इंदिरा गांधींचा स्टेट बँकेत फोन आला, सिक्रेट बांगलादेश मिशनसाठी ६० लाख रुपये हवे आहेत.
२४ मे १९७१, सकाळचे सव्वा दहा वाजले असतील. दिल्लीच्या संसद भवन रोडवर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत एक फोन घणघणला. चीफ कशियर वेदप्रकाश मल्होत्रा यांना बोलवण्यात आल. फोन घेतल्यावर त्यांना कळाल हा फोन पंतप्रधान कार्यालयातून आला आहे. वेद प्रकाश मल्होत्रांना घाम फुटला नेमक काय प्रकरण आहे.
पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी.एन.हक्सर बोलत होते.
त्यांनी मल्होत्रा यांना आपली ओळख सांगितली. इंदिरा गांधीच्या मर्जीतला भारतातला शक्तिशाली अधिकारी म्हणून पी एन हक्सर यांना अख्खा देश ओळखत होता. हक्सर माल्होत्राना म्हणाले,
“एक बहुत इम्पोर्टंट और उतना ही सिक्रेट काम है. आपसे खुद प्राईम मिनिस्टर बात करेंगी.”
खुद्द इंदिरा गांधी बोलणार म्हटल्यावर मल्होत्रांच्या पायाखालची जमीन सरकली. प्राण कानाशी आला. एक नाजूक आणि शांत स्वर आला,
“हॅलो मै इंदिरा गाधी बात कर रही हुं. आपके पास एक बंगाली बाबू आयेंगे. उनको आपको प्रधानमन्त्री रिलीफ फंडसे ६० लाख रुपये देणे है. ये रकम बांगलादेशके सिक्रेट मिशन के लिये है.”
तो काळ म्हणजे इंदिरा गांधींच्या प्रचंड लोकप्रियतेचा काळ होता.
देशातल्या पोराटोरानां देखील माहित होतं की पूर्व पाकिस्तानचा प्रश्न चिघळलाय आणि आपल सरकार पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर संघटना यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत हे सिक्रेट आता जगाला कळाल होतं.
इंदिरा गांधींच आपल्याकडे देशकार्यासाठी मदत मागत आहेत हे ऐकल्यावरच मल्होत्रांची छाती अभिमानाने फुलून गेली.
हक्सर यांनी त्यांना सगळी स्कीम समजावून सांगितली. सिक्रेट कोड ठरले. पैसे न्यायला येईल तो माणूस मल्होत्रा यांना आपली ओळख बांगलादेश का बाबू अशी करून देईल आणि त्याला रिप्लाय देताना मल्होत्रा यांनी बार अॅट लॉ अस उत्तर द्यायचं ठरल.
वेदप्रकाश मल्होत्रा कंबर कसून कामाला लागले. ६० लाख म्हणजे त्या काळच्या मानाने प्रचंड मोठी रक्कम होती.
त्यांनी आपल्या हाताखालच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं. पटापट साठ लाख रुपये मोजून त्याची बंडले एका कॅश बॉक्स मध्ये भरण्यात आली. ती कॅश बॉक्स मल्होत्रांच्या कार मध्ये ठेवण्यात आली. मल्होत्रा स्वतः गाडी ड्राईव्ह करत गेले.
संसद भवनापासून अगदी काहीच अंतरावर त्यांना एक ऊंच गोरा माणूस भेटला. कोडवर्डची देवाणघेवाण झाली.मग ते दोघे टॅक्सी स्टडवर गेले. तिथे त्या माणसाने एका टॅक्सीमध्ये कॅश बॉक्सठेवून घेतला आणि मल्होत्राना सांगितलं की
पंतप्रधान निवास मध्ये जाउन या पैशांची रिसीट घ्या.
मिशन फत्ते केलेल्या विजयी वीराप्रमाणे वेदप्रकाश मल्होत्रांनी आपली कार थेट पंतप्रधान निवासकडे नेली.
आता इंदिराजींचे कौतुक ऐकायला मिळेल म्हणून घरात गेले तर तिथ त्यांना जे ऐकायला मिळाल त्यानंतर थेट भोवळच आली. हे पैसे इंदिरा गांधीनी मागवलेच नव्हते. पीएन हक्सरनी त्यांना सांगितलं की
मी कधी तुम्हाला फोन केलाच नाही तर पावती कुठून देऊ.
पूर्ण दिल्लीत सरकारी बँक में डाका पड गया अशी हूल उठली.
इंदिरा गांधींना सगळा मॅटर सविस्तर कळवण्यात आला. पोलीस चौकशीचे आदेश धाडण्यात आले. ACP कश्यप यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलीसने कधी नव्हे ते तत्परता दाखवली. सुरवातीला तो माणूस गेला ती टक्सी शोधून काढली. हळूहळू धागेदोरे मिळत गेले. अवघ्या काही तासात आरोपी पैशांसकट सापडला.
