झुमता हिंदुस्थान…..

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या संदर्भातून अमली पदार्थ आणि गांजा हा विषय चर्चेत आल्याने, साहिल कल्लोळी यांनी या विषयावर दिव्यमराठी दिवाळी अंकासाठी लिहलेल्या लेख साहिल कल्लोळी यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहोत.

एक जग असतं, डोळ्यांना दिसणारं. एक जग असतं, डोळ्यांना न दिसणारं. डोळ्यांना सहसा न दिसणाऱ्या या जगात गांजा ऊर्फ अफू नामक अमलीपदार्थाचा उघड-छुपा व्यवहार चालतो. अगदी आसेतू हिमालय, कन्याकुमारी टु काश्मीर म्हणता येईल असा. अफू औषधांतही वापरली जाते, खाद्यपदार्थातही टाकली जाते आणि तिन्ही त्रिकाळ नशेसाठीही वापरली जाते.

नशेबाजीचा हा मार्ग सिक्रेटिव्ह आणि सर्वात चर्चेचा ठरतो.

अधिकृतरित्या भारतात काही विशिष्ट भागात अफू उगवली जाते, अधिकृतपणे परवाना घेऊन तिचं सेवनही केलं जातं. पण उत्तर आणि ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांत अफूचं बेधडक बेकायदेशीर पीक घेतलं जातं. इथूनच अफूचा गुन्हेगारी विश्वातही प्रवेश होतो. याचा देशभर दररोज कोट्यवधींचा व्यवहार होतो.

हा सारा  व्यवहार जितका धोकादायक तितकाच थरारकही असतो. पावला-पावलावर इथे सावधगिरी बाळगावी लागते. सर्वसामान्य माणसाला या साऱ्या विश्वाची केवळ एकीव माहिती असते किंवा काही दंतकथा त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात.

त्या साऱ्याचा हा विहंगम प्रवास…

कॅनाबिज, हेम्प, गांजा नावाची वनस्पती, फार पूर्वीपासून मानवी संस्कृतीचा महत्वाचा भाग राहिली आहे. ख्रिस्तपूर्व १०,००० काळातील जपानमधील गुहाचित्रे, चीनमधील मृतांना पुरण्याच्या परंपरा, इराणमधील झेंड अवेस्ता, भारतातील वैदिक साहित्य, इजिप्तमधील देवी सेशातच्या डोक्यावरचे चिन्ह या आणि अशा अनेक ठिकाणी आपल्याला गांजाचा संदर्भ मिळतो.

सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये कॅनाबिजचा सहभाग किती या प्रश्नाला अजून तरी कोणतेही ठोस शास्त्रीय उत्तर नाही, पण आजपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश सर्व मानवी संस्कृतीमध्ये या वनस्पतीचा वापर हा पुन्हा पुन्हा आढळून आला आहे. मग तो वापर कापड उद्योगासाठी, औषधासाठी, धार्मिक वा अध्यात्मिक असेल. त्याचे महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.

कॅनाबिज उर्फ हेम्प, मारिज्युआना, हशिश, भांग, चरस आणि गांजा ही एकाच गोष्टीची वेगवेगळी रूपं,नावं. अनेकांना ही नावं माहीत असतात, अनेकांना नाही. पण हे ज्यापासून तयार होतं त्याच मूळ एकचं, कॅनाबिज!

त्याला आपण गांजाचे किंवा भांगेचे रोप म्हणू शकतो, पण शास्त्रीयदृष्ट्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. गांजा हे फिमेल प्लांट आणि भांग मेल प्लांट. हे प्यायल्याने जी नशा निर्माण होते, त्याच्यासाठी कारणीभूत असते, टेट्राहायड्रोकॅनाबिनोल उर्फ THC, तर गांजा आणि भांग या दोन्हीमध्ये याचे प्रमाण वेगवेगळे असते. तसेच हेम्पचे रोप म्हटले, तरी ते योग्य ठरणार नाही. कारण, या हेम्पमध्ये नशा निर्माण करणारे THC हे ०.३ पेक्षा कमी असते, थोडक्यात याचा नशेसाठी वापर होत नाही. यामधून उच्च प्रतीचे फायबर मिळते, ज्यापासून धागे निर्माण केले जातात. त्यामुळे या सर्वांना कॅनाबिज फॅमिलीचा भाग म्हणणे जास्त योग्य ठरेल.

यापैकी आपल्याला म्हणजे भारतीय उपखंडात राहणाऱ्या लोकांना चरस, भांग किंवा गांजा ही नावे काही नवीन नाहीत. समाजातल्या विविध घटकांमध्ये ही नावे वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक अंगाने पोहोचली आहेत. शिवरात्री, होळी या विविध सणांच्या संदर्भात ही नावे आपण ऐकली असतात. हे सारे पदार्थ सुमारे २,००० वर्षापूर्वीपासून आपल्या संस्कृतीचा भाग मानले गेले. आपल्याकडचे मूळ शोधायचे झाले, तर आपण अथर्ववेदापर्यंत जाऊन पोहोचतो.

 

पञ्च राज्यानि वीरुधां सोमश्रेष्ठानि ब्रूमः।

दर्भो भङ्गो यवः सहस्ते नो मुञ्चन्त्वंहसः
अथर्ववेदः / काण्डं ११ / सूक्तम् ०८
पैप्पलादसंहिता / काण्डम् १५

त्याचा साधारण अर्थ असा, दर्भ, भांग, जव(सातू) यासह सोम ही पवित्र वनस्पती आहे, ज्यामध्ये सोम सर्वोच्च आहे. या पवित्र औषधी वनस्पती आपल्याला सर्व दुःखांपासून वाचवतात.

एरवी, आपला बहुतांश समाज कोणत्या ना कोणत्या प्रकारे नशा करतच असतो. यामध्ये साधनं आणि साध्य वर्गाप्रमाणे बदलत असतात. युकेमध्ये शिकण्याच्या निमित्ताने गेलेला एक मित्र नुकताच भेटला. गप्पाच्या ओघात तिकडे आणि इकडे चालणारी नशा हा विषय निघाला. त्यावेळी तो म्हणाला,

‘युकेमध्ये अशा अनेक बँका आहेत, की ज्याच्या रेस्टरूममध्ये काही वेगवेगळ्या आकाराचे रँडम असे विखुरलेले पांढरे ब्लॉक्स असतात, बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ब्रेकमध्ये हेरॉईन, कोकेन घेता यावं म्हणून ते ब्लॉक्स बनवलेले असतात.’

मग साहजिकच प्रश्न पडू शकतो, ‘हे कसे काय चालू शकते? म्हणजे कामाच्या ठिकाणी वगैरे, असे केले तर त्याचे परिणाम काय असतात?’
यावर मित्राचं उत्तर असतं,

‘त्या बँकेत काम करणाऱ्या लोकांवर इतकं भयानक प्रेशर असतं की त्यानां ही नशा केल्याशिवाय काम करता येणं अवघड असतं, आणि हे बँकांनादेखील माहीत असतं, पण ते दुर्लक्ष करतात कारण, त्यांना काम महत्वाचं असतं, मग ते कसही झालं तरी चालेल.’

नशेचा हा नवीनच चेहरा. सहमतीने आकारास येणारा.

साधारण जानेवारी २०१४ मधली ही घटना. कामानिमित्त हडपसरला गेलो होतो. गाडी साइडस्टॅन्डला लावून कोणाची तरी वाट बघत होतो. बाजूने लोकांचा एक घोळका पास झाला. आणि एकदम दारूचा भपकारा जाणवला, त्यांच्यातल्या सिनिअर वाटणाऱ्या एकानं सगळ्यांशी काहीतरी बोलून काही सूचना वगैरे दिल्या आणि काही लोकांना घेऊन पुढे गेला.

काही वेळानं उरलेल्यापैकी दोघं तिघांनी मॅनहोल ओढून बाजूला केलं आणि एक जण खाली गटारात उतरला… माणसाची घाण स्वतःच्या हातांनी साफ करायला खाली उतरलेला माणूस…
नशेचा आणखी एक चेहरा. पण, व्यवस्थेने लादलेला.

