विरोधी पक्षनेतेपद गेल्याचा बदला, मुलायमसिंह यादवांनी मुख्यमंत्री बनून घेतला

असं म्हणतात राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. इथं कधीच कुणाचा पर्मनंट शत्रु नसतोय आणि कुणीच कुणाचा पर्मनंट मित्रही. इथली समीकरणं कधीही बदलू शकतात… सरकारं उभी राहू शकतात आणि पडूही शकतात.

आता डेंजर विषय फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणात होतात असं तुम्हाला वाटत असेल, तर असं अजिबात नाहीये. पार ग्रामपंचायतीपासून जगाच्या राजकारणापर्यंत कुठंही आणि कशीही सूत्रं हलतात. पण या सगळ्यात कोण टॉपला असेल, तर उत्तर प्रदेश पॅटर्न!

देशातलं सगळ्यात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेश मधल्या राजकारणाची देशाच्या राजकारणावरही मोठी छाप असते. दिवंगत अजितसिंह म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे सुपुत्र. मुलायमसिंह यादव यांना चरणसिंह यांचे राजकीय वारसदार मानलं जात होतं, पण अजितसिंह यांची एंट्री झाली आणि राजकीय समीकरणं बदलली.

चरणसिंह यांच्या लोकदल पक्षातून मुलायमसिंह यांची राजकारणात एंट्री झाली. त्यांनी आपला करिष्मा दाखवला आणि आपलं पक्षात, राजकारणात वजन प्रस्थापित केलं होतं. मात्र चरणसिंह यांनी आयआयटी खड्गपुरमध्ये शिकलेल्या आपल्या मुलाला, अजितसिंह यांना राजकारणात आणायचं ठरवलं. अजितसिंह राज्यसभेत निवडून गेलेले पहिले आयआयटीयन ठरले.

चरणसिंह यांच्या मृत्युनंतर अजितसिंह यांना पक्षाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात हवा होता. तेव्हा मुलायमसिंह यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं. तेच पक्षनेतेही होते. अजितसिंह यांच्या समर्थक आमदारांची एक बैठक पार पडली आणि मुलायमसिंह यांना पक्षनेते पदावरुन हटवण्यात आलं. साहजिकच मुलायमसिंह यांना विरोधी पक्षनेतेपदही गमवावं लागलं.

हा अपमान मुलायमसिंग यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

अपमानाचा बदला-

देशाच्या पंतप्रधानपदी व्ही. पी. सिंग विराजमान झाले होते. त्यांना ही मानाची खुर्ची मिळण्यामागेही उत्तर प्रदेशच्या बुद्धीबळाचा मोठा वाटा होता. उत्तर प्रदेशमधल्या निवडणूका पार पडल्या होत्या. लोकदलाचा समावेश असणाऱ्या जनता दलाला सरकार स्थापन करण्यासाठी फक्त पाच आमदार कमी पडत होते. आता फक्त पाच आमदार जमवणं हा काही मोठा विषय नव्हता. मोठा विषय होता, तो मुख्यमंत्री कोण होणार याचा?

पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची इच्छा होती की, अजितसिंह यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसावं. दुसऱ्या बाजूला मुलायमसिंह यादवही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. त्यातही दोन वर्षांआधी झालेला अपमान मुलायमसिंह यांना बोचत होताच.

अजितसिंह यांचे वडील आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यामुळं त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचली होती, मुलायमसिंह ही माघार घ्यायला तयार नव्हते. दोघांपैकी एकाचाही पाठिंबा गमावणं व्ही. पी. सिंग यांना जड जाऊ शकलं असतं. त्यामुळं त्यांनी निरीक्षकांच्या टीमला मध्यस्थी करायला पाठवलं.

मग ठरलं, की आमदार आपल्या पसंतीच्या नेत्यासाठी मतदान करणार आणि अशा पद्धतीनं उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ठरणार-

मुलायमसिंह यांनी चाणाक्ष पद्धतीनं चाली खेळल्या. बाहुबली डीपी सिंग आणि बेनीप्रसाद वर्मा यांनी मुलायमसिंहांच्या बाजूचं वजन वाढवलं. साहजिकच आणखी आमदार मुलायमसिंहांच्या बाजूनं वळले. अजितसिंह गटाला हादरा देत मुलायमसिंह यांनी त्यांची अकरा मतंही फोडली. शेवटी अजितसिंह यांना ११०, तर मुलायमसिंह यांना ११५ मतं पडली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मुलायमसिंह विराजमान झाले. आता अजितसिंह यांची नाराजी दूर करायला, व्ही. पी. सिंग यांनी केंद्रीय मंत्रीपद देऊ केलं. पण अवघ्या पाच आमदारांच्या फरकानं मुलायमसिंह यांनी निर्णायक लढतीत बाजी मारली.

भले मुलायमसिंह यांची खुर्ची फार काळ टिकली नाही, पण त्यांनी आपलं विरोधी पक्षनेते पद गेल्याचा बदला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवून पूर्ण केला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.