मोरारजी देसाईंनी पाकिस्तानला मदत करुन आपल्याच RAW च्या अधिकाऱ्यांना मारलं होत ?

मोरारजी देसाई पाकधार्जिणे होते. ते पाकिस्तानला वारंवार मदत करायचे. त्यामुळेच त्यांना निशाण ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब देण्यात आला.

मोरारजी देसाई यांच्यावर आधारित एका लेखावर एका भिडूने वरील कमेंट केली. अनेकदा मोररजी देसाई यांच्यावर पाकिस्तानधार्जिण असल्याचा आरोप होतोच पण त्याहून महत्वाच म्हणजे त्यांच्यावर भारताचीच गुप्तचर यंत्रणा संपवण्याचा आरोप केला जातो.

या गोष्टीमागे खरच काही तथ्य आहे का ? 

याचा उलगडा केला आहे तो तत्कालीन RAW च्या काऊंटर टेरेरिझम युनिटचे प्रमुख असणाऱ्या बी. रमण यांनी. त्यांनीच काही तथ्ये समोर आणली होती. यानुसार ऑपरेशन कहुता दरम्यान रॉ च्या अधिकाऱ्यांची हत्या पाकिस्तानात झाली होती व त्यास सर्वस्वी मोरारजी देसाई कारणीभूत होते.

तत्पुर्वी मोरारजी देसाई यांचा रॉ कडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता ते समजून घ्यायला हवं. मोरारजी देसाई यांनी रॉ चा उल्लेख इंदिरा गांधींच पर्सनल सैन्य म्हणून वारंवार केला होता. त्याचसोबत त्यांचा भारताने अण्वस्त्र चाचणी करण्यास देखील विरोध होता. 

देसाईंनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर RAW चे बजेट मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं. शिवाय त्यांनी भारत आण्विक उर्जेचा वापर अण्वस्त्र तयार करण्यासाठी करणार नाही असे सांगितले होते.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रप्रमुख जिमी कार्टर यांनी भारताला अणुभट्यांसाठी आवश्यक असणारे जड पाणी आणि युरेनियम देवू केलं होतं. पण मोरारजी देसाई यांनी त्यास नकार दिला होता. 

यापाठीमागे मोरारजी देसाईं हे गांधीवादी असल्याचे कारण देखील देण्यात येते.

पण ऑपरेशन कहुता बद्दल मोरारजी देसाईंच्या भूमिकेबद्दल आजही संशय घेतला जातो कारण,

कहुता हे पाकिस्तान मधल्या रावळपिंडी जवळ असणारं एक गाव होते. इथं पाकिस्तानने प्रोजेक्ट ७०६ नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं. वास्तविक खान रिसर्च लॅबोरेटिज नावाने १९७४ सालापासून पाकिस्तानने अणुबॉम्ब तयार करण्याचे काम चालू केले होते. भारताने आण्विक शस्त्र तयार केल्यामुळे पाकिस्तान देखील अणुबॉम्ब तयार करण्याच्या पाठीमागे लागला होता.

या गोष्टींचा माग घेण्याची जबाबदारी पाकिस्तानमध्ये असणाऱ्या रॉ च्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. 

कहुताच्या भागात नेमकं काय चालू आहे याचे पुरावे भारतात सादर करायचे. हे पुरावे आतंराष्ट्रीय व्यासपीठावर मांडल्यानंतर पाकिस्तानच्या अणुबॉम्ब करण्याच्या कार्यक्रमाला खिळ बसेल असा अंदाज बांधण्यात येत होता.

पण त्यासाठी महत्वाची होती याचे पुरावे गोळा करणं. 

रॉ कामाला लागली. त्यासाठी त्यांनी एक आयडिया केली.कहुता प्रकल्पातले अधिकारी ज्या ठिकाणी केस कापत होते, तिथे जावून त्यांचे केस गोळा केले. ते भारतात पाठवून देण्यात आले व भारतात त्या केसांच परिक्षण करण्यात आलं. परिक्षण केल्यानंतर त्या केसांवर आण्विक किरण पडली असल्याची माहिती मिळाली.

कहुतामध्ये आण्विक शक्तीशी संबधित प्रयोग चालू आहेत याची माहिती तर मिळाली होती पण त्यासाठी कहुता येथील हालचालींच्या ब्लू प्रिन्ट देखील हव्या होत्या. त्याची जबाबदारी RAW च्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली. मात्र यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची मंजूरी हवी होती.

मोरारजी देसाई यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्यात आली अन् इथेच माशी शिंकली. 

मोरारजी देसाई आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख झिया अल हक् यांची चांगली मैत्री होती. ते फोनवर बोलत असायचे.

झिया उल हक हा खूपच बेरकी माणूस होता. त्याला ठाऊक होतं की मोरारजी देसाई शिवांबू म्हणजे स्वतःच मुत्र प्राशन करतात. तो पंतप्रधान देसाई यांना नेहमी शिवांबू बद्दल आपल्याला उत्सुकता आहे अस दाखवायचा. या उपचारपद्धतीचे प्रश्न विचारायचा. यातूनच त्याने पंतप्रधानांना घोळात घेतले. त्यांना वाटले झिया उल हकशी आपली दोस्तीच झाली.

अशाच एका फोनवरील चर्चेत मोरारजी देसाई झिया अल हक् यांना म्हणाले, 

माझ्या पाकिस्तानमधल्या हेरांनी तुमच्या कहुतामध्ये काय चाललय हे सांगितलय. 

एवढी महत्वाची गोष्ट खुद्द भारताच्या पंतप्रधानांच्या तोंडातून आल्याने जनरल झिया अल हक् यांनी कहुतामध्ये ऑपरेशन राबवले आणि RAW च्या हेरांना शोधून मारण्यात आलं. यामुळे पाकिस्तान तर अण्वस्त्रसज्ज देशांच्या यादीत जावून बसला पण RAW ला इतिहासातील सर्वात मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला.

संदर्भ- The Kaoboys of R&AW: Down Memory Lane 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.