या वर्षी गांजा किंवा एकूणच अमली पदार्थांवर भारतमध्ये बंदी लागू होऊन ३३ वर्षे उलटलीत. या  बंदीसाठी कारणीभूत अनेक गोष्टी, पण त्याचे मूळ गेल्या ५० वर्षात पूर्णपणे फसलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सनचे ‘वॉर ऑन ड्रग्स’ कॅम्पेन. अमेरिकेने त्यांच्याकडे वाढत्या ड्रग्स सेवनावर कारवाई सुरु केली, त्यातूनच ती पुढे ‘वॉर ऑन ड्रग्स’पर्यंत येऊन पोहोचली. अमेरिकेमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढायला, स्वतः अमेरिका, तिचे सैन्य आणि तिचा युद्धखोरपण कारणीभूत होता.

जेव्हा अमेरिकन सैनिक युद्ध करण्यासाठी जगभर फिरत होते तेव्हा त्यांना अफूची सवय झाली. खासकरून व्हिएतनाम युद्धाच्या वेळी, या सैनिकांनी स्थानिक अंमलीपदार्थाचे सेवन सुरु केले. का? तर सततची हिंसा, हरत जाण्याची जाणीव, युद्धामुळं, हिंसेमुळं येणारं नैराश्य आणि असह्य एकटेपणाही.

जेव्हा हे सैनिक मायदेशी परतले, सोबत अमली पदार्थदेखील घेऊन गेले. त्याआधी अमेरिकेत अमली पदार्थ मिळायचे, पण आता त्याचे प्रमाण वाढत गेले. भरीस भर म्हणून ‘सीआयए’सारख्या संस्थांनीदेखील अंमली पदार्थांचा छुपा व्यापार सुरु केला. कारण त्यातून मिळणारा  प्रचंड पैसा, हा पैसा त्यांना त्यांच्या छुप्या कारवायांसाठी, मुख्यतः जिथे जिथे क्युबासारखी साम्यवादी सरकारे होती तिथे वापरता येत होता. सरकारकडून पैसे मिळणे अवघड बनल्याने सीआयएने हा मार्ग  निवडला होता. त्या वळी सैनिकांना ने-आण करण्याची जी व्यवस्था होती, त्याच वाहनांमधून अमलीपदार्थांची तस्करी केली जायची.

सीआयएने ही तस्करी करण्यासाठी स्थानिक माफियाला हाताशी धरून हे पूर्ण जाळे विणले होते. अर्थातच पुढे हाच मार्ग वापरून ड्रग माफियांनी देखील मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली.

आता मुद्दा असा येतो की याची सुरुवात कुठून झाली?

अमेरिका कॅनाबिजच्या विरोधात का गेली? ३०च्या दशकात अमेरिकेमध्ये ज्यावेळी कागद उद्योगामध्ये असणाऱ्या उद्योजकांनी हेम्प प्रोसेसिंग सोपे करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. साहजिकच लाकडापासून कागद बनवणाऱ्या उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली. रँडाल्फ हर्स्ट, अँड्रू मेलन यांसारखे उद्योगपती न्यूजपेपरला लागणार कागद पुरवत होते. त्यांच्यापेक्षा स्वस्त दराने कागद निर्माण होण्याची शक्यता दिसल्या, वर त्यांनी तात्कालिक प्रिंट मीडिया जो बहुतांश त्याच्याच ताब्यात होता,त्यांना घेऊन हेम्प/गांजा विरोधात मोहीम चालवली.

त्या मोहिमेंतर्गत‘मेक्सिकन मायग्रंट मॅरुवाना(गांजा) पिऊन अमेरिकन स्त्रियांवर बलात्कार करतात’, ‘मारिज्युआना घेतल्याने स्त्रिया कायमच्या वेड्या झालेल्या आढळून आल्या’ वगैरे… बातम्या छापून आणायला सुरुवात झाली.

इथेच न थांबता त्यांनी काही स्थानिक चर्चेसना हाताशी घेऊन ‘Tell Your Children’  नावाची डॉक्यु फिल्म बनवली. याच फिल्मवर आधारित पूर्ण लांबीची फिल्म बनवली गेली, ती म्हणजे ’ Reefer Madness’ साहजिकच याचा समाजाच्या मतपरिवर्तनास हातभार लागला.

याच सुमारास या उद्योजकांनी लॉबिंग करून ‘मारिज्युवाना टॅक्स’ लागू केला. थोडक्यात, कॅनाबिज इंडस्ट्री मोडण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले गेले. त्या काळी सुरु असणाऱ्या दांभिक प्रकाराला तत्कालिक नार्कोटिक्स फेडरल ब्युरोच्या अध्यक्षाचे, हे वक्तव्य अगदी थोडक्यात उघड करणारे होते.

‘मारिज्युवानाचे सेवन केल्यामुळे गोऱ्या स्त्रियांना निग्रोंसोबत सेक्स करण्याची इच्छा होते, आणि त्यामुळे या काळ्यांना (डार्की हा मूळ शब्द वापरला आहे) आपण गोऱ्या पुरुषांच्या बरोबरीचे आहोत, असे वाटू लागते…’

भारतात गांजाची रोपं आपल्याला पंजाब, हिमाचल प्रांतामध्ये हायवे वरून जाताना तसेच अनेक छोट्या छोट्या गावातील रस्त्यांच्या कडेला अनेकदा दिसून येतात. हायवेवर तर साधारण ८ ते ९ फूट उंचीची रोपं दिसतात. साहजिकच प्रश्न पडतो, की इतक्या उघडपणे हे पीक कसे काय घेतले जाते?

चंदीगडवरून पुढे मंडीला जाताना, पंडोह डॅम मागे पडल्यावर अशी बरीच रोपं दिसत होती. अभिजित कुपटे या सायकल एन्थु मित्राच्या सांगण्यावरून गेल्याच वर्षी आम्ही ‘सायकल रिपब्लिकन्स’नी सिमला ते मनाली व्हाया स्पिती व्हॅली, असा जवळपास ६५० किलोमीटरचा ट्रेक सायकलवरून केला होता. त्याही प्रवासात हिमालयीन गुलाबांचे ताटवे, सफरचंदाच्या बागा, अनेक जंगली फुलं, वनस्पती आणि कोणत्याही मानवी देखरेखीखाली न वाढलेला गांजा नजरेस पडला होता.

जगात ज्या काही महत्वाच्या संस्कृती म्हणून ओळखल्या जातात, त्यापैकी एक चिनी संस्कृती. गांजाचा पहिला लिखित उल्लेख आपल्याला आढळतो, ‘मटेरिया मेडिका’ या शेन नुंगने ख्रिस्तपूर्व २८०० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात.

स्वतःला तो अर्धा राजा अर्धा देव मानत असे. चीनमधील शेती, कालवे, नांगर, फावडे, कुऱ्हाड, ॲक्युपंक्चर आणि परंपरागत चायनीज औषधांचा शोध त्यांनी लावला, अशा अनेक दंतकथा प्रचलित आहेत. शेन हा  वेगवेगळ्या झाडपाल्यांचा अभ्यास करायचा आणि त्याचे जे काही दिसणारे परिणाम आहेत, ते लिहून काढायचा, यासाठी बरेचदा तो वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे भाग खाऊन बघायचा.

तर या माणसाला त्याच्या प्रयोगादरम्यान गांजाचे औषधी परिणाम दिसून आले. त्याच्या म्हणण्यानुसार या वनस्पतीचा वापर दुःख शामक म्हणून केला जाऊ शकतो. मुख्यतः हाडांच्या संदर्भातील वेदना, सांधेदुखी किंवा जे लोक वेडसर वागतात, अगदी त्यांनादेखील हे औषध देऊन शांत केले जाऊ शकते. या वनस्पतीला पुढे (huo ma ren) किंवा ‘मा’ हे नाव रूढ झाले. केवळ इथेच न थांबता चिनी लोकांनी ‘मा’ चा धागा तयार केला, कागद बनवला, मातीची भांडी तयार करायला हे धागे वापरले.

साधारण १५००-२००० वर्षापूर्वी हुआ तुओ नामक एका शल्यचिकित्सकाने भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, असे म्हणतात. तो नेमका काय करायचा, हे जरी आज इतिहासाला माहित नसले, तरी त्याच्या पद्धतीचे चायनीज नाव होते, ‘मा-फैसान’ ज्याचे  साधारणपणे ‘गांजा उकळून तयार केलेली भुकटी’ असे भाषांतर केले जाते.

