केरळ मॉडेल साठी फेमस झालेल्या आरोग्यमंत्र्यांना मंत्रीमंडळातून बाहेर का केलं?

केरळ विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तिथं आज नवीन मंत्रिमंडळाची घोषणा झाली. यात मुख्यमंत्री पिनराई विजयन सोडून जुन्या कॅबिनेटमधील एका ही मंत्र्यांचा समावेश केलेला नाही. सर्व २१ नवीन चेहरे असणार आहेत. मात्र यात सगळ्यात जास्त आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे या वगळलेल्या यादीत कोरोना आणि निपाह व्हायरस विरुद्धच्या मोहिमेत हिरो ठरलेल्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांच देखील नाव आहे.

CPI(M) स्टेट कमेटीने घोषणा केली आहे कि,

सर्व २१ चेहरे नवीन असतील. २० तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्यांचा शपथविधी होणार आहे. सोबतचं पक्षानं केके शैलजा यांना पक्ष प्रतोद अर्थात पार्टी व्हिपची जबाबदारी दिली आहे. तर एमबी राजेश यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. टीपी रामकृष्णन यांना संसदीय दलाचे सचिव म्हणून नियुक्त केलं आहे.

केरळमध्ये ‘टीचर’च्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या के.के शैलजा यांनी मत्तनूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास ६१ हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. त्यांचं हे मताधिक्य नवनिर्वाचित मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापेक्षा देखील अधिक आहे. थोडक्यात लोकांना त्यांचं काम आवडलं होतं तरी देखील त्यांना कॅबिनेटमधून वगळण्यात आलं आहे.

निपाह, कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत मुख्य चेहरा :

मागच्या पाच वर्षात के.के. शैलजा यांनी केरळच्या आरोग्यमंत्री म्हणून आरोग्याच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. भारतात पहिल्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत गेली. मात्र हे संक्रमण रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची बरीच चर्चा झाली. 

यात मग अगदी सगळ्यात पहिल्यांदा जानेवारी २०२० पासूनच आंतराराष्ट्रीय विमानतळांवर बाहेर येणाऱ्या प्रवाश्यांच्या स्क्रिनींगच्या निर्णयापासून ते अलीकडे यशस्वी ऑक्सिजन मॉडेल उभं करण्या पर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. 

इतकंच काय तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३ लाख क्रॉस झाला होता तेव्हा देखील त्या या लढाईचं नेतृत्व करत होत्या.

जून २०२० मध्ये संयुक्त राष्ट्राने ‘वर्ल्ड पब्लिक सर्विस डे २०२०’ या विषयावर पॅनेल डिस्कशनमध्ये सहभागी होण्यासाठी केके शैलजा यांना आमंत्रित केलं होतं. सोबतचं अनेक मॅगझीन आणि वृत्तपत्रांनी कोरोना लढाईतच त्यांच्या रणनीतीच कौतुक केलं आहे.

२ मे रोजी विजयानंतर शैलजा यांनी NDTV वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या होत्या कि, 

मी माझ्या कार्यकाळात वादळ, महापूर, निपाह व्हायरस आणि कोविड-19 अशा अनेक संकटांचा सामना केला, पण लोकांच्या मदतीनं यातून बाहेर पाडण्यात यश आलं आणि येत आहे. पण लोकांनी हे सगळं बघितलं, केरळ मधील गव्हर्नन्स मॉडेलशी लोक खुश होते. त्यामुळेच लोकांनी मला पुन्हा निवडून दिलं आहे.

सोशल मीडियावर देखील लोकांनी त्यांना का डावललं याबाबत प्रश्न विचारला आहे…

अनेकांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शैलजा यांना कॅबिनेटमधून का डावललं याबाबत प्रश्न विचारले आहेत.

CPI (M) चे नेते एएन शमशीर यांनी सांगितलं आहे कि, हा आमच्या पक्षाचा सामूहिक रित्या घेतलेला निर्णय आहे. जो कि पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे. 

मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे?

या मागचं नेमकं कारण समजून घ्यायचं असल्यास आपल्याला थोडी क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागेल. 

१. पहिलं कारण समजून घेण्यासाठी थोडं निवडणुकीच्या आधीच्या दिवसात जावं लागेल. 

निवडणूक जाहीर झाल्यानंतर ५ हि राज्यातील काही भाजप, काँग्रेसचे नेते ४ वेळा ५ वेळा आमदार राहिले होते, त्यानंतर देखील त्यांना तिकीट दिलं होतं. इकडे केरळमध्ये मात्र पिनराई विजयन यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

ज्यांनी आमदारकीच्या सलग २ टर्म पूर्ण केल्या आहेत, अशांना तिकीट द्यायचं नाही. या निर्णयामुळे पक्षात एकच भूकंप झाला, मंत्र्यांना पण याचा तोटा बसला. अनेकांना भीती होती कि या निर्णयाचा पक्षाला निवडणुकीत अनेक जागांवर फटका बसेल, कदाचित सत्तेतून बाहेर देखील जावू. पण मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे परिणाम निकालात दिसून आले.

२. याच आधारावर त्यांनी दुसऱ्या कॅबिनेटमध्ये जुन्या चेहऱ्यानं डावललं. 

ज्या आधारावर त्यांनी आमदारांना तिकीट नाकारलं तिचं चाळण त्यांनी मंत्र्यांना लावली. ज्या मंत्र्यांचा पहिल्या कॅबिनेटमध्ये समावेश होता त्यांचा नव्या कॅबिनेटमध्ये समावेश होणार नाही. याला अपवाद केवळ मुख्यमंत्र्यांचं असेल. त्यामुळे आणखी देखील जेष्ठ मंत्र्यांना विजयन यांनी नारळ दिला आहे.

३. पक्ष आणि पक्षाचे धोरण हे वैयक्तिक असू शकत नाही. 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार के. के. शैलजा यांना वगळून पक्षाकडून एक संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे. यात एक म्हणजे कोरोना लढाईमधील कामगिरीबद्दल शैलजा यांच्या बद्दल जनतेच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार झाली होती. मात्र हे यश केवळ एकट्या शैलजा यांचं नसून सहकारी मंत्री आणि पक्षाचं असल्याचा एक संदेश देण्यात येत आहे.

ज्या धोरण निर्मितीमुळे यश मिळालं ते वैयक्तिक नव्हते हे इथून पुढच्या काळात जनतेला दाखवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच के. के. शैलजा यांना वगळण्यात आलं असू शकत असं सांगितलं जातं आहे.

नवीन आरोग्यमंत्र्यापुढे काय काय अडचणी येऊ शकतात

केरळमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नुकताच करण्यात आलेला लॉकडाऊन हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे अशा परिस्थिती आरोग्य हे मंत्रालय सगळ्यात महत्वाचे बनले आहे. म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये शैलजा यांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण असली असती.

राज्यातील रुग्णांची परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण, बेडची संख्या या सगळ्या गोष्टी शैलजा यांच्या तोंडपाठ होत्या, यात येणाऱ्या अडचणी त्यांना माहित होत्या. मात्र आता नवीन आरोग्य मंत्र्यांसमोर हि परिस्थिती समजावून घेण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.