जेव्हा मेटल डिटेक्टर घेवून इन्कम टॅक्सचे अधिकारी राजीव गांधींच्या घरी पोहचले होते..

राजीव गांधींचं राजकारणात येणे हे काही नियोजित नव्हते. ते इंजिनियर बनण्यासाठी इंग्लंडला गेले होते. जगप्रिसद्ध अशा इम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. वडिलांमुळे त्यांना लहानपणापासून मशिन्सची आवड होती. अगदी लहान वयात रेडिओ दुरुस्त करण्यापासून ते कार विमाने याचा त्यांना शौक होता.

मशिन्सची आवड होती पण पुस्तकी अभ्यास परीक्षा याच गणित जुळत नव्हतं. या सगळ्याच्या नादात त्यांनी आपलं इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलंच नाही.  मान उड्डाण करणे हा त्यांचा छंद होता. सहाजिकच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा पास केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे लायसन्स मिळवले.

आणि लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.

राजीव गांधींना इंडियन एअरलाइन्सने आत्ताचे एअर इंडिया कंपनीने देशांतर्गत मार्गांवर पायलट म्हणून नोकरी दिली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्ली-जयपूर मार्गावर उड्डाण केले. त्यांना त्यासाठी  महिन्याला ५,००० रुपये पगार होता.

एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी म्हणाले की त्यांना “परीक्षांसाठी घोकंपट्टी” करण्यात मला रस नव्हता. म्हणून भारतात परतल्यावर ते दिल्लीतील फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाले, जिथे त्यांना पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आले.

त्यावेळी त्यांची आई इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. तरीही, वैमानिक म्हणून पगार मिळवण्यात त्याला कसलाही संकोच नव्हता.

सर्वसामान्य नोकरदार मध्यमवर्गीय व्यक्तीप्रमाणे त्यांचा संसार सुरु होता. इंग्लंडमध्येच भेटलेल्या सोनिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. राहुल प्रियांका अशी दोन मुलं देखील पदरात आली होती. नोकरीवरून परतल्यावर राजीव गांधी आपल्या संपूर्ण कुटूंबाला घेऊन सिनेमा पाहण्यासाठी जात. कधी आईस्क्रीम कधी डिनर असा त्यांचा निवांत वेळ चालला होता.

राजीव गांधी यांच्या अगदी उलट त्यांच्या धाकट्या भावाचा संजयचा स्वभाव होता. 

राजीव गांधी अतिशय शांत स्वभावाचे होते तर संजय प्रचंड आक्रमक. त्याला देखील इंजिनियर बनायचं होत पण त्याने रोल्स रॉयसमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि भारतात येऊन आपली कार बनवली. तिला नाव दिलं मारुती.

या मारुतीच्या निर्माणात संजय गांधींनी अनेक नियम वाकवले. अधिकाऱ्यांकडून काम करवून घेताना आपण पंतप्रधानांचा मुलगा आहे याचा फायदा उठवला. पण त्यांना काही हि कार रस्त्यावर उतरवणे जमले नाही. मारुतीचा नाद सोडून सन्जय गांधी राजकारणात आले.

असं म्हणतात की राजकारणात आल्यावर संजय गांधींनी आपल्या आईला चुकीचा सल्ला देऊन आणीबाणी घोषित करायला लावली. आणीबाणीत जी जोर जबरदस्ती झाली त्यात संजय गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना दोषी पकडलं जातं. याचा काँग्रेसला प्रचंड तोटा झाला. इंदिरा गांधींची लोकप्रियता घटली. आणिबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी स्वतः आणि संजय गांधी पडले. पंतप्रधानपद गेलं.

त्यानंतर आलेल्या जनता सरकारने आणिबाणीतल्या कारभाराचा वचपा काढायचं ठरवलं.   

इंदिरा गांधी संजय गांधी यांच्यावर अनेक केसेस टाकण्यात आले. त्यांना अटक झाली. तिहार जेलमध्ये टाकण्यात आलं. पंतप्रधान निवास सोडल्यावर गांधी कुटूंबीय दिल्लीत एका साध्या घरात राहायला आले.एरव्ही कार्यकर्त्यांचा राबता असायचा ते घर ओस पडले. एकेकाळी खुशमस्कऱ्या म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी कोणालाही गांधींशी नाव जोडलं जाऊ नये याची काळजी होती.

इंदिरा गांधी यांच्या कुटूंबात कमवता व्यक्ती एकच होता तो म्हणजे राजीव गांधी. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच फिरोझ गांधी यांनी दिल्लीच्या बाहेर असलेल्या मेहरोली येथे एक निवृत्तीनंतर राहण्यासाठी जागा घेऊन ठेवली होती. राजीव गांधींनी त्या जागेवर घर बांधण्याचा प्रयत्न केला पण पैसे संपल्यावर घर निम्म्यातच राहिलं.  

एकाच वेळी सुरु असलेल्या केसेसचा खर्च देखील प्रचंड होता. तो सगळा राजीव गांधी यांच्यावर येऊन पडला होता. अशातच त्यांच्यात व धाकटा भाऊ संजय गांधी यांच्यात देखील वाद सुरु झाले होते. इंदिरा गांधींच्यावर ही वेळ फक्त संजय गांधी यांच्यामुळे आली असं राजीव यांचं म्हणणं होतं. दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केलं.

नेमक्या याच काळात गांधी कुटूंबाला खिंडीत गाठण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारने मोहीम हाती घेतली.

गुप्तचर खात्यातील लोक इंदिरा गांधींच्या पाळत ठेवू लागले. त्यांचे फोन टॅप केले जात होते. एकदा तर संजय गांधी आपल्या गाडीतून कुठे तरी निघाले होते आणि सीबीआय वाल्यांची गाडी त्यांचा पाठलाग करत होती. खूप वेळ गाडी पाठलाग करत आहे हे पाहून संजय गांधींनी आपली कार थांबवली व स्वतः त्या सीबीआयवाल्यांकडे गेले आणि म्हणाले,

“तुम्ही सरळ माझ्याच गाडीतून चला म्हणजे दोघांपैकी एकाच पेट्रोल तरी वाचेल.”

कामाच्या ठिकाणी राजीव यांना त्रास देण्यास सुरुवात झाली. ते जो ७३७ विमान चालवायचे त्याच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्याची व्यवस्थापनाची इच्छा नव्हती. त्यातच भर म्हणून राजीव गांधींच्या मागे प्राप्तीकर खात्यानं चौकशीचंही शुक्लकाष्ठ लावलं.

त्या चौकशीत सोनिया गांधींचंही नाव आलं, कारण त्यांनी १९७३ साली दीराच्या सांगण्याला मान देऊन काही कागदपत्रांवर सह्या केल्या व ‘मारुती सर्व्हिसेस लिमिटेड’ ह्या बेनामी कंपनीच्या समभागांची मालकीण बनल्या. त्या प्रकारामुळे आधीच दोन्ही भावांमध्ये जोराची खडाजंगी झाली होती आणि सोनिया-राजीवच्या वैवाहिक जीवनातही तणाव निर्माण झाला होता. तेच प्रकरण आता सरकारकडून शस्त्रासारखं वापरलं जाऊ लागलं, कारण त्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचं सरकारला शाबीत करायचं होतं.

खरं तर प्रत्यक्षात त्यात काहीच व्यवहार झाले नव्हते, कारण सोनिया परदेशी नागरिक असल्यामुळे रिझर्व बँकेच्या संमतीशिवाय कुठल्याच भारतीय कंपनीचे शेअर त्यांच्या मालकीचे होऊ शकत नव्हते  त्यामुळे त्यात कुठल्याही कायद्याचा प्रत्यक्ष भंग झालेला नसला, तरी आपल्या बायकोला मारुतीकडून आत्तापर्यंत एक नवा पैसाही मिळालेला नाही आणि त्या कंपनीशी तिचा कसलाही संबंध नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी राजीव गांधींच्या डोक्यावर येऊन पडली.

सोनियाच्या व्यवहारात फारसा दम नव्हता. शिवाय ते आपले कर काटेकोरपणे भरत होते परंतु ते लोक खोटी कागदपत्र सादर करून घाणेरडे डाव खेळतील, म्हणून सोनिया गांधींचा जीव कासावीस होऊ लागला.

अशातच एकदा काही सरकारी लोक मेहरौली येथे राजीव गांधींनी अर्धवट बांधलेल्या घरात मेटल डिटेक्टर यंत्र घेऊन पोचले. हि बातमी कळताच राजीव गांधी देखील गडबडीने तिथे गेले. 

तपास करत असलेल्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं, “तुम्ही काय शोधताहात?” तेव्हा त्यांनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही.

परंतु काही वेळानं जेव्हा ते यंत्र शिट्ट्या वाजवू लागलं, तेव्हा त्यांचा आरडाओरडा राजीव यांच्या कानांवर आला. मग त्यांना सगळी परिस्थिती लक्षात आली. सरकारला वाटत होतं, की संजय गांधींनी या प्लॉटवर खजिना लपवून ठेवला आहे.

मेटल डिटेक्टर वाजू लागल्यावर तो पुरून ठेवलेला खजिनाच आपल्याला सापडलेला आहे असं समजून ते अधिकारी खुश झाले. परंतु तो खजिना म्हणजे प्रत्यक्षात खाद्य तेलाचा रिकामा डबा निघाला.

आकाशपाताळ एक करूनही मोरारजी देसाई सरकारला राजीव गांधी यांच्या विरोधात काही पुरावे सापडले नाहीत व त्यांना अटक करता आली नाही.

हे ही वाच भिडू.

 

  

 

Leave A Reply

Your email address will not be published.