पारंपारिक चायनीज वैद्यकशास्त्रामध्ये ज्या महत्वाच्या ५० मुलभूत वनस्पती सांगितल्या त्यात गांजादेखील आहे. तर अशा या ‘मा’चा आपण चायनीज औषधांच्या पुस्तकातील अर्थ पहिला तर लक्षात येत, हेच ते मूळ रोप ज्याचं फार्मास्युटिकल नाव आहे Semen Cannabis Sativae म्हणजेच बॉटनिकल भाषेत ‘कॅनाबिज सटिव्हा’ कन्फ्युशिअसने संपादित केलेल्या ‘बुक ऑफ ओड्स’ या चीनमधील सर्वात जुन्या कविता संग्रहात ‘मा’ या वनस्पतीचा उल्लेख अनेकदा केला गेला आहे.

थोडक्यात, त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करताना, नोंदवताना ज्या गोष्टी परंपरेचा भाग होत्या, त्यातील एक महत्वाचा उल्लेख म्हणून आपण याकडे पाहू शकतो.

कॅनाबिजमध्ये आपण दोन उल्लेख करत आलो आहोत, त्याचा अर्थ सांगणे पण महत्वाचे आहे.
एक असते ते म्हणजे, कॅनाबिज सटिव्हा ज्यामध्ये नशा निर्माण करणारे घटक असतात. तसेच याच प्लांट फॅमिली मधील दुसरा प्रकार म्हणजे, कॅनाबिज सटिव्हा एल उर्फ हेम्प. यामध्ये नशा तयार करणारे घटक कमी असतात, पण याचा वापर कापड, तेल, कागद अशा अनेक उद्योगांमध्ये केला जातो. नशा निर्माण करणारा कॅनाबिजची दुसरी प्रजाती म्हणजे, कॅनाबिज इंडिका आणि यातील तिसरी आणि शेवटची प्रजाती म्हणजे कॅनाबिज रुडरेल्स.

जगातल्या सर्व धर्मियांमध्ये कॅनाबिजचा वापर अगदी धर्माच्या स्थापनेपासून दिसून आला आहे. हिंदू धर्मात शिवाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. कोणी म्हणते, शिवा सर्वांना त्यागून हिमालयामध्ये निघाला होता. वाटेत दमल्यावर त्याने एका झाडाखाली झोप घेतली. आराम करून काही वेळाने तो उठला. मग त्याने त्या झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या पानांचा वास घेऊन पहिला. त्याला खूप प्रसन्न वाटलं. त्याला ते इतके आवडलं, की तो तिकडेच थांबला. मग काही काळाने तो, ज्यावेळी परत आला, त्यावेळी त्याने हा गांजा माणसांत आणला आणि त्याचसोबत त्याने मानवाला योगविद्यादेखील दिली.

तर काहींच्या मते, शिवाने आपल्या अंगावरील मळाचा वापर करून भांगेचा गोळा बनवला. तर काहींचे असे म्हणणे की हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या घशाला जो त्रास होत होता,तो कमी करण्यासाठी त्याने जे पेय प्यायले, ते म्हणजे दुधात गांजाची पाने टाकून बनवलेला भांग रस. एकूण काय तर, गांजाला आपल्याकडे सामाजिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न आधीपासून सुरू होता.

हिंदू धर्माशी साधर्म्य असलेला धर्म म्हणजे, झोराष्ट्रियन. आपल्याकडे वेद आणि इराणमधीलमध्ये अवेस्ता. दोहोंमध्ये अनेक ठिकाणी समानता आढळून येते. यावरून काही अभ्यासकांचे असेही म्हणणे आहे कि हिंदू आणि झोराष्ट्रियन,धर्माचे पूर्वज हे एकच असावेत, जे एकाच प्रकारची इंडो-आर्यन भाषा बोलायचे. झोराष्ट्रियन लोकांच्या  झेंड- अवेस्तामध्ये ज्या काही औषधी वनस्पती म्हणून सांगितल्या आहेत त्यामध्ये हेम्पचा उल्लेख “अगदी महत्वाचे’ म्हणून केला आहे.

झोराष्ट्रियन लोकांमध्ये भांग ही फक्त पुरोहित वर्गासाठी राखीव होती, आणि समाजातील खालच्या समजल्या जाणाऱ्या वर्गाला त्यावर अधिकार नव्हता.

हिंदू धर्मातली वर्णव्यवस्था ही त्यांच्या खाण्या पिण्याच्या निवडीमध्ये, तर होतीच पण ती बनवून खाण्याच्या पद्धतीसुद्धा होती, हे आपल्याला माहीत आहेच. तशाच प्रकारे वर्ण-वर्ग व्यवस्था गांजाच्या वापरामध्ये पण आढळून आली नसती तरच नवल.

आजही उत्तर प्रदेश मधील काही कुटुंबामध्ये गांजा आणि चरस ही कनिष्ठ वर्गाची नशा समजली जाते आणि भांग ही उच्चवर्गाची. तीसुद्धा फक्त होळीच्या वेळी. ही भांग प्यायल्यानंतर पुरोहित वर्गाला आध्यात्मिक अनुभूती मिळायची.. The Book of Ardā Wīrāz (आर्दा विराफ/विराज ) जे झोराष्ट्रियन धार्मिक साहित्य मानले जाते, त्यामध्ये भांग, सोम पिऊन विराफ वेगवेगळ्या जगात जाऊन यायचा, असा उल्लेखदेखील केलेला आहे.

विराफने स्वर्ग आणि नरक या संकल्पना, या अशा पद्धतीने, त्या त्या ठिकाणी आत्माच्या स्वरूपाने जाऊन मांडल्या असेही, बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे.

ख्रिस्ती धर्मातदेखील याचा उल्लेख असल्याचं प्रो. सुला बेनेट यांनी त्यांच्या अभ्यासात नोंदवलं आहे. जुना करार अर्थात ओल्ड टेस्टामेंटमधील उल्लेखलेल्या वनस्पतीचा अभ्यास करताना त्यांनी  kanebosm या एक्सोडस ३०:२२ मध्ये उल्लेखलेल्या वनस्पतीचं मूळ हिब्रूमधून भाषांतर करताना चूक झाल्याचं सांगत, त्याचा अर्थ खरा हेम्प आहे अशी मांडणी केली  आहे.

थोडक्यात, अभिषेकासाठी जे तेल लागतं, त्यामध्ये हेम्पचा वापर केला जावा, अशी देवाज्ञा Exodus ३०:२२-२४ मध्ये सांगितली होती. ज्यावेळी ओल्ड टेस्टामेंट मागे पडून न्यू टेस्टामेंट आलं, त्यावेळी या गोष्टी बदलल्या. पण पुढे वेस्टर्न लाबेरने आपल्या ‘कल्चर इन कॉन्टेक्स्ट’ या पुस्तकात ‘kanebosm’ या शब्दाचा कॅनाबिज या शब्दाशी असलेलं साम्य संदर्भासहीत दाखवून दिले.

इस्लाममध्ये नशा ही हराम समजली गेली असली, तरी पूर्वीच्या काळी अनेक इस्लामी टोळ्या त्याचं सेवन करायच्या, याचे संदर्भ आपल्याला मिळतात.

यामध्ये शिया इस्लाम मधील एक मोठी तुकडी निझारीचा उल्लेख केला जातो. पर्शियामध्ये तात्कालिक सत्ता बदल झाल्यानंतर निझारी पंथाला आक्रमक टोळी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या टोळीतील लोकं हे खूप लढवय्ये असायचे. हे लोक लढाईच्या आधी हशिश घेत असल्याचे बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे. हशिश घेऊन लढाईला जाणारे, लोकांचा खून करणारे  म्हणून त्यांना ‘हसिसी’ असंही संबोधलं गेलं. याच हसिसीला लॅटिनमध्ये असासिनस आणि पुढे सोळाव्या शतकात ‘असासिन्स’ हे नाव पडलं.

थोडक्यात, पैसे घेऊन खून करणारे लोक म्हणून ज्यांना आज ‘असासिन्स’ म्हटलं जात त्याचा उगम हशिश खाऊन लढाईला जाणारे हासिसी यांच्यामध्ये असावा, अशीही मांडणी केली जाते.

