टाटांनी आपला एक लाखावा ट्रक कर्तारसिंग यांना दिला यामागे एक खास भावनिक कारण होतं

३ जून १९६५. टाटा मोटर्स उर्फ त्याकाळची टेल्कोच्या जमशेदपूर प्लांटवर एक कार्यक्रम आयोजित केला जात होता. टाटांचा १ लाखावा ट्रक तयार झाला होता. टेल्कोचे सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणार्या सुमंत मुळगावकर यांच्या हस्ते हा ऐतिहासिक ट्रक दिल्लीच्या सरदार कर्तारसिंग यांना प्रदाण केला जात होता.

हा ट्रक कर्तारसिंग यांनाच देण्यामागे एक खास कारण होते.

टाटा उद्योगसमूह म्हणजे भारताचा अभिमान. अगदी मिठापासून ते अत्याधुनिक सॉफ्टवेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट सचोटीने आणि विश्वासाच्या भक्कम पायावर त्यांनी बनवली. भारताची आत्मनिर्भर होण्याची स्वदेशी गाथा म्हणजे टाटा !

अशा या टाटांचा फ्लॅगशिप उद्योग म्हणजे टाटा मोटर्स. याची सुरवात केली होती जेआरडी टाटा यांनी !

भल्यामोठ्या टाटा उद्योग समूहाची धुरा जेआरडी टाटांच्या खांद्यावर आली तेव्हा त्यांचं वय फक्त ३४ वर्षे होतं. युरोपात शिकून आलेले जे आरडी टाटा हे नाविन्याचे भोक्ते होते. पारंपारिक कारखान्यापेक्षाही येत्या भविष्यात भारताला कोणत्या गोष्टी लागतील यासाठी नवीन उद्योग सुरु करण्याकडे त्यांचा कल होता.

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. याच काळात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निर्मितीची देखील स्पर्धा सुरु झाली होती.

यात जर्मनी व अमेरिका आघाडीवर होतेच पण प्रत्येक देश आपल्या स्वसंरक्षणासाठी सज्ज राहण्यावर भर देत होता. भारत देखील इंग्रजांच्या अधिपत्याखाली  असल्यामुळे या युद्धात ओढला गेला. त्यांना युद्धासाठी लागणाऱ्या स्टीलचा पुरवठा टाटांकडून केला जायचा.

तरुण जेआरडी टाटा यांनी आपल्या संचालकांच्या इच्छेविरुद्ध जात उद्योगसमुहाचे क्षेत्र विस्तारायचे ठरवले. रॉयल आर्मीला स्टील सप्लाय केल्यानंतर ब्रिटीशांकडून त्यांनी लष्करी गाड्या बनवण्याच कॉन्ट्रक्ट मिळवल.

त्यातूनच  टाटा इंजिनियर्स अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड उर्फ टेल्कोची स्थापना करण्यात आली आणि पहिले भारतीय बनावटीचे रणगाडे बनवण्यात आले. इंडियन पॅटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणगाड्यांना ब्रिटीशांनी नाव दिल, “टाटानगर”

टेल्को उभी करण्यात जे आर डी टाटांच्या बरोबरीने ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते म्हणजे सुमंत मुळगावकर.

सुमंत मुळगावकर मुळचे मुंबईचेच. लंडनच्या सुप्रसिद्ध इम्पेरियल कोलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये शिकून आलेल्या या अभियंत्याच्या समर्थ हातांमध्ये जेआरडीटाटांनी टेल्को सोपवली होती. स्वातंत्र्यानंतर सुमंत मुळगावकर यांनी टेल्कोसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला. आता फक्त लष्करी गाड्या पुरत मर्यादित राहायचं नाही तर कमर्शियल गाड्या देखील बनवायच्या.

यातूनच साकार झाली टाटा ट्रक.

त्यांचा हा निर्णय फक्त टेल्को साठीच नव्हे तर पूर्ण भारत देशासाठी क्रांतिकारी ठरला. यापूर्वी आपल्याला मालवाहू गाड्या प्रदेशातून आयात कराव्या लागत होत्या. या महागड्या गाड्यांना टाटाच्या रुपात अस्सल भारतीय पर्याय उभा राहिला.

