‘हायब्रीड’ आणि ‘OGW’ अतिरेकी काश्मीरमधील दहशतवादाची लाइफलाईन ठरतायेत

आज सकाळी पेपरमध्ये बातमी आली, शोपियांच्या नौगाममध्ये लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, या चकमकीत हायब्रीड दहशतवादी इम्रान बशीर गनी हा गोळीबारात मारला गेला. आता हायब्रीड दहशतवादी हा शब्द ऐकून तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार आले असतील, हे हायब्रीड दहशतवादी म्हणजे नेमकं कोण… हल्ले करणारे हे दहशतवादी भारतात आले कुठून… कारण याआधी सुद्धा आपण या दहशतवादी हल्ल्यांबद्दल ऐकलेलं आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी अशा हायब्रीड दहशतवाद्यांना ठार केले होते.

जे दहशतवादी एक-दोन दिवसच आधी दहशतवादी गटाचा भाग बनले होते. काही प्रकरणांमध्ये असे होते की मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनाही माहिती नसते किंवा त्यांचा विश्वास बसत नाही की त्यांच्या मुलांनी दहशतीचा मार्ग स्वीकारला आहे आणि शस्त्रेही उचलली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशा दहशतवाद्यांना ‘असूचीबद्ध दहशतवादी’ या गटात ठेवले कारण या दहशतवाद्यांच्या नोंदी पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कुठेच नाहीत. गेल्या वर्षी पोलिसांनी त्या दहशतवाद्यांना ‘हायब्रीड’ या नव्या शब्दाने संबोधण्यास सुरुवात केली.

‘हायब्रीड दहशतवादी’ हे असे दहशतवादी असतात जे हल्ले करून पुन्हा सामान्य जीवनात परत जातात.

हे दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी कट्टरपंथी बनतात. काश्मीरमध्ये मागील २०-२२ महिन्यात झालेल्या ५५ नागरिकांच्या हत्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक घटनांसाठी सुरक्षा दलाने या हायब्रीड दहशतवाद्यांना जबाबदार ठरवले आहे आणि ज्यामध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. असे दहशतवादी निर्माण करण्यासाठी सर्वात अगोदर त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. धर्म आणि द्वेषाच्या नावावर त्यांना काहीही करण्यासाठी तयार केले जाते. त्यानंतर त्यांना गुप्तरित्या शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यामध्ये बहुतांश प्रमाणात युवकांचा समावेश असतो, ज्यांना कट्टर बनवले जाते.

‘हायब्रीड दहशतवादी’ जे लोक असतात त्यांच्या गुन्ह्यांची नोंद आधी कुठेच नसते

हे दहशतवादी त्यांना सोपवलेलं काम करताना सामान्यपणे जीवन जगत असतात ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्यांना शोधणे कठीण जाते कारण ते सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहत असतात. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, आमच्याकडे हायब्रीड दहशतवादी आहेत, ज्यांच्या नावाची दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये फारशी नोंद नाही. ते लोक त्यांच्या पहिल्या कामगिरीनंतर दहशतवादी बनतात. अशा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्यांना असे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

आता मग प्रश्न राहतो या दहशतवाद्यांचा हेतू काय असतो

अधिकारी माध्यमांना सांगतात की, दहशत पसरवणे आणि दहशतवाद व त्यांच्या इकोसिस्टमला लक्ष्य करणारे व्यवसाय व सामाजिक कार्य थांबवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. फुटीरतावादी, हिंसाचारी आणि भडकावणाऱ्यांच्या विरोधात उठणारा आवाज ते बंद करत असल्याच सांगतात.

या हायब्रीड दहशतवाद्यांबरोबर अजून एक कॅटेगरी चर्चेत आली आहे ती म्हणजे ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) 

OGW हे असे लोक आहेत जे दहशतवाद्यांना रसद पुरवतात आणि गुप्त कारवाया करण्यास मदत करतात. आधी पोलिसांच्या बोलण्यात येणारी ही टर्म सामान्य लोकांना देखिल  माहित झाली आहे. ९० च्या दशकात, जेव्हा दहशतवाद शिखरावर होता तेव्हा ओव्हर ग्राउंड वर्कर्सना दोन काश्मिरी शब्द वापरले जायचे ते म्हणजे सोयाथ किंवा पाउट पलाव .

पण हे सोयथ आणि पाउट पलाव हे दोन्ही लोक धोकादायक मानले जात नाहीत कारण हे लोक एलओसी ओलांडून शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जात नाहीत.

अनेक तरुणांवर पब्लिक सेफ्टी ऍक्ट अंतर्गत OGW असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२० मध्ये पोलिसांनी ६२५ OGW ना अटक केली, तर २०२१ मध्ये एकूण ५९४ अशा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यातील काही चकमकीत मारलेही गेले. आता काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना भीती वाटू लागली आहे की तेही चकमकीत मारले जातील किंवा त्यांना ‘हायब्रीड दहशतवादी’ किंवा ‘OGW’ म्हणून पकडले जाईल, तेव्हा अशा प्रसंगी सुरक्षा दले ठोस पुराव्यासह त्यांचे म्हणणे जाणून घेतात. या ‘हायब्रीड्स’ किंवा ‘OGW’ आणि ओळखलेल्या अतिरेक्यांशी त्यांचे थेट संबंध असल्याचे जाणवले की पुढची कारवाई करतात.

२०२० साली हैदरपोरा येथे झालेल्या चकमकीत श्रीनगरच्या लावेपोरा भागातल्या तिघांचा मृत्यू झाला होता.

त्या तिघांच्या कुटुंबीयांनीही या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांच्या मते ते दहशतवादी होते आणि ते सुरक्षा दलावर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. यातील एका कुटुंबातील लोक अजूनही आपल्या मुलाच्या मृतदेहाचे शेवटचे अवशेष देण्याची मागणी करत आहेत. आता दहशतवाद्यांनी आपली ओळख लपवायला सुरुवात केल्याने सुरक्षा यंत्रणांना दहशतवादविरोधी कारवाया करणे अवघड झाले आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांपुढे आता या नवीन अतिरेक्यांनी एक गंभीर आव्हान निर्माण केले आहे जे त्यांना येत्या काळात निपटावे लागणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.