताही स्फोटक पदार्थ लपवला नसल्याची खात्री करून घेण्यात आली. हि कारवाई होणार याची बातमी दाऊदला आधीच लागली होती त्यामुळे दोन दिवस आधीच सोन्याचे नळ  विचार किंमती वस्तू आलं होतं .

मोठ्या फौजफाट्यात गो.रा.खैरनार यांनी दाऊदच्या मेहजबीनवर हातोड्याचा घाव घातला. एका दिवसात त्या सुंदर इमारतीचे भग्नावस्थेत रूपांतर करण्यात आले होते. ते बघायला प्रचंड गर्दी झाली होती. खैरनार यांच्या जीवाला धोका आहे असं बोललं जात होतं. कोणी सांगितलं कि इमारत पाडण्याऐवजी ताब्यात घेतली तर सरकारला ती इतर कामासाठी उपयोगात आणता येईल.

खैरनार मात्र  ठाम होते. त्यांनी कायद्यात अशी तरतूद नसल्याचं सांगत दाऊदच्या इमरतीवर चालणारा हातोडा थांबवला नाही. दाऊदचा नाही तर टायगर मेमनच्या देखील दोन प्रॉपर्टीवर महानगरपालिकेने कारवाई केली.

गो.रा.खैरनार सांगतात मी त्याकाळात तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांना भेटलो आणि म्हणालो,

टाडा कायदासाठी तुम्ही दाऊदचे नाव दाखल केले आहे परंतु तोगेली  अनेक वर्षे दुबईला असल्याने मिळणार नाही. परंतु त्याचे दोन भाऊ, जवळचे सहकारी, आई, पत्नी व कित्येक गुंड अजूनही मुंबईत राहतात. त्यांचं नावावर मालमत्ताही आहे. आपल्या सरकारने त्यांना अद्याप टाडा लावलेला नाही. तो लावल्यास त्यांना अटक करण्यात येईल. पळून गेल्यास मालमत्ता जप्त करता येईल.”

यावर गृहराज्यमंत्री म्हणाले,

“तुमचे म्हणणे खरे असले तरी मी काही करू शकत नाही.”

हे सांगताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे इशारा केला आणि त्यांच्यावर सर्व काही अवलंबून असल्याचं दर्शवलं.

गो.रा.खैरनार आपल्या पुस्तकात आरोप करतात की सुधाकरराव नाईक जाऊन पवार मुख्यमंत्री झाल्यावर दाऊदच्या इमारती  तोडण्यात अनेक अडथळे आले व राजकीय ढवळाढवळ होत राहिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.