आपले गेले, उपरे गेले, पण शंकरराव गडाखांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली नाही..?

शिवसेनेत बंड झालं त्या दिवसापासून चर्चा होती, ती म्हणजे कोण राहणार आणि कोण टिकणार ? शपथविधी, अध्यक्षपद निवडणूक झाल्यानंतर थेट बहुमत चाचणीच्या दिवशीही शिवसेनेतली गळती कायम राहिली.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं. तर दुसऱ्या बाजूला बाहेरुन शिवसेनेत येऊन मंत्रीपद मिळवलेले उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि राजेंद्र पाटील यड्रावकर सुद्धा बंडात सामील झाले.

जिथं शिवसेनेत मोठं झालेल्या नेत्यांनीच बंड केलं, तिथं बाहेरचे नेते कसे थांबणार ? अशी चर्चा होती. मात्र या चर्चांना छेद दिलाय तो नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी.

एका बाजूला आमदारांच्या नंतर शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत असताना, शंकरराव गडाखांनी एक मेळावा घेतला. ज्यात त्यांनी जाहीर केलं की, “मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार.”

खरंतर, २०१९ ची निवडणुक शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या तिकिटावर जिंकले. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर मृद आणि जलसंधारण मंत्रीपदाची जबाबदारीही दिली.

शंकररावांचे वडील यशवंतराव गडाख हे शरद पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. तब्बल दोन वेळा आमदार, तीन वेळा खासदार, साखर कारखान्याचे संस्थापक अशी वेगवेगळी पदं भूषवलेले यशवंतराव हे फक्त नेवाश्यातलेच नाहीत, तर सगळ्या नगर जिल्ह्यातले तालेवार राजकारणी. आपल्या वडिलांची परंपरा चालवत शंकररावांनीही राजकारणात कमी कालावधीत जम बसवला.

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत नेवासा हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून घोषित झाला. त्यानंतरची पहिलीच निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढत भाजपच्या विठ्ठल लंघे यांचा पराभव केला. २०१४ मध्ये भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांचा निसटता पराभव केला. 

२०१४ नंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. २०१९ मध्ये त्यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं ठरवलं, तेव्हा राष्ट्रवादीनं जुने संबंध जोपासत त्यांना पाठिंबा दिला आणि ते ३० हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले. 

पुढं त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या आधीच शिवसेनेला पाठिंबा दिला, पुढं शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी शिवबंधनही बांधलं.

हा झाला इतिहास आता वर्तमान बघुयात.

 शंकरराव गडाखांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेण्याचं पहिलं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे विकास निधी. 

बंडखोर आमदारांपैकी अनेक आमदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी न मिळाल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या बाजूला शंकरराव गडाख यांनी मात्र वेळोवेळी मिळालेल्या विकासनिधीची माहिती दिली आहे. गडाख पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २८० कोटी रुपयांचा विकासनिधी महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केला होता, हा जिल्ह्याला मिळालेला इतिहासातला सर्वाधिक विकासनिधी असल्याचं गडाख यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं होतं. 

नेवासा तालुक्याला मिळालेल्या निधीबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरेंचे आभारही मानले होते. नगरपंचायतीसाठी १० कोटींचा निधी आणण्यातही गडाखांना यश मिळालं होतं, थोडक्यात निधी, मतदारसंघातली विकासकामं आणि योजनांच्या बाबतीत गडाख समाधानी असल्याचं दिसून येतं.

दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे स्थानिक राजकारण. 

शंकरराव गडाख यांचे मतदारसंघातले मुख्य विरोधक आहेत भाजप. २०१४ मध्ये त्यांना भाजपच्याच बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रवादीशी असलेला जिव्हाळा, सेनेतला प्रवेश आणि स्थानिक राजकारणातलं वर्चस्व बघता भाजपमध्ये प्रवेश करणं त्यांच्या अंतर्गत अडचणी वाढवणारं ठरलं असतं. 

सोबतच गडाख आणि भाजप यांचे संबंधही फारसे जवळचे नाहीत. २०२१ मध्ये त्यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. 