तो होता रुस्तम नगरवाला. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश आर्मी मध्ये होता. तिथे इंटेलिजंसच बरचस काम त्याने केलेलं. पुढे रिटायर झाल्यावर तो भारतीय गुप्तहेर खात्यात जॉईन झाला. बांगलादेश निर्मितीच्या मोहिमेवर त्याची नियुक्ती झाली होती असा त्याचा दावा होता. या मोहिमेसाठी पैसे लागणार होते आणि वेळ कमी होता म्हणून टेलिफोनचा बनाव रचल्याच त्याने सांगितलं.
कोर्टात केस उभी राहिली. नगरवालाने आपला गुन्हा मान्य केला. अवघ्या दहा मिनिटात त्याची केस क्लोज झाली.
नगरवालाला ४ वर्षांची शिक्षा आणि १००० रुपये दंड करण्यात आला. भारतीय न्यायदानाच्या इतिहासात सर्वात वेगवान निर्णय म्हणून या नगरवाला केसचा उल्लेख होतो.
पण गोष्ट इथे संपत नाही. काही महिन्यांनी नगरवालाने तिहार जेल मध्ये मागणी केली की माझ्यावरची केस परत सुरु व्हावी. पण ती मागणी कोर्टाने रद्द केली. तिथून काहीतरी गडबड आहे याची शक्यता दिसून येऊ लागली. त्यातच या केसची चौकशी ज्यांनी केली त्या ACP कश्यप यांचा एका गूढ मोटार अक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला.
नगरवालाने सुद्धा जेल मध्ये गोंधळ सुरु केला. त्याला एका सुप्रसिद्ध मासिकाच्या संपादकाशी बोलायचं होतं. ते संपादक नगरवाला प्रमाणे पारसी होते. त्यांनी आपल्या जागी एका वार्ताहाराला पाठवलं पण नगरवालाने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्याला आपल्या जवळची मोठी बातमी फक्त संपादक महोदयांनाच सांगायची होती.
योगायोगाने त्याला कसला तरी त्रास सुरु झाला आणि त्याची रवानगी जेलच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.
एकदिवस हॉस्पिटलमध्ये त्याने दुपारचे जेवण केले आणि तो चक्कर येऊन पडला ते परत उठलाच नाही. आपल्या ५१ व्या वाढदिवसादिवशी त्याचा मृत्यू झाला होता.
या सगळ्या प्रकरणामध्ये काही तरी काळेबेरे आहे अशी चर्चा दिल्लीत सुरु झाली. विरोधकांचे म्हणणे होते की बांगलादेशच्या मुक्तीच्या नावाखाली इंदिरा गांधी आणि त्यांचे सहकारी पैसा लाटत होते. खूपमोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. मल्होत्रा यांनी घातलेल्या घोळामुळे त्यांचं बिंग फुटलं आणि नगरवालाला अटक करावी लागली. जेव्हा नगरवालाने तोंड उघडण्याची धमकी दिली तेव्हा त्याचा खून झाला.
पुढे काही वर्षांनी इंदिरा गांधींच सरकार गेल आणि मोरारजी देसाई यांचं जनता सरकार सत्तेत आलं.
त्यावेळी त्यांनी नगरवाला केसची फाईल पुन्हा उघडली. न्या.पी.जगमोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवली गेली. ही चौकशी बरेच दिवस चालली. जगमोहन यांनी साडे आठशे पानांचा रिपोर्ट सादर केला. ज्यात सांगितलं होतं की तपासात अनेक त्रुटी होत्या.
एकतर इंदिरा गांधींच त्या बँकेत अकाऊंट असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. नगरवालाची केस न्यायालयात १० मिनिटात बंद करणे ही देखील चूक होती. पण त्याचा मृत्यू हा नैसर्गिकच होता.
शेवटी काय तर जनता पक्षाने प्रचंड प्रयत्न करूनही इंदिरा गांधीना अडचणीत आणता येईल एवढे पुरावे मिळू शकले नाहीत. पण आजही एवढ्या वर्षांनी कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की या संपूर्ण प्रकरणात काही घोळ नव्हता. पण नेमक काय होतं? जे होतं ते गुप्तहेर खात्याच्या देशकार्यासाठी होतं की हा निव्वळ भ्रष्टाचार होता? की हा खरंच नगरवालाने घातलेला डाका होता असे असंख्य प्रश्न आजही अनुत्तरीत राहतात.
हे ही वाच भिडू.
- पेशव्यांनी दडवलेलं सगळ्यात मोठं सिक्रेट ?
- अझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते?
- इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !
- जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !