स्पॉटीफाय, गाना, या सगळ्यांच्या आधी SONGS.PK हाच आपला आधार होता…

तो जमाना १० रुपयात तासभर सायबर कॅफेमध्ये बसून दुनियादारी करण्याचा, कटिंगच्या दुकानात किंवा चहाच्या टपरीच्या बाजूला थांबून गावगप्पा ऐकण्याचा होता. त्यात वय असं होतं, की मोठ्या पोरांमध्ये घ्यायचे नाहीत आणि बारक्या पोरांमध्ये खेळायला लाज वाटायची. एकटं चौकात बसणं म्हणजे आपला हाय नाय तो रिस्पेक्ट घालवून घेणं होतं. त्याचवेळी सायबर कॅफे नावाचा मसीहा आपल्याला मिळाला.

पण दिवसाला घरातून दहा-वीस रुपये मिळवणं हा लय मोठा टास्क असायचा. पण तरी आपण सायबर कॅफेत जायचो. तिथं गेम खेळणं, नाय नाय त्या साईट्स हुडकून पाहणं, फेसबुकवर उगाच हाय, हॅलो, गुड मॉर्निंग टाकणं या सगळ्या सोबतच आणखी एक वाढीव नाद होता तो म्हणजे, गाणी डाऊनलोड करायचा. 

त्याचवेळी टपरीवर एम्प्टीनेस गाणं आणि ते गाणाऱ्या पोरग्यानं केलेल्या आत्महत्त्येची अफवा टपरीवर कानावर पडली होती, कीपॅडच्या मोबाईलमधल्या मेमरी कार्डमध्ये ते गाणं टाकायचा एकच मार्ग होता तो म्हणजे गाणं डाऊनलोड करुन मग कार्ड रीडरच्या लडतरी करुन गाणं तिकडं भरायचं.

गाणं डाऊनलोड करायला बेसिक शोधलं, एम्प्टीनेस फुल सॉंग एमपीथ्री फ्री डाऊनलोड.

आणि मग साईट समोर आली, songs.pk

आगाआयायाय, बारक्या पोराला खेळणीच्या दुकानात नेल्यावर जसं वाटतं अगदी सेम फिलिंग तेव्हा आली होती. कारण तिथं फक्त एम्प्टीनेस नाय तर दुनियेभरची सगळी गाणी होती. पार किशोर कुमार पासून आशिक बनाया आपने पर्यंत सगळी.

imran hashmi songs असं लिहिलेल्या शब्दांवर क्लिक केलं आणि गुरुवर्य इम्रान सरांची सगळी गाणी डाऊनलोड व्हायला हजर. सगळी सनासना मोबाईलमध्ये भरुन घेतली आणि रात्री हेडफोन घालून निवांत ऐकली. त्यादिवशी दोन गोष्टी फिक्स समजल्या, इम्रान हाश्मीची गाणी नुसती बघायलाच नाय तर ऐकायलाही बाप आहेत आणि songs.pk ही साईट म्हणजे खजिनाय खजिना.

दिवस बदलत गेले आणि हातात स्क्रीनटच मोबाईल आला, त्यात टूजी इंटरनेटही आलं. पण त्याचा स्पीड इतका दिव्य असायचा की, एखादं गाणं डाऊनलोड व्हायला काही तास लागायचे आणि व्हिडीओ डाऊनलोड करायचा म्हणल्यावर सगळी रात्र.

एक दिवस असंच एका वाढीव हॉटेलमध्ये जाणं झालं आणि तिथं होतं फ्री वायफाय. जवळच्या मित्रानं सांगितलं, कायपण डाऊनलोड करा फास्टमध्ये होतं. पोरांनी गेमा डाऊनलोड केल्या (खेळायच्या… बघायच्या नाही.) कुणी आवडत्या नटीचे फोटो, तर कुणी रिंगटोन पण आपला नाद ठरलेला.. ओनली songs.pk… जेवढी केवढी नवीन गाणी आली होती, ती सगळी खापखुप डाउनलोड केली आणि पुढचे दोन दिवस पोरांमध्ये कॉलर टाईट.

पोरांना ब्लूटूथनं गाणी देण्यातही सामाजिक कार्यकर्ते असण्याचा फील येत होता. पण तेवढ्यात हा फुगा फुटला. कारण एका भिडूनं सांगितलं, ‘भावा ती वेबसाईट पाकिस्तानी आहे आणि गाण्यातून व्हायरस येतात. आपले फोटो आणि नंबर कॉपी करुन पाकिस्तानवाले विकतात.’ जी पोरं रोहन राठोडच्या आत्महत्त्येवर विश्वास ठेवतात त्यांनी यावर विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. सगळी गाणी शून्य मिनिटात डिलीट झाली आणि रात्री कानात हिमेश रेशमियाचा आवाज न पडल्यानं लय एकटेपण आलं.

तेव्हाच ठरवलेलं जरा संशोधन करायचं, की तो गडी म्हणला तसं खरंच songs.pk पाकिस्तानचं आहे का? असलं तर त्याचा मालक कोण असेल? आपण गाणी डाऊनलोड केली म्हणल्यावर आपला फोटो पाकिस्तानात झळकणार का? अशी लय उत्तरं शोधायची होती.

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की, ही वेबसाईट पाकिस्तानची आहे का?

तर उत्तर आहे हो. ही वेबसाईट पाकिस्तानचीच आहे आणि त्याच्यापुढं असलेले .pk हे शब्द पाकिस्तानचं अस्तित्व दाखवतात. थोडक्यात ही वेबसाईट पाकिस्तानमधूनच ऑपरेट व्हायची.

प्रश्न क्रमांक दोन, याचे मालक कोण असतील?

पार लादेन आणि दाऊदपासून शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर असे लई आडाखे बांधण्यात आले होते. मग नंतर हुडकल्यावर घावलं की FUNmaza नावाची एक वेबसाईट आहे, ज्याचे मालकच songs.pk चालवायचे. दोन्ही वेबसाईट्सचं काम एकच होतं की, लोकांना डाऊनलोड करायला गाणी उपलब्ध करुन देणं. फनमाझावर फक्त गाणीच नाही, तर पिक्चरच्या, वेब सिरीजच्या बातम्या आणि आणखी माहितीही असते. ही एंटरटेनमेंट वेबसाईट २००१ मध्ये लॉंच करण्यात आली होती.

आता आला प्रश्न हॅकिंग आणि व्हायरसचा

तर विषय असा झाला की, आपण गाणी मोबाईलवर डाऊनलोड केलेली तेव्हा काय करप्ट वैगेरे झालं नाही. फोटोंचं म्हणाल तर आपल्या मोबाईलमध्ये एवढे देखणे फोटो नव्हतेच जे पाकिस्तानच्या वेबसाईटवर झळकतील. ज्या सायबर कॅफेमध्ये गाणी डाऊनलोड केलेली तिथंही व्हायरसचा काय मॅटर झाला असं वाटत नाय. कारण तसं काय झालं असतं, तर कॅफेवाल्यानं जोड्यानं हाणला असता की राव… पण खरं सांगायचं तर शक्यता नाकारता येणार नाही, हे ही नक्की.

आता ही साईट बंद झाली काय?

तर उत्तर आहे हो आणि नाही पण. म्हणजे झालं असं की भारतानं पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या अनेक साईट्स बंद केल्या, त्यात songs.pk चाही नंबर लागला. त्यामुळं तिकडनं गाणी डाऊनलोड करण्याची सिस्टीम बंद झाली. पण तोवर पागलवर्ल्ड, डीजेमाझा अशा अनेक वेबसाईट्स आल्या होत्या. पोरं आणि टेक्नॉलॉजी इतकी वाढीव झाली होती की, युट्युबवरुन गाणी एमपीथ्रीमध्ये डाऊनलोड करायला जमू लागलं होतं.

जरा डीप जाऊन बघायचं म्हणलं, तर songs.pk पूर्णपणे बंद झालेलं नाय. विषय असाय की, पुढं डॉट इन्फो लावलं की साईट ओपन होत असती. त्यामुळं जुन्या बाटलीत नवी दारू ही स्कीम लागू पडते. पण आता झालंय असं की, स्पॉटीफाय, गाना असे ॲप्स आले, युट्युबनं पण आपलं एमपीथ्री स्ट्रीमिंग सुरू केलं. त्यामुळं आपण डायरेक्ट तिकडं जाऊन गाणं हुडकतो.

त्यात सोपेपणा असला, तरी फील नाय भिडू. फील कशात होता माहिती का, 

ऑपेरा मिनीवर जाऊन emptiness by rohan rathod free download mp3 हे सर्च करुन, songs.pk उघडून दहा मिनिटं वाट बघून गाणं डाऊनलोड करण्यात आणि… रात्री हेडफोन घालून… तुने मेरे जाना ऐकण्यात…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.