राडा होईल असं वाटत होतं, पण सगळं शांततेत कसं पार पडलं..?
परवा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती, ऑफिसला येतानाच दोन डबे घेऊन आलो, म्हणलं नवं सरकार बाकांवर बसणार, जुनं सरकार मेरे बदले की आग दाखवणार, या राड्यात उशीर झाला तर जेवायचे वांदे व्हायला नको. पण दुसरा सोडा पहिला डबाही ऑफिसमध्ये उघडण्याची वेळ आली नाही. कारण आमदार बसमधून आले, निवांत निवडणूक झाली, नार्वेकर अध्यक्ष झाले, विषय एकदम सुमडीत डन.
मग आला कालचा दिवस, आज पुन्हा दोन डबे भरले, कारण बहुमत चाचणी शांततेत होईल हेच मनाला पटत नव्हतं. शिवसेना आज सुट्टी देत नसती, पाच-सहा आमदार परत आणणार, फुल राडा होणार असा कट्ट्यावरचे राजकीय पंडित अंदाज लावत होते. पण आज तरी काय वेगळं झालं ? बंडखोर आमदार बसमधून आले, येता येता शिवसेनेच्या संतोष बांगर यांना घेऊन आले. तिकडं काँग्रेसवाले इतके निवांत होते, की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना यायला उशीर झाला, तर प्रणिती शिंदे आणि जितेश अंतापूरकर घरगुती कारणानं बहुमत चाचणीला आलेच नाहीत.
शिवसेना नेत्यांनी भाषणं तर केली, पण त्यात आक्रमकता नव्हती. राष्ट्रवादीकडूनही एकट्या अजित पवारांनी खिंड लढवली. हे सगळं सोडा, ज्यांचं विधानसभेतलं भाषण गाजतं ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही निवांतच होते.
आता साहजिक प्रश्न उभा राहतो, काय राडा नाही, काय वादळ नाही, महाराष्ट्राचं विधानसभा अधिवेशन एवढं शांततेत कसं काय होऊ शकतंय..?
या शांततेची सुरुवात, शपथविधीपासूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आधी आपण मंत्रीमंडळात असणार नाही असं सांगितलं आणि काहीच वेळात त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सहज पार पडली आणि नेत्यांची अभिनंदनपर भाषणं झाली.
या भाषणांमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं, तर अजित पवार यांनी भाजप नेत्यांना शालजोडीतून टोमणे मारले. भाजप नेत्यांच्या भाषणातही हाच शालजोडीतला पॅटर्न दिसून आला.
बहुमत चाचणीच्या दिवशीही फार विशेष खडाजंगी पाहायला मिळाली नाही, काँग्रेसचे काही आमदार उशिरा पोहोचले आणि काही आलेच नाहीत. अजित पवारांनी बंडखोर आमदारांना मिळालेल्या निधीचे आकडे वाचून दाखवले, तर सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कारभारावर टीका केली.
पण या सगळ्यात कुणाची शांतता अधिक जाणवली, ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना यांची.
विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, आपल्या अखेरच्या भाषणात त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहनही केलं. त्यानंतर, बंडखोर आमदार मुंबईत परतले आणि कुठेही शिवसैनिक आक्रमक झाले नाहीत.
त्यात बंडखोर आमदार मुंबईत परतल्यानंतर उद्धव ठाकरेंना येऊन मिळतील असा अंदाज असताना बंडखोर आमदारांविरुद्ध रान उठवणारे, उद्धव ठाकरेंसाठी रडणारे आमदार संतोष बांगर यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इतक्या सहज गट बदलला, तरीही शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं नाही.
आपल्या बंडखोर आमदारांविषयी सभागृहातल्या भाषणांमधून आवाज उठवायची संधी असताना, भास्कर जाधव वगळता शिवसेना आमदारांनी काहीशी सौम्य भूमिका घेतली.
प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव या बंडखोर शिवसेना आमदारांच्या निकटवर्तियांवर ईडीची कारवाई सुरू आहे. या दोघांनी जेव्हा बहुमत चाचणीत आणि अध्यक्षपद निवडणुकीत आपलं मत नोंदवलं, तेव्हा शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी ईडी असा गजर केला, ते वगळता सभागृहात तरी बंडखोर आमदारांना विरोध केल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही.
बहुमत चाचणीनंतर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. ते म्हणाले, ‘गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्रजींची भाषणं ऐकतोय, ते काहीसे शांत झाले आहेत.’
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी अनेकदा सभागृहातल्या भाषणांमधून महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं होतं. मग ते सचिन वाझे प्रकरण असेल, मनसुख हिरेन प्रकरण असेल किंवा पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण.
सत्तेत आल्यानंतर फडणवीस आणखी आक्रमक होतील अशी अपेक्षा अनेकांना होती, मात्र तसं पाहायला मिळालं नाही.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच्या भाषणात त्यांनी राहुल नार्वेकर यांची कारकीर्द सांगत त्यांचं कौतुक केलं, तर बहुमत चाचणीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीबद्दल त्यांनी फारसं भाष्य केलं नाही, पण हे नवं सरकार शिवसेना-भाजप युतीचं आहे, असा उल्लेख मात्र त्यांनी केला. सोबतच महाविकास आघाडीनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत जे निर्णय घेतले, ते निर्णय पुन्हा घेऊन पक्के केले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं.
आपल्या भाषणात फडणवीस यांनी आपल्या गाजलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या कवितेचा उल्लेख करत, ज्यांनी ज्यांनी माझी टिंगल केली त्यांचा मी बदला घेईन असं विधान केलं. पण लगेचच ते म्हणाले, ‘माझा बदल एवढाच आहे की, मी त्यांना माफ केलं.’ थोडक्यात कायम आक्रमक बाण्यानं सभागृहाला सामोरं जाणाऱ्या फडणवीसांनीही काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.
सदस्य आक्रमक होतील, सभागृहात राडा होईल अशी शक्यता असताना, सगळेच अचानक शांत कसे झाले, याची कारणं शोधण्यासाठी आम्ही काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली. त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार,
विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस हा अध्यक्षपद निवडणुकीचा आणि दुसरा दिवस बहुमत चाचणीचा असल्यामुळं वातावरण काहीसं निवांत होतं.
फडणवीसांच्या शांततेची कारणं पाहिली, तर आपलं राजकीय स्थान प्रचंड बळकट करण्याची संधी असताना केंद्रीय नेतृत्वानं त्यांना एक पाऊल खाली खेचलं. मुख्यमंत्रीपदाचं काम पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होणं कुणालाही पचणं काहीसं कठीण आहे.
यामुळे अनेक राजकीय नेत्यांकडूनही फडणवीसांची थट्टा केली गेली, त्यामुळं सध्यातरी फडणवीस वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं बोललं जातंय.
उद्धव ठाकरेंनीच शिवसैनिकांना शांत होण्याचा आदेश दिला, दुसऱ्या बाजूला आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय अजूनही आलेला नाही, व्हीप कोण काढणार याबाबतचा निर्णय सेनेच्या विरोधात गेलेला आहे. इतकंच नाही, तर बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत येतील अशी अपेक्षा असताना, संतोष बांगर यांनी थेट शिंदे गटाचाच रस्ता धरला आहे. त्यामुळं आधीच अडचणीत असलेली शिवसेना बॅकफूटवर गेली आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात काँग्रेसचे काही आमदार बहुमत चाचणीला उशिरा पोहोचले, तर काही अनुपस्थित राहीले. राष्ट्रवादीनं सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असल्याचा पुरेपूर फायदा उठवत राज्यपाल आणि भाजप-शिंदेगटाच्या आमदारांवर टीका केली, पण त्यातही आक्रमकतेचा सूर नव्हता, अशीही चर्चा आहे.
सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘हे सरकार कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील’ असं वक्तव्य केलं. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयही बाकी आहे. त्यामुळं सध्याच्या सरकार विरोधात फासे पडले, तर आणखी नामुष्की ओढवायला नको म्हणून सत्ताधारी गट आणि पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली, तर जास्तीत जास्त बंडखोर आमदारांना पुन्हा आपल्याकडं घ्यायला उत्सुक असल्यानं महाविकास आघाडी गट शांत असल्याचं बोललं जातंय.
म्हणूनच विधानसभेचं विशेष अधिवेशन शांततेत पार पडलंय, आता येणाऱ्या दिवसात ही शांतता कायम राहणार की वादळापूर्वीची शांतता ठरणार हे कोर्टाचा निर्णय आणि दोन्ही बाजूच्या चाणक्यांवर अवलंबून आहे.
हे ही वाच भिडू:
- चित्रपटसेना, कामगार सेना, युवा सेना अशा सेनेसोबत या ७ संघटनांची फुट देखील अटळ आहे
- या ४ गोष्टींवर ठरणार आहे, “महाविकास आघाडी” कायम राहणार की उडून छू होणार..!!!
- पहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष