जेट एअरवेज बुडाली, कॉंग्रेसच्या काळात पण कंपन्या बुडत होत्याच की.

बुधवारच्या रात्री जेट एअरवेजचा ट्विट आला. लोकांना कळालं की कंपनी बुडाली. म्हणणारे म्हणले कॉंग्रेसच्या काळात अस नव्हतं. आत्ता आपण तटस्थ असल्यानं आपण काही राजकीय विषय काढणार नाही. पण लोकांची तोंड गप्प कोण करणार. लोकांनी लगेच चालू केलं की, 

अहो हे मोदींमुळ झालं. दूसरीकडे हे तर कॉंग्रेसच काम आहे. त्यांच पाप मोदींना भोगाय लागलं असं म्हणणारे आले. तिसऱ्या बाजूला अरे तस नसतय रे सांगणारे आले. पण कोणच चांगल्या वाटणाऱ्या कंपनीच दिवाळं का वाजलं ते सांगायला तयार नव्हते म्हणूनच आम्ही म्हणलो, सांगाव बाबा नेमकं काय झालं ते. 

तर तात्कालिक कारण म्हणजे अगोदरच कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजला ४०० कोटी रुपयांच इमरजेंसी फंड पाहीजे होता. तो काही मिळाला नाही आणि कंपनीने आपली कामे थांबवली. लागलीच १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. 

आत्ता सांगितलं जातय की नरेश गोयल यांच्या चुकांमुळं हे सगळ कांड झालं. नरेश गोयल कोण तर जेट एअरवेजचे माजी CEO. त्यांच्यामुळेच कंपनीवर ८००० पेक्षा जास्त कोटी रुपयांच कर्ज झालं होतं. 

आत्ता त्यांच्या चूका कोणत्या ते आपण पाहूया. 

पहिलं कारण सांगतात ते म्हणजे त्यांनी एअर सहारा जरा लईच महाग किंमतीत विकत घेतली.  एअर सहारा गोयलांनी साडेतीन हजार कोटीला विकत घेतलेली. जेवढी गुंतवणूक केली तेवढी रक्कम त्यांनी वसूल करता आली नाही अस वरचेवरच हिशोब मांडणारे सांगतात. 

जेट एअरवेज काय ढगातच असायची, म्हणजे इंडिगो, स्पाइस जेट, गो एअरलाईन्स असल्या कंपन्या माणसांच्या खिश्याचा अंदाज घेवून तिकीट लावायच्या पण जेट एअरवेजला असले हिशोब कळत नव्हते. ते नेहमीच आकाशातल्या गप्पा करायचे. 

आत्ता जूनी कंपनी विकत घेतली की म्हणजे त्यांना ती परवडत नसणार असा एक हिशोब असतो. दूसरा हिशोब म्हणजे ते कुठे चुकलेत हे बघून आपणाला डाव टाकायचे असतात. पण इथे गोयलांकडून घोळ झाला अस सांगण्यात येतय. रिस्ट्रक्चरिंग नावाची गोष्ट त्यांनी केली नाय म्हणे. 

रंजन कोळंबेंच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात बेरोजगारीच्या प्रकारात छुपी अथवा प्रच्छन बेरोजगारी नावाचा प्रकार होता/ आत्ताही असू शकतो. म्हणजे काय तर एका ठिकाणी चार माणसांची गरज असताना सहा माणसं काम करत असतील तर वरचे दोन छुपे बेरोजगार. स्पाईस जेटचं पण असच होतं. दूसऱ्या कंपन्या कमी कामगारांवर विमान उडवत असताना हे मात्र भरपूर पुरेपुर स्टाफ घेवून विमान उडवत होते. 

2010 पासून तोटा वाढत होता. आणि हे कर्ज काढत होते. तोटा कमी व्हावा म्हणून विशेष कुठलेच प्रयत्न केले नाहीत अस सांगतात. 

आत्ता महत्वाचा मुद्दा पुढे काय होणार. 

विशेष काही नाही जे किंगफिशरचं झालं ते जेटचं होण्याची जास्त शक्यता आहे. जेट एअरवेजचे कर्मचारी आत्ता कोर्टात जातील. कर्मचारी, सर्व्हिस देणारे लोकं, विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्या अशी जेट एअरवेज सोबत संबधीत असणारे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या केसमध्ये जेट एअरवेजला कोर्टात उभा करतील. 

जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एतिहाद एअरवेज, नॅशनल इनव्हेस्टमेंट एंड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, प्राईवेट इक्विटी फर्म TPG कॅपिटल आणि इंडिगो कंपनीला शॉर्टलिस्ट केलं होतं पण याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नव्हता. आत्ता जेट विकत घेण्यासाठी कोणी नवीन माणूस मार्केटमध्ये आला तर पुढे प्रोसेस जाईल नाहीतर जे आहे ते विकून हम तों फकिर आदमी हैं झोला उठाकें उडं जाऐंगे चं धोरण जेट एअरवेजला स्वीकारावं लागणार आहे. बाकी कंपनी स्वत:च्या कर्माने आणि चुकांमुळे बुडते हेच खरं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.