१९५४ साली जर्मनीच्या डेम्लर बेंझ (मर्सिडीज बेंझ) सोबत सुमंत मुळगावकर यांनी करार केला. त्याच वर्षी भारताचा पहिला स्वदेशी ट्रक टाटा बेंझ टेल्कोच्या कारखान्यातून बाहेर पडला.

या पहिल्या टाटा ट्रकला विकत घेतल होत मघाशी उल्लेख केलेल्या कर्तारसिंग यांनी. त्यांची दिल्लीला मान्टेगोमेरी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस नावाची कंपनी होती. त्यांच्याकडे अनेक ट्रक होते पण राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या कर्तारसिंग यांनी फक्त स्वदेशी आहे म्हणून टाटांचा ट्रक घेतला.

tatamilestone 1

खर तर तेव्हा मेड इन इंडिया म्हटल कि आपल्याच लोकांचा विश्वास बसायचा नाही. इंग्रजांनी आपल्या दीडशे वर्षांच्या राजवटीखाली भारताचा उद्योगक्षेत्राला मारून टाकल होतं. इथे कोणालाही रुजुच दिल नाही. त्यामुळेच कर्तारसिंग यांनी दाखवलेला विश्वास टाटा ट्रक साठी भावनिक होता.

जेआरडी टाटा आणि सुमंत मुळगावकर यांनी टाटांच्या साठीचं नाही तर संपूर्ण भारतासाठी एक नवं अवकाश खुल केल होतं.

भारतात तयार होणारे हे टाटा ट्रक कोणत्याही बाबतीत परदेशी ट्रकपेक्षा कमी नव्हते. उलट देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही कच्च्या पक्क्या रस्त्यांवर ऐटीत धावणारे टाटा ट्रक हे आपल्या मेंटेनन्स, किफायती किंमतीमुळे परदेशी ट्रकपेक्षा काकणभर सरसच होते.

भारतात अगदी थोड्याच काळात ते तुफान हिट झाले. राजस्थान मधील भयंकर तापलेलं वाळवंट असो नाही तर काश्मीरमधला गारठा निर्माण करणारा बर्फ टाटा ट्रकची चाके कधी थांबली नाहीत. चार वर्षात टाटांचे ट्रक श्रीलंका व आसपासच्या छोट्या देशांमध्ये निर्यात होऊ लागले.

या ट्रकने कित्येक विक्रम मोडले. अवघ्या दहा वर्षात त्यांनी १ लाखांचा टप्पा पार केला. हा १ लाखाव्या ऐतिहासिक ट्रकच्या चाव्या स्वतः सुमंत मुळगावकर यांनी आपल्या पहिल्या ग्राहकाला म्हणजेच कर्तारसिंग यांच्याकडे सुपूर्द केल्या.

कर्तारसिंग यांनी आपला पहिला टाटा ट्रक टाटांच्या डिस्प्लेसाठी परत केला. यावेळी या ट्रकवर ८ लाख किमी पूर्ण झाले होते. 

जेआरडी टाटांच्या नंतर सुमंत मुळगावकर यांचे शिष्य समजले जाणारे रतन टाटा जेव्हा टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा बनले तेव्हा त्यांनी टाटा मोटर्सला जगाच्या नकाशावर नेलं. २००४ साली त्यांनी कोरियाच्या दावूइथला ट्रक कारखाना विकत घेतला आणि आज जपान पासून अमेरिकेपर्यंत टाटांचे अत्याधुनिक ट्रक धावतात.

gettyimages 818786914 612x612 1
MUMBAI, INDIA JUNE 28, 2009: Ratan Tata, Chairman of Tata Sons, photographed with Tata World Truck in Mumbai. (Photo by Abhijit Bhatlekar/Mint via Getty Images)

कितीही यशाची शिखरे ओआर केली तरी आजही टाटा आपल्या पहिल्या ट्रकला विसरलेले नाहीत. अजूनही जेव्हा जेव्हा टाटा मोटर्स आपल्या ट्रक्सची परेड काढते तेव्हा हा कर्तारसिंग यांचा ट्रक त्या परेडचे नेतृत्व करतो.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.