कंगना ते पायल घोष ; राज्यपालांना मागील काही महिन्यात यांना भेटण्यासाठी वेळ होता.

केंद्राच्या ३ कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरातून मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी दाखल झाले आहेत. जवळपास १०५ शेतकरी संघटना एका झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. इथून हे शेतकरी आंदोलन राजभवनावर मोर्चा घेवून जाणार होते. त्यानुसार ते घेणे देखील.

मात्र राजभवनावर गेल्यानंतर तिथं राज्यपाल शेतकऱ्यांना भेटलेच नाहीत, असा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अभिनेत्री कंगना राणावत यांना भेटण्यासाठी वेळ असून शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसल्याची टीका केली.

तर या आरोपांनंतर राजभवनावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचा देखील कार्यभार असल्याचं सांगत ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गोव्याला गेले असल्याचं स्पष्टीकरण दिले.

आता या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांनंतर ‘बोल-भिडू’ ने थोडं पाठीमागच्या दिवसांमध्ये जायचं ठरवलं.

राज्यपालांनी मागील काही महिन्यांत कोणा-कोणाला भेटीसाठी वेळ दिला याचा थोडा आढवा घ्यायचं ठरवलं. तेच तुमच्यासमोर मांडत आहे.

तर आता वादाची सुरुवात कंगना पासून झालीय तर तिच्याच भेटीपासून सुरुवात करूया.

१) अभिनेत्री कंगना रानावत :

१३ सप्टेंबर २०२०. शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई या सगळ्या पार्श्वभूमीवर तिने राज्यपालांची भेट घेतली होती. यानंतर ती म्हणाली होती,

राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे. असं कंगना म्हणाली होती. 

जवळपास अर्धा तास हि भेट झाली होती.

२) भाजप आमदार शिष्टमंडळ : 

१५ सप्टेंबर २०२०. कंगना-शिवसेना वाद आणि निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, मदन शर्मा, डॉ. शीला मदन शर्मा यांच्यासह विविध माजी अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान, मदन शर्मा यांनी राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. 

३) आम आदमी शिष्टमंडळ : 

२६ सप्टेंबर २०२०. सरकारच्या बहिरेपणामुळे महागड्या वीज बिलाबाबत जनतेला आणि कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेतून उपचार घेण्यामध्ये अडचणी येत आहेत, अशी तक्रार करत आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

यावेळी त्यांनी कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून मोफत उपचार मिळण्यामध्ये येत असलेल्या अडचणी, योजनेतील भ्रष्टाचार याबद्दल निवेदन देऊन चर्चा केली होती.

४) पायल घोष – रामदास आठवले :

२९ सप्टेंबर २०२०. अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायलने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, अनुरागवर कोणतीही कारवाई न झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले – पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर मंत्री रामदास आठवले आणि पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली होती. जवळपास १ तासापेक्षा जास्त वेळ तिघांमध्ये चर्चा झाली होती. 

५) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा : 

२१ ऑक्टोबर २०२०. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महिला सुरक्षेवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

या भेटी दरम्यान लव्ह जिहादच्या घटनांवर चर्चा झाली असल्याचे ट्विट शर्मा यांनी केलं होत. त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. 

६) भाजप आमदार राम कदम : 

५ नोव्हेंबर २०२०. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं होत. पण अटकेदरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तसंच, आपल्या कुटुंबातील सदस्य व मुलालाही मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

याच आरोपांवर बोट ठेवत भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

या भेटीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांवर त्वरित कारवाई करून त्यांचं निलंबन कराव अशी मागणी केली होती. तसंच, या प्रकरणाची सखोल चौकशीही करण्यात यावी अशीही मागणी केली होती.  

७) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 

७ नोव्हेंबर २०२०. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली होती.

शेतकरी मदत आणि पदवीधर निवडणूक आचारसंहिता यामुळे हि भेट घेण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

८) भाजप नेते प्रवीण दरेकर : 

१५ नोव्हेंबर २०२०. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिवाळी दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते, असे त्यांनी या भेटीनंतर सांगितलं होतं. तसेच ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती.

माझ्या मुलाला राज्यपालांना भेटण्याची फार इच्छा होती. म्हणून ही भेट होती, असे देखील दरेकर यांनी सांगितले होते.

९) भाजप आमदार राम कदम :

११ डिसेंबर २०२०. पश्चिम बंगाल मधील वातावरण हिंसक झालं असून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली होती.

“पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला गेलो होतो. असं त्यांनी सांगितलं होत. त्यानंतर आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी,” असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

१०) शिक्षक भारती संघटना :

१७ जानेवारी २०२१. महाराष्ट्र राज्यांतील शाळा- महाविध्यालयातील १८ वर्षांखालील मुलींना ( इयत्ता ५ वी ते १२ वी ) लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्याचा हेतूने जुडो, कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी करत शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस प्रा. सपन नेहरोत्रा राज्यपालांची भेट घेत केली होती.

११) नामदेवराव जाधव : 

१७ जानेवारी २०२१. लेखक आणि व्याख्याते नामदेवराव जाधव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांची भेट घेत शिवचरित्र या विषयावर संवाद साधला होता. तसेच यावेळी त्यांनी राज्यपालांना शिवचरित्राच्या ४० पुस्तकांचा सेट भेट दिला होता.

१२) आलोक रंजन तिवारी :

१९ जानेवारी २०२१. कोर्पोरेट कॅपिटल बिझनेस मॅनेजमेंटचे मुख्य संपादक आलोक रंजन तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

१३) दीनदयाळ फाउंडेशन :

२१ जानेवारी २०२१ : कोरोना काळात गरिबांची चांगली मदत केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दीनदयाळ फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.

१४) आमदार भाई गिरकर : 

२२ जानेवारी २०२१ : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भुमिपुत्र अभिवादन समिती, नाशिक यांच्या वतीने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा ९१ वा वर्धापन दिन सोहळा २ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी आमदार भाई गिरकर यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली होती.

यानंतर आज राज्यपाल शेतकऱ्यांना भेटणार होते. मात्र त्यांचा गोव्याचा कार्यक्रम पूर्व नियोजित असल्याने ते शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत असं राजभवनाकडून सांगण्यात आलं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.