त्यादिवशी जवागल श्रीनाथनं भारताकडून खेळायचं नाही म्हणून ठरवलं होतं, पण…..

९० च्या दशकाच्या सुरवातीला भारतीय क्रिकेट क्षेत्रात अनेक बदल घडून आले. कपिल देव, के श्रीकांत, रवी शास्त्री या दिग्गज लोकांनी क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याचवेळी युवा आणि नवोदित खेळाडूंचा उदयही झाला होता. या युवा खेळाडूंमधून भारताला एक असा वेगवान गोलंदाज सापडला चपटा कि ज्याच्या बॉलिंगने समोरच्या टीमला घाम फुटायचा.

जवागल श्रीनाथ.

भारताच्या ऑल टाइम टॉप गोलंदाजी मधला हुकुमी एक्का.

कर्नाटक मधून आलेल्या जवागल श्रीनाथने आपल्या बॉलिंगने कहर केला होता.

१९९१ साली भारतीय वनडे संघात त्याने जागा मिळवली आणि लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सीरिजमध्येही त्याच पदार्पण झालं.

१९९४ साली जगभरात जवागल श्रीनाथची चर्चा सुरु झाली होती. त्याच्या वेगाची सगळेजण तारीफ करायचे. १५४ किमी प्रति तास या वेगाने त्याने गोलंदाजी केली होती आणि सगळ्यांना अवाक केलं होतं. वसीम अक्रम, लान्स क्लुजनर, डोनाल्ड अशा मातब्बर गोलंदाजांपेक्षा वेगाने गोलंदाजी ही जवागल श्रीनाथची होती.

सगळं काही ठीकठाक आणि उत्तम प्रकारे चालू असताना जवागल श्रीनाथला संघातून अचानक डच्चू मिळाला. याबद्दल एका मुलाखतीत खुलासा करताना जवागल श्रीनाथने धक्कादायक घटना सांगितली होती, २००२ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी राष्ट्रीय निवड समिती अधिकाऱ्यांनी त्याला संघातून वगळलं होतं, त्याच शल्य आजही त्याला आहे.

या घटनेबद्दल तो सांगतो कि,

वर्ल्ड कपच्या अगोदर आम्ही वेस्ट इंडिज दौरा करणार होतो. त्यावेळी निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं कि आम्ही तुला ब्रेक देत आहोत.

जनरली काय होतं कि जेव्हा खेळाडूला विश्रांती हवी असते तेव्हा तो स्वतः निवड समितीला अर्ज देतो कि मला विश्रांती हवी आहे म्हणून पण इथं झालं उलटचं, निवड समितीने बळजबरीने मला ब्रेक दिला.

या घटनेने जवागल श्रीनाथ प्रचंड दुखी झाला. हे बळजबरीने ब्रेक देणं त्याला काही आवडलं नाही. आपलं क्रिकेट करिअर ऐन बहरात असताना कुणी दुसऱ्याने त्यात हस्तक्षेप करावा हे त्याला मान्य नव्हतं.

ही जबरदस्तीने ब्रेक देणारी घटना त्याला अस्वस्थ करून गेली आणि परत भारताकडून खेळायचं नाही म्हणून तो भारतीय संघ सोडून इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये खेळायला गेला. २००२च्या सिझनमध्ये तो कौंटी क्रिकेट खेळत राहिला. भारतीय टेस्ट संघात काय तो परतलाच नाही.

२००३ च्या वर्ल्डकपची सुरवात होणार होती. सौरव गांगुली कर्णधार होता. मॅच फिक्सिंगच्या सावटातून बाहेर पडून भारतीय संघ चांगलं क्रिकेट खेळत होता. वर्ल्ड कपच्या संघात बॅटिंगमध्ये सचिन, द्रविड आणि गांगुली होते पण नवख्या आशिष नेहरा आणि झहीर खानच्या जोडीला अनुभवी बॉलर म्हणून जवागल श्रीनाथच हवा हे गांगुलीला माहिती होतं.

जवागल श्रीनाथला भारतीय संघात परतण्याची विनंती गांगुलीने केली. भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांची कमी तूच भरून काढून शकतो म्हणून सौरव गांगुलीने त्याला खेळण्याची विनंती केली. 

जवागल श्रीनाथ इथं मात्र स्वतःला थांबवू शकला नाही. झाला गेला अपमान तो विसरून पुन्हा संघात परतला.

कौंटी क्रिकेट खेळण्यानंतर मॅटर शांत झाला होता आणि खास गांगुलीने विनंती केली आणि त्यातही वर्ल्ड कप म्हणजे प्रत्येक खेळाडूच स्वप्न असतं. एका पिढीचा वर्ल्ड कप खेळता येईल म्हणून मी पुन्हा संघात परतलो असं जवागल श्रीनाथने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आपल्या बॉलिंगने समोरच्या खेळाडूला बाद करणे एवढंच आपलं काम आहे हे जवागल श्रीनाथला पक्कं ठाऊक होतं. झालेल्या घटनांचा खेळावर परिणाम होऊन न देता त्याने वर्ल्ड कप खेळला तेही खास गांगुलीच्या आग्रहास्तव. पण टेस्टला झालेल्या अपमानामुळे तो परत भारतीय कसोटी संघात परतला नाही. 

जवागल श्रीनाथने ६७ टेस्ट सामन्यांमध्ये २३६ विकेट घेतल्या होत्या आणि वनडेमध्ये ३१५ विकेट घेऊन जगभर वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा दरारा होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.