सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीतच करेक्ट कार्यक्रम हा शब्द जन्माला आलाय.

आज सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुका होत्या. सत्ताधारी भाजपकडे संख्याबळ होते मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी आपली जादू चालवली. ऐनवेळी त्यांनी भाजपची सहा मतं फोडली तर त्यांचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर कुरघोडी करत राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर बनले.

आज सांगलीत एकच चर्चा होती,

जयंत पाटलांनी टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम केला.

करेक्ट कार्यक्रम. राजकारण वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या मतदारसंघाची आणि नेत्यांची पेटंट वाक्य असतात. प्रत्येकांची एक स्टाईल देखील पेटंट असते. म्हणजे कसं तर खतरनाक पद्धतीने आंदोलन करायचं असेल तर ते बच्चू कडूंनीच कराव. लोकांच्याकडून पैसे गोळा करुन निवडणूक लढवावी ती राजू शेट्टी यांनीच. जितके नेते तितक्या स्टाईल. 

अशी एक स्टाईल आणि शब्द राज्याच्या राजकारणात आणण्याचा मान जातो जयंत पाटलांना. 

तो शब्द म्हणजे “करेक्ट कार्यक्रम” 

राजकारणात करेक्ट कार्यक्रम हा शब्द जयंत पाटलांनी आणला. कृतीत आणि बोलण्यात दोन्हीकडे त्यांनी हा शब्द वापरला. राजकारण देखील त्याचप्रमाणे रचल. त्यामुळेच भर सभामध्ये जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम म्हणाले की, लोक टाळ्या शिट्यांचा कडकडाट करतात. 

आत्ता हे आत्ताच का, तर मागे काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे सुधीर गाडगीळ यांनी जयंत पाटलांची मुलाखत घेतली. या मुलाखतीला एक तुकडा तुफान व्हायरल झाला. तो हा व्हिडीओ,

यात जयंत पाटील म्हणतात लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते. आपल्या टप्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच… 

कार्यक्रम म्हणजे काय. तर सांगली कोल्हापूरच्या भाषेत कार्यक्रम या शब्दाचा अर्थ वेगळा असतो.

म्हणजे एखादा मुलगा चांगली गाडी घेवून आला आणि त्याने विचारलं कशी दिसते गाडी तर पुढचा म्हणेल “शेवट”. शेवट या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्रासाठी वेगळा पण इथे शेवटचा अर्थ खूप छान असा होता. असाच कार्यक्रम शब्द. कार्यक्रम म्हणजे लग्नसमारंभ, एखादा उत्साह वगैरे असू शकतो पण या भागात कार्यक्रमाचा अर्थ समोरच्याची संपुर्ण वाट लावणे. 

हा शब्द जयंत पाटलांनी पहिल्यांदा वापरला तो २००९ साली.

सांगली महानगरपालिकेवर वसंतदादा पाटील गटाची सत्ता होती. सांगली शहरावर सुरवातीपासूनच वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटूंबाचे वर्चस्व राहिल्याने कोणत्याही पद्धतीने सांगली महानगरपालिकेत राष्ट्रवादी अर्थात जयंत पाटलांना हस्तक्षेप करण्याची चिन्ह नव्हतं. 

पण २००९ साली सांगली महानगरपालिकेवर आपली सत्ता आणायची म्हणून त्यांनी कंबर कसली. जाहिर सभांमधून करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला जावू लागला. या निवडणुकीतच हा शब्द तुफान गाजला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लामपूरवरुन आलेल्या जयंत पाटलांची हवा सुरू झाली ती याच शब्दामुळे. दादा घराण्याला थेट विरोध करण्याची कारणे इतिहासात लपली होती.

अशा वेळी अस्मितेवर निवडणुक घेवून जाण्याच्या ऐवजी जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम शब्दातूनच करेक्ट कार्यक्रम केला. 

वसंतदादा घराणे विरुद्ध जयंत पाटील अशी किनार या इलेक्शनला असल्याने ही इलेक्शन महाराष्ट्रात गाजली आणि त्याचसोबत करेक्ट कार्यक्रम हा शब्द देखील.

त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत जयंत पाटलांनी हा शब्द वापरण्याचा प्रयत्न करुन पाहीला पण विरोधकांकडूनच जयंत पाटलांना जाळ्यात पकडण्याचा म्हणावा तितका टोकाचा प्रयत्न झाला नाही. 

गेल्या  वर्षी इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद जयंत पाटलांच्या विरोधी गटाकडे अर्थात भाजपकडे गेलं. जयंत पाटील यंदा तरी तावडीत घावू शकतील म्हणून जिल्ह्यातील नेत्यांनी कंबर कसली. तरिही जयंत पाटील राज्याच्याच राजकारणात सक्रीय दिसत होते.

यंदा वार फिरवून दाखवू म्हणून चर्चा सुरू झाल्या इतक्यात जयंत पाटीलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आपला ठेवणीतला डॉयलॉग बाहेर काढला, 

करेक्ट कार्यक्रम.

वाळवा विधानसभा जयंत पाटलांनी राखलीच  शिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजप चंद्रकांतदादा पाटील यांना रोखण्याचा विडा उचलला. गेल्या वर्षभरात त्यांनी पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीत हे दाखवून दिलंच होतं पण आज सांगली महानगरपालिका भाजपच्या हातातून हिसकावली आणि टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम हा शब्द खरा करून दाखवला.

  • भिडू संतोष कनमुसे 

    हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.