बाऊंड्री मारून पाकिस्तानला हरवलं पण त्याची शिक्षा म्हणून थेट करियर बुडवण्यात आलं..

भारतामध्ये क्रिकेटला कुठल्या धर्मापेक्षा कमी समजलं जात नाही. एकेकाळी भारतामध्ये हॉकीचा बोलबाला होता, क्रिकेटकडे लोकांचा ओढा कमीच होता. पण नंतरच्या काळात कपिल देव, सुनील गावस्कर या लोकांनी भारतीय क्रिकेटमध्ये इंटरेस्ट निर्माण केला. भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मात्र क्रिकेटला भारतात सोन्याचे दिवस आले.

आता भारताच्या टीममध्ये खेळण्यासाठी कित्येक लोकं शर्थीचे प्रयत्न करतात. स्वप्नपूर्तीसाठी काही खेळाडू खेळतात, क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावतात. पण काही खेळाडूंच्या नाही असे योग नसतात. योग्यता असूनही तितक्या संधी काहींना मिळत नाही.

असाच एक अस्सल मराठमोळा खेळाडू होता ऋषिकेश कानिटकर. आता ऋषिकेश कानिटकर नाव समोर आल्यावर भारत पाकिस्तानची ती यादगार मॅच आठवते. भारत पाकिस्तानच्या सिल्व्हर ज्युबिली कपच्या फायनलमध्ये कानिटकरने लगावलेला चौकार भारतीय रसिकांना चांगलाच आठवत असेल.

मूळचा पुण्याचा असलेला ऋषिकेश कानिटकर हा अष्टपैलू खेळाडू होता. ताबडतोड बॅटिंग आणि स्पिन बॉलिंग यामुळे टीममध्ये त्याचा विशेष दबदबा होता. स्थानिक क्रिकेटमध्ये तर कानिटकरने आपल्या बॅटिंगने दहशत निर्माण केली होती. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्यांच्या टॉप ५ मध्ये त्यांचा उल्लेख असायचा.

भारतीय संघाला त्याकाळी एका अष्टपैलू खेळाडूची गरज भासत होती. कपिल देवच्या निवृत्तीनंतर भारताकडे मधल्या फळीत चांगल्या बॅट्समनची आणि पार्टटाइम गोलंदाजाची गरज होती. मनोज प्रभाकर संघात निश्तित निवडले जात नव्हते. त्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाला होता.

१९९६च्या वर्ल्डकपनंतर भारतीय संघ नवीन खेळाडूच्या शोधात होता. त्यावेळी ऋषिकेश कानिटकरला संधी मिळाली. १९९७ च्या श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात कानिटकरला पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्यांना जास्त काही करता आलं नाही.

पण पुढे त्यांच्या आयुष्यात अशी मॅच आली जिने कानिटकर एका रात्रीत फेमस झाले. १९९८ साली बांग्लादेशच्या स्वातंत्र्यानिमित्त ढाकामध्ये सिल्व्हर ज्युबिली कप खेळवला जात होता. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढती होणार होत्या. भारत पाकिस्तान संघात अंतिम सामना खेळवला जाणार होता.

आता भारत पाकिस्तान किती हायहोल्टेज मॅच असते हे काय सांगायला नको. या मॅचमध्ये पाकिस्तानने ३१४ धावांचा डोंगर रचला, प्रत्युत्तरात भारताने सौरव गांगुलीच्या शतकाच्या जोरावर आणि रॉबिन सिंगच्या आक्रमक बॅटिंगमुळे मॅचमध्ये जीव आणला.

भारताची मधली फळी ढेपाळल्यामुळे भारत पराभवाच्या गर्तेत दिसू लागला होता. पण ऋषिकेश कानिटकर मैदानात आल्यामुळे हि मॅच जास्त चुरशीची झाली. क्लोज एन्काऊंटर म्हणवल्या जाणाऱ्या या मॅचमध्ये अशी स्थिती आली कि भारताला २ चेंडूत ३ धावांची गरज होती आणि भारताकडे फक्त दोन विकेट शिल्लक होत्या.

सकलेन मुश्ताकच्या पाचव्या चेंडूवर कानिटकरने खतरनाक चौकार लगावला आणि पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. दुसऱ्या दिवशी कानिटकरचा बोलबाला होता पण हीच मॅच पुढे त्याच्या क्रिकेट करिअरची वाट लावेल असं त्याला भविष्यातही वाटलं नसेल.

या मॅचचा हिरो ठरल्यावर काही सामन्यानंतर ऋषिकेश कानिटकराला संघातून डच्चू मिळाला. त्यांना संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय सगळ्यांनाच खटकला. निर्णयावर चौफेर टीका होऊ लागली. पण याचं मूळ कारण काही वेगळंच होत.

काही काळानंतर भारताचा माजी खेळाडू मनोज प्रभाकरने या प्रकरणाचा केलेला खुलासा भयंकर होता. एका स्टिंग ऑपरेशनच्या मुलाखतीत प्रभाकरने सांगितले होते कि,

ढाकामध्ये खेळवला गेलेला भारत पाकिस्तान हा सामना अगोदपासूनच फिक्स होता. यात पाकिस्तान जिंकणार हे ठरलेलं होतं, पण ऐन वेळी कानिटकरने चौकार मारून सगळा गेम फिरवला. यामुळे त्याला संघातून डच्चू मिळाला.

मनोज प्रभाकरच्या या खुलाशात किती तथ्य असेल माहिती नाही पण रातोरात स्टार झालेला ऋषिकेश कानिटकर अचानक संघातून गायब झाल्याने बरीच खळबळ उडाली होती. पुढे केवळ २ टेस्ट आणि ३४ वनडे इतकीच क्रिकेट कारकीर्द ऋषिकेश कानिटकर यांना लाभली.

ऐतिहासिक सामना विजयी करून देणाऱ्या कानिटकर यांना त्याची शिक्षा म्हणून आपल्या करियरची कुर्बानी द्यावी लागली हे मात्र दुर्दैवच होतं. पुढे कानिटकर स्थानिक क्रिकेट खेळत राहिले पण त्यांना परत भारतीय संघात जागा मिळवता आली नाही.

हे हि वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.