१२ गावे पाकिस्तानला दिली तेव्हाच भगतसिंग यांचं अंत्यसंस्कार झालेलं गाव भारताला मिळालं.

1947 ला दोन मोठ्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. भारत स्वतंत्र झाला. पण, या प्रचंड देशाची फाळणी झाली. पाकिस्तान नावाचा एक नवीन देश जगाच्या नकाशावर उदयास आला.

भारताच्या इतिहासात कधी झालं नव्हतं, एवढं मोठं स्थलांतर या फाळणीमुळे घडलं. कित्येकांना आपले घरदार, जमीनजुमला सोडून नवीन तयार झालेल्या देशामध्ये जावे लागले. या फाळणीमध्ये अनेक महत्वाची शहरे, महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू दोन्ही देशांनी वाटून घेतल्या. सीमाप्रश्न ज्वलंत होताच.

त्यातच, एक अतिशय महत्वाचे स्मृतीस्थळ पाकिस्तानच्या वाट्यास आले. विसाव्या शतकात आपल्या बलिदानाने आदर्श निर्माण करणाऱ्या 22-23 वर्षांच्या तरुणांचे स्मारक. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मृतीस्थळ असलेले ठिकाण, “हुसैनीवाला” पाकिस्तानात गेले.

23 मार्च 1931 चा तो काळा दिवस.

भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या तिन्ही क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फासावर चढवले. मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या देहाची विटंबना केली. पण, लोकांच्या सतर्कतेमुळे ब्रिटिशांना या क्रांतिकारकांचे देह सोडून पळून जावे लागले. नंतर भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या देहावर परंपरागत अंत्यविधी करण्यात आला. ज्या ठिकाणी या तिन्ही तरुणांच्या अस्थींचा अंश जपून ठेवण्यात आला, ते गाव म्हणजे हुसैनीवाला. हे ठिकाण क्रांतीचे प्रतीक होते. हे ठिकाण स्वातंत्र्यकांक्षेचे प्रतीक होते. एवढे प्रेरणादायी आणि महत्वाचे स्थळ भारतात नाही, याची खंत प्रत्येक भारतीयाला वाटत होती.

कोणत्याही प्रकारे हुसैनीवाला भारतात आणण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू प्रयत्न करत होते.

अखेर नेहरूंच्या प्रयत्नांना यश आले. सन 1960 मध्ये भारतातील 12 गावे पाकिस्तानला देऊन नेहरूंनी ‘हुसैनीवाला’ भारताला जोडून घेतले. ज्या ठिकाणी भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना अग्नी देण्यात आला, ते ठिकाण भारतात समाविष्ट झाले. भारतीयांसाठी प्रचंड मोठा सन्मानाचा आणि अभिमानाचा तो दिवस होता.

पुढे, सन 1965 मध्ये भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘हुसैनीवाला’ येथे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. हुतात्म्यांची स्मृती अनंतकाळ जपली जावी म्हणून एक स्मारक उभारण्याची तयारी सुरू झाली. यशवंतरावांनी त्या जागेचे भूमिपूजन केले. पंजाब सरकार आणि भारत सरकारच्या सहयोगाने त्याठिकाणी स्मारकाचे सुरू झाले.

1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानी सैन्याने हुसैनीवाला गावावर आक्रमण केले.

हुसैनीवाला गाव भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आहे. भारताच्या आर्मीने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानी सैन्य पाठीला पाय लावून पळून गेले. आपल्या सैनिकांचे मृत शरीरसुद्धा नेण्याची हिम्मत त्यांच्यात राहिली नव्हती. पण या धामधुमीत पाकिस्तानच्या सैन्याने भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मारकावर उभारण्यात आलेले अर्धपुतळे सोबत नेले. आजतागायत ते पुतळे पाकिस्तान सरकारने परत दिले नाहीत.

भगतसिंह यांचे जिवलग मित्र महान क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त यांचा अंत्यविधी याच ‘शहीद स्मारकाच्या’ ठिकाणी करण्यात आला. तसेच, 1 जून 1975 रोजी भगतसिंहाच्या आई, वीरमाता विद्यावती देवी यांचाही अंत्यविधी हुसैनीवाला येथेच करण्यात आला.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हुसैनीवाला भारताला जोडून घेतल्यामुळे या महान माय-लेकरांची, मृत्यूनंतर का होईना, अनंत काळाची भेट झाली.

पंडित नेहरूंचे चित्रण नेहमी या क्रांतिकारकांच्या विरोधात रंगवण्यात काही लोकांनी धन्यता मानली आहे. पण मार्ग जरी वेगवेगळे असले तरीही या सर्वांचे ध्येय एकच होते, ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. दुर्दैव असे, की 23 मार्च रोजी लागणाऱ्या ‘शहिदी मेळा’ सोडला तर हुसैनीवालाकडे कुणीही फिरकत नाही.

हुसैनीवाला येथील क्रांतिकारकांच्या स्मारकाची हेळसांड होत आहे. आजही गावातील लोकांना पिण्याचे पाणी नाही. पंचवीस-तीस वर्षे जुन्या हातपंपामधून येणारे खारट पाणी आजही लोक पिण्याचे पाणी म्हणून वापरतात. गावात विजेचा तुटवडा आहे. चांगले रस्ते नाहीत.

भगतसिंहांना पुस्तक वाचण्याचा भयंकर नाद होता. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंहाचे स्मृतिस्थळ ज्या ठिकाणी आहे, त्या गावात फक्त एक माध्यमिक शाळा असावी?

त्या शाळेच्या भिंती कित्येक वर्षांपासून गळत आहेत. शिक्षकांची कमी असल्याची तक्रार कित्येकदा करण्यात आली. पेपरला बातम्या देण्यात आल्या. राज्य आणि केंद्र सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे मागील कितीतरी वर्षांपासून लोक आवाज उठवत आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. आपल्या भविष्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान तरुणांची, त्या स्मारकाची किती ही उपेक्षा?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.