सुफिममध्ये हशीशचा वापर आढळून येतो. तसेच फ्रान्झ रोझंताल याने आपल्या The Herb: Hashish versus Medieval Muslim Society या पुस्तकात हशिश आणि दारू यांच्या नशेबद्दल इस्लाममध्ये होणारी चर्चा मांडली आहे. ज्यामध्ये काही लोकांनी हशीश ही दारुसासारखी नशा नाही, म्हणून त्याला हराम म्हणू नये असेही म्हटले आहे.

इस्लामप्रमाणे शीख धर्मात देखील नशेला स्थान नाही, असे जरी असले तरी यातून भांग वगळण्यात आली आहे. मुख्यतः ही सूट निहंग समाजाला देण्यात आली होती. निहंग समाज हा शिखांमधला लढवय्या समाज मानला गेला आहे. आजही हा समाज सुखनी धान किंवा सुखा प्रसाद ह्या भांगे पासून बनल्या जाणाऱ्या पदार्थाचं सेवन करतो.

बाकी अनेक धर्मासारखेच बौद्ध धर्मातदेखील नशा न करण्याविषयी सूचना केल्या आहेत. पण सिद्धार्थाने गयेमध्ये असताना ज्ञानप्राप्तीच्या वाटेवर गांज्याच्या झाडाचे एक बी खाऊन दिवस काढले, असे काही संदर्भ आपल्याला मिळतात.

१८६३ मध्ये ब्रिटिश रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका खंडात एक पेपर प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये सातव्या शतकातील चीनमध्ये ‘साक्य बुद्ध तथागताच्या आयुष्याची कथा’ सांगणारे वोन्ग पुह यांनी मूळ चिनी भाषेत लिहिलेले आणि एस. बिल यांनी इंग्रजीत अनुवाद केलेलं पुस्तक आणि तिसऱ्या शतकातील ‘ललित विस्तर’ हे धर्मचक्राने संस्कृतमध्ये लिहिलेलं पुस्तक या दोहोंचा तौलनिक अभ्यास मांडला होता. ‘साक्य बुद्ध तथागत’मध्ये एक मुद्दा असा मांडला होता की ‘आनंद आणि दुःखाचे आत्मशमन करण्यासाठी त्याने धान्याचा एक दाणा आणि हेम्पची बी इतकेच खाणे ठेवले’. पण पुढे जाऊन असेही नोंदवले आहे, की हा, काही योग्य मार्ग नाही, असे समजल्यानंतर तो वेगळ्या पद्धतीकडे वळला.

भारतात तसेच तिबेटमध्ये तांत्रिक बुद्धिझमची एक शाखा विकसित झाली होती. तांत्रिक बुद्धिझमच्या ‘महाकाल तंत्र’ या ग्रंथात, आरोग्य, संपत्ती आणि ज्ञानप्राप्तीसाठी गांजा, धतुरा अशा वनस्पतींचा उल्लेख केला आहे. गांजा या रोपाच्या कोणत्या भागापासून काय बनवावे, याचे वेगवेगळे संदर्भ महाकाल तंत्र मध्ये सापडतात.

एकूणच तांत्रिक अंगाने जाणाऱ्या बुद्धिझम मध्ये कॅनाबिजचे महत्व नक्कीच वादातीत होते. एकूण काय, तर या वनस्पतीचे अस्तित्व, महत्व जगभरातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या धर्मांमध्ये आढळून आलेले आहे…

हिमाचल प्रदेशातलं कसोल. आता कसोल मिनी इस्रायल म्हणून ओळखलं जातं.

पण आता इस्रायली पर्यटक पुढे तोष, खीर गंगा या भागात जायला लागले आहेत.  अर्थात यातल्या बहुतेक सगळ्यांना रस असतो, तो मलाना गावामध्ये. इथला  गांजा हा तितकासा चांगला नसतो.  पण जेव्हा चरस विषयी बोललं जातं, आज तरी भारताइतकी दर्जेदार चरस (हॅश) इतरत्र मिळत नाही. भारतातील सर्वात चांगली हॅश ही हिमाचलमध्ये तयार होते आणि मलाना या गावातील हॅश ही सर्वोत्तम मानली जाते.

दरवर्षी हजारो पर्यटक ज्यात मुख्यतः इस्राइल मधून येणारे लोक असतात. ते कसोल, मनाली, कुलू या ठिकाणी आपला अड्डा जमवतात. इस्रायल मध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला लष्करात दोन वर्षासाठी काम करणे सक्तीचे आहे. ही सेवा पूर्ण केल्यानंतर सरकार तुम्हाला काही एक रक्कम देते.

बहुतांश लोकं ते पैसे खर्च करण्यासाठी जगभर सफर करतात. गेले काही वर्षे हिमाचलमधील खासकरून ‘मलाना क्रीम’साठी हे लोक कसोल मध्ये येतात.

अर्थात, भारतामध्ये इतरही काही ठिकाणं गांजा, हॅश मारण्यासाठी सुरक्षित समजली जातात, म्हणजे तुम्ही काहीही आणि कसेही वागले तरी चालते असा त्याचा अर्थ नसतो, पण साधारणपणे या गोष्टी करताना बघून कोणीही तुमच्यावर लगेच कारवाई करण्यास येत नाही.

उदाहरण म्हणून काही नावं सांगतो, ओल्ड मनाली, कसोल, तोश, सिमला, स्पिती व्हॅलीचा पट्टा सिमला, कुफरी, रामपूर, नारकंडा, इंफाळ, सिलिगुडी, गोकर्ण, हंपी, गोवा… आता गोव्यामध्येदेखील काही ठराविक बीच यासाठी प्रसिद्ध आहेत, जसे की, बाघातुर, पालोले, अंजुना वगैरे. मुद्दा इतकाच असतो, तुम्ही इतरांना काही त्रास न होऊ देता तुमचं जे काही चालू आहे, ते चालू ठेवा.

यात पर्यटकांकडून येणारा पैसा हा महत्वाचा असतो…

हॅशसाठी  केवळ हीच गावे असली पाहिजेत, असे नाही.  उत्तम हॅश आणि गांजा अगदी मुंबईतल्या कुलाब्यात पण मिळतं. अगदी ‘मलाना क्रिम’ आणि ‘केरला गोल्ड’ देखील. पण, कसोल, मनाली, कुल्लू अशा कोणत्याही ठिकाणी गोरे लोक दिसले कि स्थानिक पेडलर्स त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. अगदी काय हवं काय नको पासून सर्वात भारी माल मीच तुम्हाला कसा स्वस्तात देईल इथं पर्यंतची सर्व माहिती त्यांना आपसूक मिळते. तुम्ही बनारस किंवा तत्सम धार्मिक ठिकाणी गेल्यावर तिथले पंडे ह्या पद्धतीने तुमच्या मागे लागतात, अगदी तोच प्रकार इथेही चालतो. तिकडे धर्माची नशा असते, इकडे नशेचा धर्म असतो इतकंच.

सरकारी आकडेवारीनुसार गांजा आणि भांगचा सर्वात जास्त वापर हा ओडिशा आणि उत्तरप्रदेश मध्ये होतो. तो सुद्धा स्थानिक लोकांकडून. त्यामुळे बाहेरील लोकांनी आमची संस्कृती खराब केली, वगैरे मुद्दे तिकडे बोलले जात नाहीत.

मलाना, हे गांजा शेतीसाठी सध्या प्रसिद्ध असलेलं गाव.

स्वतःला सिकंदराचे वंशज समजणारं, सिकंदराच्या फौजेच्या मागे राहिलेल्या एका तुकडीच गावं, भारतीय संविधान म्हणजे काय, याची फारशी ओळख नसणारं, आजपर्यंत गावाला लागणाऱ्या सर्व गोष्टी गावातून बनवून वापरणारे, हे गाव आता हळूहळू आपल्या नागरी  ‘सभ्य’तेचा भाग बनू पाहते आहे.

ज्या गावात इलेक्शन म्हणजे काय माहीत नाही, तिकडे गेल्या सहा सात वर्षांत व्होटर आयडी कार्ड आलंय, बरं ते घेऊन करायचं काय, हे गावातल्या निम्म्या लोकांना अजूनही कळलेलं नाही.  इथले बहुतांश शेतकरी हे साधं जीवन जगतात, एकतर कोणाकडे मोठी गांजाची शेती नाही. साधारण ५० बड्स दिवसभर मळून तुम्ही १ तोळा क्रीम बनवू शकता.

जसे आपण डोंगराच्या दिशेने जातो, त्या भागातली आर्थिक परिस्थिती ही तशी बेताचीच असते. कारण पूर्णवेळ असे कोणतेही पीक घेतले जात नाही, जे काही असेल ते स्वतःच्या घरापुरते किंवा गावापुरते. त्यामुळे काही भाग हा गांजाच्या शेतीसाठी मुद्दाम राखून ठेवला जातो. त्यातूनच  थोडीफार आर्थिक कमाई होते. पण हे गणित सर्वच ठिकाणी लागू होते असे नाही. भारताच्या चरस उत्पादनाचा किंवा गांजा लागवडीचा कोणताही अधिकृत आकडा सरकारकडे नाही. कारण एकतर आता ते बेकायदेशीर आहे आणि आजपर्यंत गांजा लागवड आणि उत्पादन यासाठी देशव्यापी असा अभ्यास केला गेला नाहीय.

भारतामध्ये येणारा बहुतांश गांजा हा काश्मीर, सिक्किम, मणिपूर, ओडिशा, दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळची बॉर्डर या भागात तयार होतो.

भारतात नेपाळमधूनदेखील गांजा आणला जातो. पण  आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, नागालँड आणि छत्तीसगढ हे गांजाच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे (transit points) म्हणून ओळखले जातात. इथून हा गांजा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवला जातो. यातील बहुतेक सर्व माल हा जमिनीवरील वाहतुकीनेच प्रवास करतो. यामध्ये  छोट्या प्रवासासाठी खाजगी गाड्या जशा ट्रॅव्हल्स, वोल्वो, ट्रक्स  यांचा वापर होतो, तर लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर केला जातो. अलीकडे गोव्यात बांद्यावरून देखील माल येतो.  त्यातही चरस किंवा हशिश याचा मार्ग थोडा वेगळा आहे.

एकतर हे सर्वत्र बनवले जात नाही. ते बनते ते काश्मीरच्या दक्षिण भागात आणि हिमाचल प्रदेशमध्ये. काश्मीर मधून येणारी हॅश ही बहुतांश पंजाबमध्ये जाते. पण हिमाचलमधून हॅश चे उत्पन्न जास्त असल्याने ती पंजाब – हरयाणा – राजस्थान – गुजरात – मध्यप्रदेश – महाराष्ट्र आणि पुढे गोवापर्यंत येते. काही वेळा नेपाळ मधून येणारी हॅश उत्तरप्रदेश – मध्यप्रदेश – महाराष्ट्र या मार्गाने गोव्यापर्यंत येते.  गोव्यात येणारा बहुतांश सर्व माल हा जमिनीवरून येतो. समुद्रमार्गे फारच कमी येतो. हा माल सर्व महत्वाच्या रेल्वे जंक्शन वरून पास होतो.

ज्या गावात जायचे आहे, त्याच्या अलीकडच्या छोट्या स्टेशनमध्ये तो उतरवून घेतला जातो. ही पद्धत सर्वाना माहीत असते. पण जोपर्यंत कोणी टीप देत नाही किंवा वरून सूचना येत नाहीत, तोपर्यंत कोणीही काहीही हालचाल करत नाही.

पण हे झालं गांजा किंवा चरसच्या बाबतीत, बाकी इतर कोणता हेवी माल असेल, तर पोलिसांना कारवाई करावीच लागते. परंतु, प्रश्न असा आहे की, गोव्यात हे सगळं कधी आणि कसं सुरु झालं? तर १९६१ मध्ये गोवा स्वतंत्र झाला, पण त्यानंतर काही हिप्पी लोकं साठच्या दशकात इकडे आले आणि त्यांनी हे सर्व चरस, गांजा हे प्रकार इकडे आणले.

आता भारतात एकूणच नशेचं प्रमाण किती आणि त्याचं कारण काय, हाही एक महत्वाचा मुद्दा.

वस्तुत: भारत हा अशा भौगोलिक भागात वसला आहे, की त्याच्या एका बाजूला गोल्डन क्रिझन्ट आहे आणि एका बाजूला गोल्डन  ट्रँगल. त्यामुळे भारत हा नेहमीच एक मुख्य ट्रान्सिट पॉईंट राहिलेला आहे. जागतिक पातळीवर अफूचे उत्पादन करणारे म्हणून जे भाग ओळखले जातात, ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण या देशातील आहेत.

या तिन्ही भागांना जोडून जो भाग तयार होतो, त्याला जागतिक पातळीवर ‘गोल्डन क्रिझन्ट’ म्हटलं जाते. हा भाग अफीम आणि तिच्यापासून बनणाऱ्या इतर अमलीपदार्थचा अगदी पूर्वीपासूनचा एक मोठा उत्पादक राहिला आहे, हे झाले भारताच्या पश्चिमेकडे.

भारताच्या पूर्वेला असणाऱ्या म्यानमार, थायलंड आणि लाओस या तीन भागांचा मिळून जो त्रिकोण बनतो, त्याला ‘गोल्डन ट्रँगल’ असे म्हटलं जातं. हे नाव कुणी दिले तर अमेरिकेच्या ‘सीआयए’ने. अफगाणिस्ताननंतर सर्वात जास्त अफीम कुठे घेतली जात असेल, तर ते म्यानमारमध्ये. या भागाला व्हिएतनाम युद्धाची पार्श्वभूमी आहे. पूर्वी लाओस भागात गांजाची शेती केली जायची, जिचा वापर पारंपरिक उद्योग आणि नशा या दोन्हीसाठी केला जायचा, पण अमेरिकेच्या ‘वॉर ऑन ड्रग्स’मध्ये इथले सर्व उत्पादन बंद पाडलं गेले.

नंतर ‘सीआयए’च्या कृपेने म्यानमार आणि आसपासच्या भागात बेकायदेशीर अफीमचे उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली, आणि  इथून ते पुन्हा जगभर फोफावलं. भारत हा भौगोलिकरित्या  या दोन्हीच्या म्हणजे गोल्डन क्रिझन्ट आणि गोल्डन ट्रँगल यांच्या मध्ये असल्याने व्यापाऱ्यांसाठी भारत एक महत्वाचा भाग ठरला, एक महत्वाचा ट्रान्सिट पॉईंट ठरला.

दोन्ही बाजूने व्यापार होत गेला आणि मधल्यामध्ये बराचसा माल आपसूकच भारतात येऊ लागला. भारताला बाहेरून येणारा माल मिळाला आणि भारतात तयार होण्याऱ्या मालाला एक व्यापारी मार्गही सापडला.

गोव्यात टुरिझम व्यवसाय खूप असल्याने, इथे पावसाळा सोडला तरी बाकीचे सर्व महिने पर्यटक येत असतात. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते. यातील हॉटेलिंग व्यवसायात काम करायला अगदी बंगाल, हिमाचल आणि उत्तरप्रदेश मधून येणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. बरेचदा हॉटेल मालक आपल्या गिऱ्हाइकांच्या सोयीसाठी म्हणून गांजा आणि चरस उत्तर भारतातून मागवतात आणि तो या कामगाराना घेऊन यायला सांगतात. त्यांच्यासाठी मालाची खात्री महत्वाची असते.

कामगाराला पगारापेक्षा काही पैसे जास्त मिळतात, म्हणून तो ही तयार होतो. इथे ज्यावेळी ‘ऑफ सिझन’ असतो त्यावेळी हे कामगार आपापल्या गावी परत जातात आणि ऑक्टोबरमध्ये परत येतात त्यावेळी येताना सोबत ताजा माल घेऊन येतात.

या सगळ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सी असू शकतात, जसे स्थानिक पोलीस, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि इतर सरकारी संस्था. पण या सर्वांना एकत्रित घेऊन एक केंद्रीय संस्था काम करते ती म्हणजे, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. जी १९८६ मध्ये स्थापन करण्यात आली.  देशांतर्गत तसेच बाहेर चालणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करी वरती आळा घालण्याच्या प्रयत्नात ही केंद्रीय संस्था “महत्वाची भूमिका’पार पाडत असते.

‘केअर फॉर इंडिया’ ही गोव्यातली एक सेवाभावी संस्था नशा करणाऱ्या लोकांना त्यातून बाहेर पडायला मदत करते.

संस्था चालवणारा डॅनिअल हा त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे काम खूप तळमळीने करतो.  गोव्याच्या कल्चरमध्ये नशेच वाढतं प्रमाण त्याला अस्वस्थ करतं. यामध्ये भरडल्या जाणाऱ्या स्थानिक तरुण पिढीला मदत म्हणून तो त्यांच्यासाठी वेगेवेगळे उपक्रम राबवतो.  कलंगुट समुद्रकिनारी संध्याकाळी नशा करणाऱ्या लोकांचा अड्डा जमतो.

यातील बहुतांश हार्ड ड्रग्स घेणारे असतात,त्यात हेरॉईन, कोकेन आणि अजूनही बऱ्याच सिंथेटिक ड्रग्सचाही समावेश असतो.या दुनियेत फिरताना एक कोरडेपणा सतत जाणवत असतो. जो गोवा आजपर्यंत एक टुरिस्ट म्हणून एन्जॉय करायला येत होतो, तोच आता पूर्णपणे वेगळा दिसत राहतो.

डॅनिअल म्हणतो,

“हे नशा करणारे लोक स्वतः खूप घाबरलेले असतात. कारण त्यांना कोणीही जवळ करत नाहीत, त्यांच्या या एकटेपणाला त्यांनी उसन्या रागाचं आवरण घातलं असतं, पण ते केवळ त्यांच्या फ्रस्ट्रेशनमधून आलेलं असतं, कोणीतरी त्यांना जवळ घ्यावं, मायेनं म्हणून आतल्या आत कुढत असतात हे लोक, आपण समाज म्हणून नेमकं उलटं करत असतो, यांच्या सारखे लोक दिसले की चेष्टा कर, दगड मार हाकलून दे. हे खूप चुकीचे आहे.’

त्याचं उत्तर ऐकून आपण अक्षरशः सून्न  होतो.  मग थोड्या वेळाने तिकडून बाहेर पडून आपण एका  अड्ड्यावर जातो. अड्डा म्हणजे जुनं पोर्तुगीज पद्धतीचं घर, मालक पोर्तुगालला निघून गेलेला, तो ही नशेबाज होता. जाताना, या नशा करणाऱ्या लोकांकडे घर सोपवून गेला, तो परतलाच नाही. गेटमधून आता जातानाच त्या घराची अवस्था समजली. बाहेर सर्वत्र गवत आणि चिखल, पोर्चमध्ये कुठेही काहीही पडलेलं. जाताना एका बाजूला चूल रचून ठेवलेली दिसली, काही जळकी भांडी, अर्धवट कुजलेल्या भाज्या, आणि काही लाकडं असा तो विस्कटलेला संसार होता. आतमध्ये  काही लोक मागे बसून सिगरेट ओढत होते. दोघे जण इंजेक्शन तयार करत होते. एक त्यांच्यातला सिनिअर सगळ्यांना एकत्र बांधून होता.

त्याचाशी गप्पा मारायला सुरु केल्या. ६० वर्षाचा तो माणूस त्याच्या काळातील कॉमर्स ग्रॅज्युएट, गोल्ड मेडलिस्ट, नंतर ॲडव्हर्टाईजींग मध्ये जॉब केलेला. गेले ३० वर्षे तो नशेच्या आहारी गेलाय. मध्ये मध्ये घरी जातो शिव्या खातो, पैसे घेऊन येतो आणि पुन्हा हेच सगळं. तो म्हणतो, हे सगळं बंद करण्याची  इच्छा आहे खूप. पण जमत नाही, आणि हे सांगताना मला कसलीही लाज वाटत नाही, जे आहे ते असं आहे काय करू.’ तोपर्यन्त मागच्या पोरांचे इंजेक्शन तयार होते,  ते ‘हेरॉईन’असते.

एक जण त्याला त्याच्या मांडीवर इंजेक्शन देतो. आपण त्यांना प्रश्न करतो, कधी घेतली होती का वीड, गांजा चरस वगैरे?’ यावर तो म्हणतो, ‘इथे असणाऱ्या जवळपास प्रत्येकाची सुरुवात तिकडूनच झालीय. पण आम्ही ग्रॅज्युएट होत गेलो. एक के बाद एक एक्झाम दिया और नेक्स्ट लेव्हल पे पाहोच गये.’ पुढे?  पुढे काही नाही,ही लास्ट एक्झाम, इसको पार करके सिधा उपर.’
उत्तर ऐकून आपण सून्न होतो.

गांजा ते हेरॉईन या प्रवासाची कितीतरी रुपं उघड होत राहतात…

इंग्रजांच्या काळात म्हणजे, १८९३ मध्ये एक समिती स्थापन होऊन एक मोठा अभ्यास केला गेला. जो मुख्यतः हेम्प (गांजा) वर आधारित होता, त्याच नाव ‘इंडियन हेम्प ड्रग्ज कमिशन’, या कमिशनच्या अहवालात, गांजाचे प्रमाणात केलेले सेवन हे शारीरिक, मानसिकदृष्ट्या हानिकारक नाही आणि त्यामुळे मनावर कोणतेही त्रासदायक परिणाम होत नाहीत, पण जर याचे अती सेवन केले गेले, तर नक्कीच हे धोकादायक होऊ शकते, असे नोंदण्यात आले.

सुमारे ३००० पानाच्या या अहवालात जवळपास १२०० लोकांच्या अनुभवाच्या नोंदी घेतल्या गेल्या. ज्यात डॉक्टर, हमाल, योगी, फकीर, भांग पिकवणारे शेतकरी, कर गोळा करणारे अधिकारी, तस्करी करणारे, आर्मी ऑफिसर्स, गांजा व्यापारी, तसेच वेगवेगळ्या धर्माचे पुरोहित, अधिकारी माणसे या सर्वांचा समावेश होता. गांजा आणि त्याचे इतर उत्पादने जसे हशिश, चरस, भांग इत्यादी हे कायदेशीररीत्या विकले जात असत, तसेच त्याचा नशेसाठी केला जाणारा वापर देखील सर्वज्ञात आणि मान्य होता.

बरेचदा कॅनाबिजचे आरोग्य विषयक फायदे सांगितले जातात. त्यातील ऐतिहासिकदृष्ट्या सांगितले जाणारे फायदे तर आपण पहिलेच, पण त्याचे जे फायदे म्हणून सांगितले जातात ते नक्की खरे आहेत का ? त्याचा काही शास्त्रीय अभ्यास झाला आहे का?

याचे उत्तर शोधत असताना असे कळते की जवळपास ३० देशांनी यांच्या औषधी वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे.

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चिली, कोलंबिया, क्रोएशिया,डेन्मार्क, फिनलँड, जर्मनी, ग्रीस, इस्रायल, इटली, नेदरलँड्स, पेरू, पोलंड, युनाइटेड किंगडम, जमैका, नॉर्वे, झिम्बाब्वे आणि उरुग्वे ही त्यापैकी काही नावे.

अमेरिकेच्या फेडरल लॉनुसार कॅनाबिजच्या वापरावर बंदी असली तरी, अमेरिकेमध्ये ३१ राज्यांनी याला औषधी वापरासाठी कायदेशीर मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने प्रकाशित केलेल्या अहवालांमध्ये कॅनाबिडॉईलला औषधी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कॅनाबिडॉईल हा कॅनाबिजमधला एक महत्वाचे घटक असतो, जो मुख्यतः औषधी वापरासाठी वापरला जातो.

ज्यांना अप्स्माराचे दौरे पडतात (epilepsy seizures) त्यांना या कॅनाबिडॉईल असणाऱ्या औषधाच्या वापराने खूप चांगला परिणाम दिसून आल्याने अमेरिकेतील Food and Drug Administration (FDA) ने नुकतीच परवानगी दिली आहे.  तसेच स्कॅलॉरिसिस दुखण्यामध्ये Nabiximols नावाचं औषध ज्याच्यामध्ये THC आणि CBD दोन्ही आहे याच्या वापरला कॅनडा तसेच स्वीडनने परवानगी दिली आहे. ॲग्झायटी, नॉशिया, कॅन्सर अशा अनेक आजारांवर CBD मुळे काही पर्यायी उपचार पद्धती तयार करता येऊ शकते, का यावरचे संशोधन आज जगभर केले जात आहे.

२०१४ मध्ये अमेरिकेत केलेल्या एका रिसर्च नुसार वेगाने वाढणाऱ्या पहिल्या पाच इंडस्ट्रीज मध्ये कॅनाबिज इंडस्ट्री ही चवथ्या नंबरवर होती. २०१६ मध्ये तिचा टर्नओव्हर ६.७ दशकोटी डॉलर्स इतका होता, थोडक्यात, ६७० कोटी इतका प्रचंड होता.

दि कॅनाबिज इंडस्ट्रीच्या २०१७ च्या वार्षिक अहवालामध्ये, २०१८ मध्ये मारिज्युवानाचा अमेरिकेतील व्यापार हा सुमारे १००० कोटी डॉलर्सचा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार २०२५ पर्यंत हा आकडा २४०० करोड डॉलर्स पर्यंत जाईल.

जागतिक पातळीवर अनेक देशांनी, कंपन्यांनी त्याचे हे वाढणारे मेडिकल मार्केट लक्षात घेऊन काम सुरु केलं आहे. अनेक देशांमध्ये मेडिकल मारिज्युवाना डोळ्यासमोर ठेऊन नवनवीन उद्योग सुरु होत आहेत. नवीन प्रॉडक्टस उतरवली जाता आहेत, अनेक स्टार्टअप्स सुरु होत आहेत, या सगळ्यामध्ये जागतिक पातळीवर बऱ्याच मोठ्या कंपन्या भांडवल गुंतवण्यासाठी तयार होत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर २ नोव्हेंबर २०१६ रोजी पटियालामधून निवडून आलेले लोकसभा एमपी धर्मवीर गांधींनी जाहीर केलंय, की त्यांनी लोकसभेत सादर केलेल्या खाजगी बिलाला पटलावर मांडायची परवानगी मिळाली. NDPS मध्ये बदल करून गांजा आणि अफीम यांच्या कायदेशीर, नियमबद्ध वापराला वैद्यकीय देखरेखीखाली परवानगी मिळावी, हे बिल त्यांनी लोकसभेत खाजगी बिल म्हणून आणलं होतं.

आता त्यांना ते लोकसभेत मांडायला परवानगी मिळाली आहे. जुलै २०१७ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्री असणाऱ्या मनेका गांधींनी कॅनाबिजच्या औषधी वापरामुळे अंमली पदार्थाच्या वापराने होणारे गुन्हे घटण्याची तसेच त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती.

त्यानंतर एकाच आठवड्याने केंद्र सरकारने कॅनाबिजवर आधारित संशोधनासाठी भारतातील पहिले आणि आतापर्यंतचे एकमात्र मेडिकल लायसन्स Council of Scientific and Industrial Research (CSIR) आणि Bombay Hemp Company (BOHECO) यांना एकत्रितपणे दिलं.

नुकतेच थिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी, एक लेख लिहून, कॅनाबिजला  कायदेशीर मान्यता देण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. ‘पतंजली’सारखा उद्योग समूहसुद्धा आता गांजाला कायदेशीर मान्यता द्या म्हणून सरकारच्या मागे लागला आहे.

सध्यातरी गांजाच्या लागवडीला उत्तराखंड मध्ये परवानगी आहे.

मुखतः हेम्प या प्रकाराला  मान्यता मिळाली आहे. पण कॅनाबिज संदर्भातील वैद्यकीय वापराला कायदेशीर आणि नियमबद्ध चौकटीमध्ये परवानगी दिली, तर भारतातल्या शेतकऱ्यांना हा नवीन पर्याय नगदी पिकाचा अजून एक महत्वाचा स्रोत ठरू शकतो. जागतिक पातळीवर या उद्योगाची सकाळ उजाडली आहे, पण भारतात अजून त्याची पहाटदेखील झालेली नाही.

कॅनाबिज म्हटलं की डोळ्यासमोर फक्त नशा येणार असेल, तर ही पहाट अजूनही लांबच असणार आहे. कॅनाबिज संदर्भात सर्व शक्यता या शास्त्रीय पद्धतीने तपासून मग त्यावर पुढील पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी  सोशल सायन्स, कृषी विद्यापीठे, इंजिनिअरिंग इत्यादी शैक्षणिक संस्थांना त्यावर अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांना रिसर्च करण्यासाठी सरकारी तसेच खाजगी फंडिंग उभं राहण्याची गरज आहे.

लौकिकार्थाने,भारतीय मानसाचा हिमालयातून सुरु होणारा प्रवास समुद्रापाशी येऊन संपतो. जे काही हिमालयाचं देणं असतं. ते समुद्राला जाऊन मिळतं. काहीतरी संपल्याची जाणीव तेवढी उरते. गांजा ऊर्फ अफू ऊर्फ हशीशचाही प्रवास असाच घडतो.

हिमालयात त्याचं  रुप नजरेला सुखावतं, गोव्यात आल्यावर त्यातून येणारं उद्ध्वस्तपण आपल्याला शून्यात नेतं…

कायद्याच्या नजरेतली भांग

दुसऱ्या महायुद्धानंतर ‘लिग ऑफ नेशन्स’नी अंमली पदार्थाच्या तस्करीवर काही बंधनं आणली होती, ज्यामध्ये अफू आणि कोकापासून तयार केल्या जाणाऱ्या मॉर्फिन, कोकेन, हेरॉइन याचा समावेश होता. पण १९६१ मध्ये युनाइटेड नेशन्स अंतर्गत झालेल्या आंतरराष्ट्रीय करारनाम्यामध्ये अजून काही पदार्थाची सूची जोडली गेली, ज्यात कॅनाबिजदेखील होते. (Single Convention on Narcotic Drugs – १९६१) १९६१ पासून जगात अनेक देशात ही नियमावली लागू झाली.

१९८५ मध्ये अमेरिकेच्या वाढत्या दबावाखाली राजीव गांधी सरकारने यूएनच्या जाहीरनाम्यानुसार Single Convention on Narcotic Drugs अंतर्गत नियमावली बनवत  Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985  (NDPS १९८५) ची आखणी केली, त्यामध्ये एकूण सर्वच अंमली पदार्थांवर बंदी आणली.

ज्यात गांजादेखील बेकायदेशीर करण्यात आला. हा कायदा संपूर्ण भारतासाठी १४ नोव्हेंबर १९८५ मध्ये लागू झाला.

कायद्यामध्ये गांजा ज्यावेळी म्हटलं जात, त्यावेळी त्याच्या संज्ञेमध्ये तीन गोष्टी अंतर्भूत असतात. गांजा (हेम्प) म्हणजे, १. चरस – गजाच्या झाडापासून त्याची राळ मग ती शुद्ध व अशुद्ध अशी कोणत्याही प्रकारची असो, तसेच या राळेपासून पुढे बनवले, जाणारे हॅश ऑइल किंवा लिक्विड हॅश. २. गांजा – गांजाच्या झाडाच्या वरच्या भागात येणारे  फूल / फळ (यामध्ये बिया आणि पाने यांना वगळून असलेला भाग) मग त्यांना ज्या कोणत्याही नावाने ओळखले जात असेल ते. ३. गांजाच्या वर नोंदवलेल्या कोणत्याही स्वरूपात, त्याचा प्रभाव नष्ट करणारा किंवा न करणारा कोणताही बाह्य पदार्थ वापरून बनवले गेलेले कोणतेही मिश्रण अथवा कोणतेही पेय.

NDPS Act, 1985: I.2.iii[29]

म्हणजे, एनडीपीएस १९८५ नुसार तुम्ही भांग सोडून इतर कोणतेही सेवन करणे, हे कायद्याने गुन्हा आहे. कारण भांग ही पानांपासून तयार केली जाते, आणि एनडीपीएसमध्ये बिया आणि पाने यांना वगळण्यात आलं आहे. याशिवाय भारतातील काही राज्यामध्ये काही विशेष कायदे बनवले गेले आहेत.

आसाममध्ये Ganja and Bhang Prohibition Act अंतर्गत गांजा आणि भांग, खरेदी, विक्री, बाळगणे तसेच त्याचे सेवन या सर्वावर आसामच्या १९५८ च्या कायद्यानुसार बंदी आहे. महाराष्ट्रात Bombay Prohibition (BP) Act, या १९४९ च्या कायद्याच्या सेक्शन ६६ (१)(ब) नुसार  गांजा आणि भांग, खरेदी, विक्री, बाळगणे तसेच त्याचे सेवन या सर्वावर बंदी आहे. त्यामुळे जर कोणी गांजा किंवा चरस घेताना आढळले, तर त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते. त्यासाठी तुमच्याकडे किती प्रमाणात ते उपलब्ध आहे, त्यावर ते ठरते.

त्याचे प्रमाण आणि त्याची शिक्षा कायद्यामध्ये ठरवून दिली आहे. गांजाच्या बाबतीत एक किलो हे कमी प्रमाण आहे, आणि २० किलोग्राम हे व्यापारी प्रमाण आहे. हेच चरसच्या बाबतीत १०० ग्राम हे कमी प्रमाण आहे, आणि एक किलोग्राम हे व्यापारी प्रमाण आहे.

आता तुमच्याकडे कमी प्रमाणात दोनीपैकी काही सापडले, तर जास्तीत जास्त एक वर्ष तुरुंगवास आणि १०,००० हजार रु. दंड होऊ शकतो. जर तुमच्याकडे कमी आणि व्यापारी या दोन्हीच्या मधले प्रमाण सापडले, तर १० वर्ष जेल आणि १लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, आणि जर का तुमच्याकडे व्यापारी प्रमाणात सापडले तर १० ते २० वर्ष जेल आणि २ लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो.

गांजा ते मलाना : एक नाजूक प्रक्रिया

गांजा हा कोठेही आणि कसाही उगवू शकतो. तो उगवण्यासाठी किंवा जगवण्यासाठी विशेष मेहनत करावी लागत नाही, अन्य कोणत्याही वनस्पतीप्रमाणे तो वाढतो. त्याचमुळे तो जालंदर, पठाणकोटच्या रस्त्यावर देखील उगवतो, तसाच तो हिमाचल, मणिपूर, ओडिशा, आसाम, अरुणाचल तसेच कर्नाटक इथेही उगवतो.

हिमाचलमध्ये त्याचं  प्रमाण सर्वात जास्त आहे. गांजा हे हिमाचलमध्ये मुख्यतः डोंगराळ भागात येणारे स्थानिक पीक आहे. सुमारे ८००० ते ९००० फुटांवर डोंगरात, जिथे फक्त पायीच जाता येऊ शकत, अशा ठिकाणी हे पीक घेतलं जातं.

मलानामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला पीक म्हणून लागवड केली जाते. अर्थात लागवड गावात होत नाही. गावातून बाहेर पडून अजून वरच्या भागात याची लागवड केली जाते. बऱ्याच स्थानिक लोकांची अशी समजून आहे की, जितक्या वर याची लागवड होईल तितके जास्त चांगले पीक येते. पेरणीसाठी गावातील बहुतांश लोक वरच्या भागात जाऊन राहतात आणि सर्वांची पेरणी पूर्ण होईपर्यंत, हे लोकं वर तात्पुरते तंबू बांधून राहतात.

भारतीय उपखंडात मार्च ते मे उन्हाळा असल्याने हिमालयातून वरील भागातील बर्फ वितळून शुद्ध पाण्याचे अविरत झरे सुरु झालेले असतात. अजून तरी कोणत्याही प्रकारचे यंत्र, गाड्या वर न पोहोचल्याने प्रदूषणमुक्त ताजी हवा, मुबलक सूर्य आणि हिमलयातील मिनरल्सने समृद्ध असणारं पाणी त्या पिकांना मिळतं. साधारण आपल्याकडील पिकाला ५ ते ६ महिने लागतात. मग सप्टेंबर मध्यानंतर पिकाची कापणी, तसेच त्याची पुढील प्रक्रिया सुरु होते.

पुढील प्रक्रिया म्हणजे अर्थातच ‘चरस’ निर्मिती.

‘सगळ्यात अगोदर तुम्हाला योग्य रोपं ओळखायचं असतं, कच्च नाही की पूर्ण पिकलेले नाही, पूर्णपणे  पिकायच्या थोडं अलीकडे तुम्हाला ते निवडून बाजूला घ्यावं लागतं. आता त्यातील अशी कोवळी पाने निवडायची, की त्यावर कोणतेही ड्राय पॉईंट्स नसतील, थोडक्यात,जी पानं कोवळी आहेत आणि ज्यावर एक नाजूकसा तेलकट लेयर दिसतो, अशीच फक्त ठेवायची आणि बाकीची छाटणी करून घ्यायची. आता हे झाल्यावर महत्वाचे म्हणजे, तुमचे हात पूर्ण स्वच्छ करणे गरजेचं असतं. एकदा का हात स्वच्छ झाले की, ते उन्हात थोडे गरम होतील, असे ठेऊन मग छाटणी केलेल्या रोपाचा अग्रभाग (बड्स) दोन्ही हाताच्यामध्ये अलगद धरायचा. मग अतिशय हळूवारपणे तुम्ही ते पान किंवा रोपाचं अग्र दोन्ही हातांनी मळायला सुरु करायची.

ही सर्वात नाजूक त्यामुळे वेळ खाऊ गोष्ट. इथे कसल्याही प्रकारचा धसमुसळेपणा चालत नाही. हे करताना तुम्ही तुमच्या हातामध्ये काही आहे विसरून जायचे, पण लक्षात ठेवायचे की ते कुस्करले जाणार नाही. इतके सर्व झाल्यानंतर त्या पानातून, त्या फुलातून तो स्राव तुमच्या हातावर जमू लागतो.

हेच ते जगातील सर्वोत्तम समजले जाणारे ‘मलाना क्रीम’, याची पुटं तुमच्या हातावर चढत जातात, तरीही तुम्ही तुमचे काम चालू ठेवायचे असते.

पहिले झाले की दुसरे, असे पुन्हा चालू. असे बऱ्याच काळ झाल्यानंतर तुमच्या हातावर एक दाट आवरण तयार होते. मग दुसऱ्या हाताच्या बोटाने, ते हळूहळू घासून त्याचे छोटे गोळे बनवत जायचे. एकदा का  हातावरचा सर्व माल संपला, की तुमचा हात पूर्ण साफ होऊन उरतो, तो एक हॅशचा गोळा!

तो अतिशय खबरदारीने त्याला बाकी कशाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेत एअर टाईट प्लास्टिकमध्ये पॅक करायचा. तुम्ही एका वेळी एकच रोप घ्यायचं, आणि ही प्रोसेस करायची, नाहीतर जोपर्यन्त आपण बाकीची पानं रगडत असतो, तोपर्यंत बाकीच्या रोपांमधून हूळूहळू स्त्राव बाहेर पडू लागतो, आणि त्यातून मिळणाऱ्या हॅशची गुणवत्ता कमी होत जाते.

यामध्ये आता रोपाचा देठ हलकेच बाजूला काढून घेणे, गरजेचं असतं, कारण तो जर राहिला आणि आपण पुढची प्रक्रिया सुरु केली, तर देठामुळे त्यातून स्त्रवणारे तेल जे आपल्या हाताला चिकटत ते देठासोबत निघून जाते.’

६० दशकातील हिप्पी मुव्हमेन्टचा भाग असणाऱ्या हिप्पी ट्रेलमुळे, काही हिप्पी लोक भारतात येऊन पोहोचले. त्यातील काही गोव्याकडे गेले, काही बनारस मार्गे पुढे ढाक्याला गेले, तर काही हिमाचल मार्गे काठमांडूला गेले. यातील हिमाचलमार्गे पुढे जाणाऱ्या हिप्पी लोकांनी मलानामधल्या लोकांना चरस बनवण्याची ही कला शिकवली…

  •  साहिल कल्लोळी
  • ( दै. दिव्य मराठीच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित) 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.