बिशनसिंग बेदींचा हट्ट नडला आणि भारतीय टीम पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाली

१९६५ आणि १९७१च्या लढाई नंतर खराब झालेले भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी एक क्रिकेट सिरीज खेळवली गेली. ती सिरीज होती गुडविल टूर. १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर १९७८ मध्ये क्रिकेट परत सुरु झालं होतं. त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि पाकिस्तानचे जनरल जिया उल हक यांनी क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे संबंध सुधारले जातील अशी अशा व्यक्त करून हि सिरीज खेळवली होती.

भारताचा पाकिस्तान दौरा निश्चित झाला. भारताचे कर्णधार म्हणून बिशनसिंग बेदी हे जबाबदारी पार पडणार  तर मुश्ताक मोहम्मद पाकिस्तानचा कर्णधार होता. याही सीरिजच्या आधी भारत पाकिस्तान मध्ये तीन सिरीज खेळून झाल्या होत्या मात्र भारताला पाकिस्तानने हरवलं नव्हतं.

या दौऱ्याच्या आधी अनेक वावड्या उठत होत्या कि हि सिरीज भारताची बॅटिंग आणि पाकिस्तानची बॉलिंग यांमध्ये होणार आहे. पण सिरीजमध्ये असं काहीही झालं नाही. भारतीय फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून उभे होते तर पाकिस्तानी बॉलर्स ऐवजी पाकिस्तानचे अंपायर भारतीय फलंदाजांना बाद करण्याच्या मागे लागलेले होते. या दौऱ्याच्या वेळी पंचांच्या कामगिरीवर अनेक लोकांनी टीका केली.

त्यावेळी पाकिस्तानचा गोलंदाज भारताच्या अंशुमन गायकवाड याना येऊन म्हणाला कि ,

” पाजी देखना ये तुम्हारे उपरवाले बैट्समन को आउट देंगे, नीचे वालों को नही देंगे. “

सिरीजमध्ये घडलंही तसच, फैसलाबादला खेळली गेलेली पहिली मैच ड्रॉ झाली आणि लाहोरमधल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला.

आता तिसरी टेस्ट हि सन्मानाची टेस्ट होती आणि भारताला हा सामना काही झालं तरी जिंकणं गरजेचं होतं. या आधी भारत कधीही पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला नव्हता. पण याहि सामन्यात पंचांची कामगिरी आणि भारताचे कर्णधार बिशनसिंग बेदी यांचा गोलंदाजी करण्याचा हट्ट इतका महागात पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. भारताने सामना तर गमावलाच पण सिरीजही गमावली.

१४ नोव्हेम्बरला तिसरा सामना सुरु झाला. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुनील गावस्करानी पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. गावस्करांच्या शतकाने भारताने ३४४ धावांचा डोंगर उभा केला. पण जावेद मियांदाद यांनी आणि पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला, मियांदाद यांच्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने ४८१ धावा उभारल्या.

पाकिस्तानने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनला ४८१ धावांवर सामना घोषित केला. आता भारताच्या फलंदाजांसमोर इम्रान खान , सर्फराज नवाज, सिकंदर बख्त अशा भेदक गोलंदाजांना तोंड देत दीड दिवस सामना लढवायचा होता.

गावस्कर परत बॅटिंगला आले आणि त्यांनी पुन्हा पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. वेगवान मारा करत असलेली पाकिस्तानी बॉलिंग त्यांनी अक्षरशः फोडून काढली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन गडी गमावून १३१ धावांवर स्कोर नेला होता. असं वाटत होत कि सिरीज ते गमावली  आहे पण हि मॅच वाचवू शकतो.

गावस्कर ६७ धावांवर नाबाद होते तो पर्यंत सामना भारताच्या हातात आहे असं वाटत होत. पण पाचव्या दिवशी बारा धावांच्या आत भारताने किरमानी, विश्व्नाथ आणि सुरिंदर अमरनाथ यांच्या विकेट गमावल्या. एका बाजूने गावस्कर लढत होते आणि एका बाजूने विकेट पडत होत्या. गावस्करानी अजून एक शतक झळकावलं आणि भारत ३०० धावांवर ऑलआउट झाला.

शेवटच्या दिवशी हातातला सामना भारताने गमावला.

शेवटच्या दिवशीचा खेळ संपायला २६ ओव्हर्स बाकी होत्या आणि पाकिस्तानला विजयासाठी १६४ धावांची गरज होती. पाकिस्तान अगोदरच सिरीज जिंकलेला होता त्यामुळे ते निवांत होते. त्यांना फक्त सेशन खेळून काढायचं होतं.

पाकिस्ताननी कर्णधाराने आसिफ इकबालला आणि माजीदला सलामीवीर म्हणून पाठवलं. वन डाऊन जावेद मियांदाद आला. कपिल देवने मजिदला १४ धावांवर झेलबाद केलं. यानंतर असिफ आणि मियांदाद यांनी फटकेबाजी सुरु केली. धावांचा वेग वाढला. या दोघांच्या फटकेबाजीने पाकिस्तान जिंकायच्या दिशेने वाटचाल करत होता.

परंतु ११८ धावांवर असिफ इकबाल अमरनाथ कडून बाद झाला. इथून सहज भारत हा सामना अनिर्णित करू शकत होता कारण पाकिस्तानला कमी चेंडूत जास्त धावांची गरज होती. या वेळी ओव्हर्स पेक्षा वेळेचा मुद्दा महत्वाचा होता कारण कमी वेळ उरलेला होता.

भारताने दोन्ही कडून  फास्टर बॉलर्स लावून जास्त वेळ घेऊ शकत होता. जेणेकरून कमी ओव्हर फेकले जातील. पण बिशनसिंग बेदींना बॉलिंग करण्याची लहर अली. त्यांना इन्फॉर्म फलंदाज इम्रान खानची विकेट मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी एका बाजूने स्वतःची बॉलिंग चालू ठेवली एकही वेगवान बॉलरला ओव्हर दिली नाही. बिशनसिंग बेदी विचार करत होते की,

भाई कितना मारेगा, एक मारेगा, दो मारेगा, एक गलती किया और आउट.

पण बिशनसिंग बेदी यांच्या हट्टाने पाकिस्तानी फलंदाजांना जास्त वेळ खेळायला मिळालं. इम्रान खानने बेदीला दोन चौकार आणि एक षटकार ठोकत सामना संपवला.

अशा तर्हेने भारतीय टीम स्वातंत्र्यानंतर ३१ वर्षात पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभूत झाली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.