ऑपरेशनसाठी इंदिरा गांधींची मदत नाकारली आणि पैसे पंतप्रधान निधीत जमा करण्यास सांगितलं.

२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता. खुद्द आचार्य विनोबा भावेंच्या सारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व देखील अनुशासन पर्व म्हणत या आणीबाणीचा पुरस्कार करत होते.

या आणीबाणीला ठासून विरोध केला तो जयप्रकाश नारायण यांनी.

७१ च्या युद्धातील विजयामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचलेल्या इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये कसा भ्रष्टाचार बोकाळला आहे याचे जाहीर वाभाडे काढत आंदोलने सुरु करणारे सुद्धा जयप्रकाश नारायणच होते. आपलं अख्ख आयुष्य गांधी वाद आणि काँग्रेसच्या विचारांवर काढलेल्या जेपीनां स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आपल्या मूल्यांपासून भरकटत चालली आहे असं वाटत होतं. इंदिरा गांधींच्या काळात तर सगळी नीतिमत्ता मोडली गेली असं मानत त्यांनी लोक चळवळी सुरु केल्या.

जेपींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाला घाबरूनच इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निर्णय घेतला होता असं म्हणतात.

आणीबाणीच्या काळात त्यांच्या सरकारने प्रचंड दडपशाही केली. सर्व विरोधकांना तुरुंगात टाकले. वृत्तपत्रांना बंदी घातली, अगदी आपल्या पक्षातील मंत्र्यांवर देखील सरकारी निर्णया विरुद्ध न बोलण्याचे आदेश दिले होते. आणीबाणीच्या या काळ्या कालखंडाचे मध्ये सुरु झालेल्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे खरे हिरो लोकनायक जयप्रकाश नारायण हेच होते. त्यांना देखील इंदिरा गांधींनी अटकेत टाकलं होतं.

मुंबईत अटकेत असताना जयप्रकाश नारायण यांची प्रकृती खालावली. ५ नोव्हेम्बर १९७५ रोजी त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. त्यांच्या तब्येतीची प्रचंड हेळसांड होत आहे हे पाहिल्यावर सरकारच्या कठोर हृदयाला पाझर फुटले आणि जेपीनां पॅरोल वर सोडण्याचे आदेश देण्यात आले.    

त्यांची रवानगी तातडीने मुंबई मधील जसलोक रुग्णालयात करण्यात आली. तिथे जेपींच्या सोबत त्यांची देखभाल करण्यासाठी एस एम जोशी थांबले होते. त्यांची ती अवस्था बघून तिथले डॉक्टर मंडलिक एसेम याना म्हणाले,

“जेपी फार काळ जगतील असं वाटत नाही.”

एसेम जोशी यांना धक्काच बसला. आणीबाणी विरुद्धचा लढाईची शेवटची आशा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला काहीही झालं तर भारताच्या लोकशाहीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार होते. जेपींचा एकेक श्वास महत्वाचा होता.

जसलोक मधल्या डॉक्टर्सनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस सुरु होते. त्यावर त्यांचं प्राण कसबस वाचवण्यात डॉक्टरना यश आले. मात्र जेपींच्या मूत्रपिंडाचे कार्य पार पाडण्यासाठी एक विशिष्ट यंत्र मागवावे लागणार होते. त्यासाठी भली मोठी रक्कम आवश्यक होती.

एस एम जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ लाख रुपये गोळा केले. पंतप्रधान इंदिरा गांधींना जेव्हा जेपींचे ऑपरेशन व इतर खर्चासाठी पैशांची आवश्यकता आहे हे कळलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यातून ९० हजार रुपयांचा चेक जसलोक रुग्णालयाकडे पाठवून दिला.

मात्र ज्या इंदिरा गांधींच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरु आहे त्यांची मदत कशी घ्यायची हा प्रश्न एसेम जोशी व इतर कार्यकर्त्यांना पडला. जयप्रकाश नारायण यांच्या कानावर जेव्हा हे पडलं तेव्हा त्यांनी थेट इंदिरा गांधींना पत्र लिहिलं,

“आपल्या मदती बद्दल आभार. पण या पैशांचा वापर पंतप्रधान निधीतील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केला जावा.”

आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत जयप्रकाश नारायण यांनी स्वाभिमान जपला. तत्वांची बांधिलकी ही इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्वाची मानली. स्वतः एस.एम.जोशी यांनी हि आठवण आपल्या चरित्रामध्ये सांगितली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.