ते म्हणाले होते, “राज्यात भाजपची सत्ता असताना माझ्या कुटुंबाला विनाकारण त्रास दिला होता. पोलिसांनी मोठा फौजफाटा पाठवून घराची झडतीही घेतली होती. त्यामुळं भाजपशी जुळवून घेण्याशी मी सहमत नाही.”

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि गडाख परिवार यांच्यातला वादही अनेकदा चव्हाट्यावर आलाय. आपल्यामागे चौकशीचा आणि पोलिसांचा ससेमिरा मुरकुटेंमुळेच लागल्याचा आरोप गडाख कुटुंबीयांनी केला होता.

 स्वतः शंकरराव गडाखांनी, ‘मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही, मला बेड्या ठोकण्याचे आदेश त्यांनीच दिले होते.’ असं विधान केलं होतं. साहजिकच शिंदे गट आणि पर्यायानं भाजपसोबत जाणं हे गडाखांनी स्वतःचंच नुकसान करुन घेण्यासारखं आहे, असं सांगितलं जातं.

तिसरं कारण म्हणजे नेवाश्यातलं गडाखांचं वर्चस्व. 

निवडणुकीतल्या जय-पराजयांच्या पलीकडे पाहिलं, तर गडाखांचं संपूर्ण तालुक्यात एकहाती वर्चस्व आहे. अर्थात त्यांच्यामागे वडिलांचं काम आणि ताकद आहेच. पण सोबतच कारखाना, सहकारी संस्था, नगरपंचायत, ग्रामपंचायत इथंही त्यांच्याच कार्यकर्त्यांचं वजन पाहायला मिळतं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, त्यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला. वेळोवेळी मुरकुटेंना हादरे देत, भाजपचं प्राबल्य कमी केलं. 

गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नेवाश्यातल्या लोकांनी गडाख हाच आमचा पक्ष असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यामुळं बंडखोर आमदारांसोबत जाऊन जनभावना आपल्या विरोधात जाण्याच्या शक्यतेला त्यांनी पूर्णपणे फाटा दिला.

शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेण्याचं आणखी एक कारण, यशवंतराव गडाख यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणात सापडतं. 

त्यात ते म्हणतात, 

”शिंदे गटासोबत आपण गेलो असतो, तर मंत्रीपदी कायम असतो. पण ज्या ठाकरे साहेबांनी आपल्याला स्वतःहून बोलावून घेतलं, कॅबिनेट मंत्री केलं, वेळप्रसंगी अशा माणसाला सोडणं योग्य नाही. 

सत्ता काय नेहमी नसते. राजकारण बदलत असतं, पण आपण स्थिर राहिलेलं चांगलं. 

विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन शंकररावांना त्रास दिला. आपल्यालाही ईडीचा धाक दाखवला गेला, पण आपण हललो नाही.”

दुसऱ्या बाजूला शंकरराव गडाख यांनीही, “आपल्याला शिंदे गटाकडून संपर्क करण्याचा प्रयत्न सध्यातरी झाला नाही. मात्र मी काही सिद्धांतावरती उद्धव ठाकरेंसोबतच आलो होतो, या सगळ्या घडामोडी झाल्यावर मी उद्धव साहेबांना फोन करुन सांगितलं होतं, की मी तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबतच राहणार. आणि त्याप्रमाणं मी निर्णय घेतला आहे.” असं आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. 

सोबतच आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे,

जेव्हा शंकरराव गडाख आमदार नव्हते, तेव्हा त्यांच्यामागं चौकशी आणि आरोपांचं मोहोळ उठलं होतं. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त मदत त्यांना उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळेच आपल्या वाईट काळात केलेल्या मदतीमुळं गडाख आज उद्धव ठाकरेंच्या वाईट काळात त्यांच्यासोबत असल्याचं बोललं जातं.      

शंकरराव गडाखांच्या भूमिकेचं सार सांगताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलेला एक शेर महत्त्वाचा आहे. ते म्हणाले,

“कैसे छोडू अकेला उनको,
जिनको हराने के लिए
दुनिया एक हो चुकी है.” 

थोडक्यात राज्यात सत्तानाट्य होऊनही शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही. आगामी निवडणूकाही आपल्या शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. फक्त आता भाजप आणि शिंदे गटामुळं त्यांच्या विरोधकांना किती ताकद मिळणार ? आणि गडाख त्यांचा कसा सामना करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.