३ ठिकाणी फेल गेल्यावर इंडिगो पेंटचा मालक पुण्यात येऊन यशस्वी झाला.

अपयश ही यशाची पहिली पायरी. सतत अपयशी होणाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी वाक्य. पुण्यात तर हे वाक्य जरा जास्तचं ऐकायला मिळतं. कारण याचं वाक्यावर अपयश मिळवलेल्या महाराष्ट्रातील अनेकांनी पुण्यात येऊन पोस्ट काढली, यश मिळवलं.

असचं काहीस घडलं इंडिगो पेंटच्या हेमंत जलान यांच्याबाबतीत. ३ ठिकाणी फेल गेल्यावर ते देखील यशस्वी होण्यासाठी पुण्यातच आले होतं.

मुळचे बिहारच्या पाटण्याचे असलेले हेमंत यांच्यासाठी ९० चं दशक म्हणजे करिअरच्या सुरुवातीचाच काळं. या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी घर चालवण्यासाठी स्टोव्ह आणि गॅसच्या व्यापाराचा बिजनेस सुरु केला. पण त्यात मन रमतं नव्हतं. त्यामुळे वर्षभरातच तो फेल गेला.

पुढे त्यांनी १९९५ साली पाटण्यात एक केमिकल यूनिटची सुरुवात केली. पण इथं पण नशिबानं दगा दिला. वाट्याला नुकसान आणि पुन्हा फेल्यूअर. परिणामी हा बिझनेस पण बंद पडला. आता काय करायचं म्हणून एका ओळखीनं १९९६ साली तामिळनाडूतल्या तूतिकोरिन स्थित कॉपर स्मेल्टर कंपनीत युनिट हेड म्हणून काम पाहिलं. पण नशिबाची साडेसाती अजून संपली नव्हती. इथं पण फेल.

पण हेमंत यांनी जिद्द सोडली नव्हती. आणखी कोणाच्या तरी ओळखीनं पुण्यात आले. त्यावेळी त्याचं वय होत ४२ वर्ष. तस बघितलं तर नवीन काही तरी सुरु करण्याचं वय मुळींच नव्हतं. त्यातही एकट्या माणसानं आव्हान पेलणंही अशक्य होतं. भांडवलाची तंगी होती.

नेमकं त्यावेळी हेमंत जलान यांच्या मित्राला त्याच्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये एका पार्टनरची गरज होती. दुधात साखर पडावी तसचं झालं. लगेच त्यांनी संधीचा फायदा उचलला. मित्रासोबत एक वर्षभर काम केलं. पण आपलं काही तरी सुरु करायचं हे डोक्यात होतं. याकाळात काय करायचं याबद्दल विचार केला.

ते पाटण्यात एक छोटी केमिकल कंपनी चालवायचे. तिथं औद्योगिक रासायनिक कॅल्शियम क्लोराइड बनवलं जायचं. हे सिमेंट पेंटमध्ये वापरलं जाणारं एक रसायन होतं. हे या पेंटवाल्या कंपन्यांना विकलं जायचं. पहिलं वर्षंभर चांगला चालला होता.

यातुन त्यांची पाटण्यातील काही छोट्या भांडवलदारांशी ओळख झाली होती. जे की सिमेंट पेंटची कंपनी चालवत होते. आणि उत्तमरीत्या हा व्यवसाय पुढे वाढवत होते.

यामुळे हेमंत यांनी पण या बद्दल विचार केला की जर हे चांगलं करु शकतात तर आपल्याला त्यातील माहिती आहे आपण पण चांगलं करु शकतो. हाच धागा पकडून त्यांनी पुण्यात २००० साली आपली पेंट कंपनी उभारली. एक लाख रुपये भांडवलं गुंतवलं.

नाव दिलं इंडिगो पेंट.

याचा सगळा कच्चा मालं हा जोधपूरमधून यायचा, त्यामुळे तिथं एक इंडस्ट्रियल शेड भाड्यानं घेतं लोअर-अनॅअड सिमेंट बनवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी व्यापार बऱ्यापैकी चालल्यानं एका वर्षातच हेमंत यांना तब्बल ८० लाख रुपयांची उलाढाल झाली

हा व्यवसाय फुलत असतानाच हेमंत यांनी पाण्यावर बेस असणारे पेंट तयार करायला सुरुवात केली. पेंट उद्योग चांगलाच भरभराटीस येवू लागल्यानं कंपनीनं प्रत्येक वर्षी एका नव्या राज्यात आपल्या पेंटची मार्केटिंग सुरु केली.

त्यांच्या याच कार्याचं फळ म्हणजे इंडिगो पेंटचा तयार झालेला विश्वसनीयन ब्रँड. 

एकदा हेमंत यांना त्यांच्या केरळच्या एका कर्मचाऱ्यानं विचारल, मी एका वर्षात १ कोटी रुपयांची विक्री केली तर मला काय मिळणार? यावर हेमंत यांनी विचारलं, काय हवंय? कर्मचाऱ्यानं तात्काळ उत्तर दिलं.

मला मोटारसायकल हवीय. हेमंत यांनी लगेच कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली.

पुढे खरोखरच त्या कर्मचाऱ्यानं एका वर्षात १ कोटी रुपयांचा व्यवसात दिला. हेमंत जालान पण दिलेल्या शब्दाला जागले आणि त्या कर्मचार्याला मोटारसायकल भेटं दिली. पुढे त्या कर्मचाऱ्याला मोठ टार्गेट देतं मोठ बक्षीस ही देण्याचं आश्वासन दिलं.

यामुळे हेमंत यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सहकाऱ्यांना प्रोत्सहान देणं गरजेचं आहे. तेंव्हापासून त्यांनी दरवर्षी प्रोत्साहनपर कार्यक्रमाचं आयोजन करायला सुरुवात केली. कर्मऱ्यांना टार्गेट द्यायला सुरू केल आणि टार्गेट पूर्ण झाल्यावर बक्षीस देण्याचा ट्रेंड सुरु केला.

याचाचं परिणामी हेमंत यांच्या कंपनीच्या व्यवसायात तब्बल ५० टक्के वाढ झाली.

सध्या कंपनीनं विस्तार करण्यावर भर दिला आहे. २०१४ पासून सिकोईया कंपनीनं इंडिगो पेंटमध्ये तब्बल १४० कोटींची गुंतवणूक केली आहे. तसचं मध्यंतरी केरळमधील एक मध्यम आकाराच्या एका पेंट कंपनीचं अधिग्रहण केलं आहे.

याच विस्तारीकरणाचा भाग म्हणजे जाहिरातीवर लक्ष्य केंद्रित करुन कंपनीनं २०१८ मध्ये महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रॅन्ड ॲम्बॅसिडर म्हणून करारबद्ध केलं होतं.

मध्यंतरी इंडिगो पेंटने आपली कंपनी शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड करत आयपीओ काढला होता.

त्यातुन जवळपासं त्यांनी ३०० कोटी रुपये जमवले आहे. सोबतचं तमिळनाडूच्या पुदुक्कोट्टईमध्ये पाणी आधारित पेंटच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन मॅन्युफैक्चरिंग युनिट सुरु करण्याच्या विचारात आहे.

आजही या कंपनीचं मुख्यालय पुण्यात आहे. २०२० या आर्थिक वर्षात ६२५ कोटींच्या उलाढालीची नोंद केली होती. ज्याच्यात ४८ कोटी रुपयांचा शुद्ध नफा होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.