विमान प्रवासामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये नवीन इतिहास तयार होतोय भावांनो

१९४७ ला हिंदुस्थानचे दोन तुकडे झाले. आणि त्यातून भारत आणि पाकिस्तान असे दोन देश आकाराला आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक तंटे असले तरी नागरिकांची गोष्ट जेव्हा येते तेव्हा तडजोड करावीच लागते भिडू. आणि हे वेळोवेळी या देशांनी सिद्ध केलंच आहे. नुकतंच फाळणीच्या वेळी दुरावलेले दोन भाऊ तब्बल ७४ वर्षानंतर जेव्हा भेटले तेव्हा ना भारतीय आर्मीने त्यांना दूर केलं ना पाकिस्तानी सैन्याची तेवढी हिम्मत झाली. उलट दोन्ही देशांच्या डोळयांत पाणीचं आलं.

नेहमीच या दोन्ही देशांनी सहमतीने काही पावलं उचललेली आहेत. असंच एक पाऊल परत एकदा हे दोन्ही देश टाकत आहेत. ज्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये नवीन इतिहास तयार होणार आहे भिडू.

फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आणि भारतादरम्यान हवाई मार्गाने प्रवास खुला होणार आहे बॉस. पाकिस्तानचं विमान प्रवाशांना घेऊन लवकरच भारतामध्ये दाखल होणार आहे. या घटनेमुळे फिरस्ती प्रेमींच्या, पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन्ही देशातील धार्मिक ठिकाणांना भेट ज्यांना द्यायची आहे, अशांसाठी आता आकाश खुलं झालं आहे, असं म्हणता येणार आहे. जसं भारतीय प्रवाशांसाठी तसंच पाकिस्तानच्या नागरिकांसाठीही ही बातमी आनंद देणारी ठरतेय.

तसं तर याची सुरुवात भारताने याआधीच केली आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच भारतीय यात्रेकरू विमानाने पाकिस्तानात दाखल झाले होते. आणि आता पाकिस्तानची बारी आहे. जानेवारी संपताना म्हणजेच २९ जानेवारीला पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विशेष विमानाने हे प्रवासी भारतात दाखल होत आहेत. तर फेब्रुवारीमध्ये ते परत जाणार आहेत.

या दोन्ही देशातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’ आणि ‘एअर इंडिया’ यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार ही सेवा सुरू होत असल्याचं पाकिस्तान संसदेचे सदस्य आणि ‘पाकिस्तान हिंदू परिषदे’चे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितलं आहे.

या पर्यटकांची ने-आण  करण्यासाठी दोन्ही विमान कंपन्या विशेष उड्डाणं संचालित करणार आहेत. आता जो गट भारतात दाखल होणार आहे तो पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावरून भारतात येणार आहे. एकूण तीन दिवसांचा हा टूर असणार आहे. तीन दिवसांच्या दौर्‍यात हे पर्यटक अजमेर शरीफ, जयपूर, आग्रा, मथुरा तसंच हरिद्वार इथल्या सुफी संत ‘वाजा मोईनुद्दीन चिश्ती आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया  या दोन दर्ग्यांना भेट देणार आहे.

हा प्रवास मात्र खूप खर्चिक असणार आहे. पाकिस्तान-भारताच्या या दौर्‍यासाठी प्रत्येक यात्रेकरूला जवळपास एक लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. हा गट आग्रा आणि दिल्लीत मुक्कामाला असणार आहे. या वास्तव्यादरम्यान त्यांना वेगळी खोली हवी असेल, तर त्यासाठी त्यांना शिल्लकचे जवळपास १५ हजार रुपये द्यावे लागतील.

तसं तर भारत आणि पाकिस्तानचे नागरिक दोन्ही देशातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील हा करार १९७४ मध्येच झाला होता. मात्र आतापर्यंत भारत-पाकिस्तान दरम्यान यात्रेकरू किंवा पर्यटकांना एकतर पायी प्रवास करावा लागायचा नाहीतर ‘समझौता एक्स्प्रेस’ने जाण्याचा पर्याय उपलब्ध असायचा. आता या पर्यायांमध्ये हवाई मार्ग सामील झाला आहे. 

धार्मिक फरक असलेले आणि धर्म हाच भारत -पाकिस्तानला वेगळं करण्याचा मुख्य मुद्दा असताना आता धर्माच्या कारणानेच या दोन्ही देशांत व्यवहार शक्य होत आहे. शत्रुत्व आणि तिरस्कार असणाऱ्या या देशांमध्ये काहीतरी साकारात्मक होत असल्याची जाणीव ही घटना करून देतेय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.