पाकिस्तानच्या बेंचवर धनराज पिल्लेंनी तिरंगा फडकवला होता….

भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून प्रसिद्ध हॉकी खेळ आजच्या काळात तर गायबच झाला आहे. हॉकीचा जमाना जाऊन भारतात क्रिकेटने अशी पकड बसवली कि सगळीकडे भारतभर गल्लीबोळात क्रिकेटचा बोलबाला झाला. पण ९०च्या काळात हॉकी खेळ हा भारतात एका खेळाडूमुळे चांगलाच लोकप्रिय झाला होता. या खेळाडूने पाकिस्तानच्या बेंचवर भारताचा तिरंगा झेंडा फडकावला होता त्याबद्दलचा हा किस्सा.

धनराज पिल्ले. नाव तर ऐकलंच असेल. कारण ज्या ज्या वेळी हॉकीचा उल्लेख येतो त्या त्या वेळी धनराज पिल्ले हे नाव अगत्याने घेतलं जातं. धनराज पिल्लेचा खेळ इतका जबरदस्त होता कि त्यांना हॉकीचा कपिल देव म्हणून ओळखलं जायचं. आज भलेही हॉकीची क्रेझ नसेल पण ९०च्या दशकात धनराज पिल्लेंमुळे लोकं हॉकी लक्ष देऊन बघत असे.

१६ जुलै महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या खडकीमध्ये धनराज पिल्लेंचा जन्म झाला. परिस्थिती हलाखीची असल्याने गरिबीत सगळं चाललं होतं. लाकडाच्या दांड्याला हॉकी स्टिक बनवून धनराज पिल्लेंनी खेळायला सुरवात केली आणि आपल्या खेळाच्या टॅलेंटवर पुढे ते भारतीय हॉकी संघाचे कॅप्टनसुद्धा झाले. हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे धनराज पिल्ले फॅन होते आणि त्यांच्यासारखाच आपला गेम असावा असं त्यांना वाटायचं.

जवळपास १५ वर्ष ते देशासाठी हॉकी खेळत होते. त्यावेळी भारतीय हॉकी संघातील खेळाडूंच्या गोलंच कोणी रेकॉर्ड ठेवत नसायचं मात्र हॉकी विश्लेषकांच्या मते धनराज पिल्लेंनी १७० पर्यंत होती.

भारताचे तत्कालीन हॉकी कोच हरेंद्र सिंग यांनी धनराज पिल्लेंचा एक किस्सा सांगितला होता, आशियाई स्पर्धेतली एक मॅच होती आणि ती होती भारत विरुद्ध पाकिस्तान, पाकिस्तानने पहिला गोल केला आणि काही क्षणांतच धनराज पिल्लेंनी गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला.

भारताने अजून एक गोल नोंदवत सामना जिंकला आणि

धनराज पिल्ले पळत पळत प्रेक्षकांमध्ये घुसले आणि एका भारतीय प्रेक्षकाच्या हातून तिरंगा झेंडा घेतला आणि पाकिस्तानच्या टीमच्या बेंचवर जाऊन उभे राहिले आणि तिथून तिरंगा झेंडा ते फडकावत होते.

धनराज पिल्ले यांना हार झालेली आवडत नसायची. आणि एक तर म्हणजे पाकिस्तानविरुद्ध मॅच होती, पाकिस्तानविरुद्ध तर त्यांना हरायचंच नव्हतं. पाकिस्तानला हरवून त्यांनी गर्वाने तिरंगा झेंडा फडकावला होता तेही पाकिस्तानच्या बेंचवर उभं राहून. 

ज्युनियर हॉकीचे जादूगार असलेले धनराज पिल्ले एकमेव असे खेळाडू होते कि चार ऑलम्पिक टूर्नामेंट, चार हॉकी वर्ल्डकप, चार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि चार आशियन हॉकी स्पर्धा खेळल्या होत्या आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

धनराज पिल्लेंच्या कर्णधार पदाखाली भारताने १९९८ च्या आशियायी स्पर्धेत आणि २००३ च्या आशिया कपमध्ये विजय मिळवला होता. धनराज पिल्लेंनी बँकॉकच्या आशियायी स्पर्धेत सगळ्यात जास्त गोल केले आणि सिडनीमध्ये १९९४ च्या वर्ल्डकपवेळी वर्ल्ड इलेव्हन मध्ये जागा मिळवली होती आणि हा विक्रम करणारे ते एकमेव भारतीय होते. 

१९९९ साली धनराज पिल्लेंना खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर २००१ मध्ये पदमश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. धनराज पिल्ले राजकारणामुळे मागे पडले मात्र त्यांच्यात असलेलं हॉकी टॅलेंट हे जागतिक स्तरावर कुणालाही मात देणारं होतं.

एकेकाळी हॉकीपासून दूर गेलेली पब्लिक धनराज पिल्लेंनी पुन्हा हॉकीकडे वळवली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.