७० हजार उधारीवर घेत गाड्यांचा व्यवसाय सुरु केला, आज विराट-रोहित त्याचे ग्राहक आहेत
भारतात सेकंड हॅन्ड गाड्या या किंमत कमी करूनच विकलेल्या असतेत आणि घेणारा ती निम्म्या किमतीतच खरेदी करत असतो, हे विधीलिखीत सूत्र. त्यामुळे यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवतं. त्याची कारण पण तशीच. गाडीचा झालेला वापर, घसारा असं सगळं वजावट करायचं असतं.
पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, भारतात एक असा उद्योगपती आहे जो याच सेकंड हॅन्ड गाड्या चांगल्या किमतीला खरेदी करतो आणि क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेत्री नेहा धुपिया वगैरे अशा सगळ्या दिग्गजांना विकतो, ते पण डबल, टिब्बल प्रॉफिट घेवून तर विश्वास बसलं का? पण होय हे खरयं.
उद्योगपती जतिन आहुजा यांनी यावर विश्वास ठेवायला भाग पाडलयं. आणि ते या व्यवसायातून लाखो नाही तर करोडो रुपये कमवतात.
त्यामुळे आता आहुजांचा नेमका कसला व्यवसाय आहे तो प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे, तर त्याच उत्तर म्हणजे त्यांची ‘बिग बॉय टॉयज’ नावाची कंपनी आहे. इथं ते काय करतात, तर ज्या वापरलेल्या मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू वगैरे अशा ब्रँडेड गाड्या असतात त्या खरेदी करून त्याला रिफर्बिश्ड (पुनर्निर्मिती) करतात आणि कोट्यवधीच प्रॉफिट घेऊन विकतात.
पण भिडूनों, कसं असतंय ना, कोणताही बिझनेसमन एका रात्रीत एवढं कोट्यवधींचं प्रॉफिट कमवायला लागलेला नसतो. त्यासाठी एक तर त्यांने आधीची बरीच वर्ष कष्ट घेतलेलं असतं, उन्हाळे – पावसाळे बघितलेले असतेत. मान मोडे पर्यंत काम केलेलं असतं. नाही तर काही जण हार्डवर्क ऐवजी स्मार्टवर्क या कन्सेप्टवर विश्वास ठेवतात, थोडी डोक्यालिटी वापरतात. जतिन आहुजा या दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती.
चार्टर्ड अकाउंटंटच्या घरी जन्म झालेल्या जतिन यांना लहानपणीच रिफर्बिश्ड व्यवसायातील मेख कळली होती. म्हणूनच वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी या व्यवसायात उडी घेतली. २००५ मध्ये मुंबईतली अतिवृष्टी आणि महापूर आठवतोय? याच महापुरात खराब झालेली एक मर्सिडीज एस क्लास त्यांनी विकत घेतली आणि तिला रिफर्बिश्ड करून चांगल्या प्रॉफिटवर विकली.
मग काय, घराणेशाही नाकारत सीएच्या मुलानं मॅकेनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्यासोबतच एमबीए पण केलं. यानंतर आपलं बिझनेसचं जे मॉडेल होतं त्यावर काम करायला सुरुवात केली. ऑटो इंडस्ट्रीजमधल्या संभाव्य गोष्टींवर चर्चा, रिसर्च आणि ग्राउंडवर्क केलं. तसचं जे लोक गाड्यांचे शॉकिन होते त्यांना भेटले, हेच शॉकिन कालांतराने त्यांचे ग्राहक झाले.
कॉलेज होईपर्यंत मर्सिडीजमधून जे पैसे कमावले होते ते तर संपले होते, पण न थांबता त्यांनी वडिलांकडून ७० हजार रुपयांची उधारी घेतली आणि २००९ साली दिल्लीत एक छोटासा स्टूडिओ सुरु केला. नाव दिलं ‘बिग बॉय टॉयज’. इथं सुरुवातीला त्यांनी अगदी मॅकेनिक पासून जे गरज पडेल ते काम केलं.
तेव्हा पासून आज पर्यंत बीबीटीनं भारतातील वेगवेगळ्या शहरातील कमीतकमी ६ हजार लोकांपर्यंत आपल्या गाड्या पोहचवल्या आहेत.
जतिन या एका व्यक्तीपासून सुरुवात झालेल्या बीबीटीमध्ये आज त्यांच्यासोबत जवळपास १५० जणांची टीम काम करते.
प्री-ओन्ड लक्झरी गाड्यांचं वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून त्यांच्या शोरुमला ओळखलं जात. त्यांच्या गुरुग्रामच्या शोरूममध्ये एकाच छताखाली ५० लाखांपासून ५ कोटीपर्यंतच्या गाड्या मिळतात. यात लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, एवेंटाडोर, बेंटले जीटी / जीटीसी, रेंज रोवर्स, एक्ससी 90 एक्सलेन्स लाउंज हाइब्रिड कार अशा देशी आणि परदेशी मिळून १८० ब्रँड्सच्या गाड्या उपलब्ध आहेत.
ग्राहकांकडून या सेकंड हॅन्ड गाड्या खरेदी करण्याच्या आधी बीबीटी प्रत्येक गाडीची इन्शुरन्स हिस्ट्री, सर्विस हिस्ट्री, आरटीओ रेकॉर्ड आणि कस्टमर प्रोफाइल असं सगळं चेक करते. २० हजार किलोमीटर पेक्षा जास्त रनिंग झालेली, २०१५ च्या आधीचं मॉडेल आणि कोणतीही ॲक्सिडेन्ट केस असलेली गाडी खरेदी केली जातं नाही.
उगीच कोण पण आलं समोर आणि गाडी घ्या म्हणून उभं राहिलं तर ते खरेदी करतं नाहीत. त्यामुळे बीबीटी ग्राहकांना एक विश्वास देण्यात यशस्वी झाली की, तुमची इन्व्हेंस्टमेंट योग्य ठिकाणी लागतं आहे.
विकण्यापूर्वी पण अगदी अशीच परीक्षा असते. बिग बॉय टॉयजला एक गाडी जवळपास १५१ पॉईंट चेक लिस्ट मधून पास होऊन जायला लागती. तरचं ती पुढं ग्राहकांना विक्रीसाठी ठेवतात.
त्यांच्या याच सगळ्या अटींमुळे ते सुरुवातीच्या दिवसात जपान, यूके, यूएस आणि दुबईमधून गाड्या मागवायचे. त्या त्यांना महाग पडायच्या, पण नफ्याचा विचार न करता ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर भर दिला.
त्यामुळे आज प्रत्येक वर्षी बिग बॉय टॉयजचा विस्तार ३० ते ४० टाक्यांनी वाढतो आहे. कंपनीचा टर्न ओव्हर ३०० कोटींच्या घरात जाऊन पोहचलायं. त्यांना आशिया खंडातील सगळ्यात प्रॉमिसिंग कार डीलर म्हणून CMO आशिया, सिंगापुरकडून रेकगनेशन देखील मिळालं आहे. ग्राहकांची यादी बघितली तर क्रिकेटर, राजकारणी, बॉलिवूड अशा या सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचा समावेश आहे. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा पण नंबर आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत तर सगळ्यांचा बाजार उठला असताना ‘बिग बॉय टॉयज’ सगळी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज हादरवून सोडली होती.
एप्रिल महिन्यामध्ये ऑटो इंडस्ट्रीजने आपल्या इतिहासात पहिल्यांदा शून्य विक्री रिपोर्ट केली होती, कोरोनाने सगळ्यांचा बाजार उठवला होता. पण या वेळीच बीबीटीने एक-दोन नाही तर तब्बल १२ आलिशान गाड्या विकून दाखवल्या होत्या.
यांच्यात मर्सिडीज़ बेंज एस 500 मॅबॅक, बीएमडब्ल्यू झेड 4 आणि पोर्शे अशा गाड्यांचा समावेश होता. त्यावेळी बीबीटीनं यातून १२ ते १३ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं सांगितलं होतं.
आता त्यांना यात काही अडचणी आल्याचं नाहीत असं काही झालं का? तर जतिन यांनी जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी ही इंडस्ट्री अगदीच अनऑर्गनाइज्ड होती, त्यामुळे त्यांना अनसर्टेन टॅक्सेज आणि त्यांचे बदलत राहणारे नियम या सगळ्या गोष्टींना समोर जावं लागलं. पण आपली दूरदृष्टी आणि येणारे अनुभव याच्या जोरावर सगळ्या समस्यांवर मात करत कंपनीला यशस्वी बनवलं आहे.
हे हि वाच भिडू.
- डाळिंब द्राक्षे असो किंवा हापूस, महाराष्ट्राच्या फळशेतीचं क्रेडिट या पंजाबच्या माणसाला जातं.
- ९० वर्षांपूर्वी एक मराठमोळी अभिनेत्री चक्क मर्सिडीज गाडीची मॉडेल होते
- गाडी चालवण्यावरून बायकांना चिडवताय पण इंडिकेटरचा शोध बायकांनीच लावलाय हे माहित आहे का?