मराठेशाहीतील सर्वात पराक्रमी साडे-तीन फाकड्यांमध्ये एका इंग्रजाचाही समावेश होता.

पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे आणि साडेतीन फाकडे प्रसिद्ध होते.. साडेतीन शहाण्यामध्ये होते सखाराम बापू, जिवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हा अर्धा शहाणा. नाना फडणवीसला युद्धकलेत निपुण नसल्यामुळे अर्धा शहाणा ही पदवी होती. तर साडे तीन फाकडे होते कन्हेरराव एकबोटे, मानाजी शिंदे , कोन्हेरराव पटवर्धन आणि इष्ठूर हा अर्धा फाकडा.

हा इष्ठूर कोण होता? फाकडा म्हणजे काय असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर चला ही अर्ध्या फाकड्याची कथा नेमकी काय हे जाणून घेऊया.

साल होतं १७७८. पेशवाईच्या गृहकलाहाचा काळ. नारायणराव पेशव्याचा खून घडवून आणणाऱ्या रघुनाथराव पेशव्याने बंड पुकारलं होतं. तो पेशवाईची गादी आपल्याला मिळावी म्हणून इंग्रजांना जाऊन मिळाला.  या भाऊबंदकीचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा विनाश करायचा इंग्रजांनी बेत केला होता. प्रचंड मोठं इंग्लिश सैन्य पुण्यावर चाल करून आलं.

अटकेपार झेंडा लावणारा पराक्रमी राघोबादादाचा अनुभवी मार्गदर्शनाचा वापर करून पुणे सहज जिंकता येईल असं इंग्रजांना वाटत होत. मात्र त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये एक माणूस उभा होता.

महादजी शिंदे.

बारभाईचा कारभार पाहणाऱ्या नाना फडणवीसांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवत होळकर, शिंदे, नागपूरकर भोसले या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या गेल्या. हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर वगैरे  सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. महादजी शिंदे त्यांचं नेतृत्व करत होते.

इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे होते, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते.

याशिवाय सर्व सैन्याला मदत करण्यासाठी पुढे चाल करुन जाणारी बिनीच्या सैन्याची एक वेगळी तुकडी केली होती. तिचे नेतृत्व होतं कॅप्टन जेम्स स्टुअर्टकडे.

जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार कुशल योद्धा होता. त्याला मुंबईहून पुण्यापर्यंतच्या सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊन बोरघाट चढून वर येऊन पोहोचला.

त्याने खंडाळयाच्या उंच टेकडीवर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे निशाण फडकवले.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धास प्रारंभ झाला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाले होते. मराठयांच्या तोफखान्याचा मुख्य सेनापती होता भिवराव पानसे.

मराठा तुकडीमध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. शिवाय महादजी शिंदेंच्या खास तुकड्यानी गनिमी काव्याने घाटातील जंगलात  ब्रिटीशांना परेशान करून सोडले होते.

एवढे असूनही कॅप्टन स्टुअर्ट याने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व मराठा तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली.

मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजातील गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये कॅप्टन स्टुअर्टच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. या कॅप्टन स्टुअर्टचा उल्लेख इष्ठूर म्हणून केला जायचा. सेनापती महादजी शिंदेना देखील त्याच्या युद्धचातुर्याचे कौतुक होते. त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं विशेष लक्ष होत.

४ जानेवारी १७७९ रोजी अशाच एका निकराच्या चकमकीमध्ये स्टुअर्टला तोफेचा गोळा लागला. यात त्याचे धड एकीकडे आणि मस्तक एकीकडे जाऊन पडले. त्याच्या वीरमरणाची बातमी कळताच महादजींच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,

“इष्टुर फांकडया शाबास !! ”

फाकडे म्हणजे पराक्रमी. कॅप्टन स्टुअर्टला तेव्हा पासून पेशवाईतील साडे तीन फाकड्यापैकी एक म्हणून ओळखल जाऊ लागल.  

१२ जानेवारी १७७९च्या रात्री महादजी शिंदेनी वडगाव मावळच्या लढाईत ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. कंपनी सरकार सोबतच रघुनाथराव पेशव्यांनासुद्धा मराठी सत्तेने चांगलाच धडा शिकवला होता. त्याला महादजी शिंदेनी आपल्या ताब्यात घेतले.

या युद्धामुळे दिल्लीपर्यंतच्या सर्व शत्रूंना कळले होते मराठा सत्तेची विस्कटलेली घडी आता महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली परत बसवण्यास सुरवात झाली आहे.

आपल्या शत्रूचाही सन्मान करावा ही छत्रपती शिवरायांचा वारसा महादजी शिंदेनी देखील सांभाळला होता. त्यांनी इष्ठूर फाकड्याच्या शौर्याची आठवण म्हणून त्याची समाधी देखील बांधली. ही समाधी वडगावात सध्या पोलीस स्टेशनच्या आत एका रुम मध्ये बंदिस्त आहे. या शिवाय त्याचे शीर जिथे धडापासून वेगळे झाले तिथे सुद्धा एक समाधी उभी केली गेलेली आहे.

मध्यंतरीच्या काळात इष्ठूर फाकड्याच्या समाधीला गावात तो फक्कडबाबा म्हणून ओळखल जाऊ लागलं.

त्याच्या बद्दल अनेक दंतकथा पसरल्या. त्याचे भूत रात्री-अपरात्री वाटसरूनां छळते अशी अफवा पसरली. त्याची पूजाअर्चा होऊ लागली. काही अडाणी नवस देखील बोलू लागले.

download

मात्र मागच्या काही वर्षात काही संशोधकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे कमी झालेले दिसते. याच्या ऐवजी वडगावात पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाचा विजयदिन साजरा केला जातो. या गावात महादजी शिंदे यांचा पुतळा व विजय स्तंभदेखील उभा केला आहे.

काही वर्षापूर्वी द लव्हर्स या हॉलीवूडच्या इंग्रजी चित्रपटात या इष्ठूर फाकड्याच्या कथेचा उल्लेख केला गेलेला आहे. या सिनेमात बिपाशा बसू व अतुल कुलकर्णी यांनी अभिनय केला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.