आश्चर्य वाटेल, KGF 2 चा व्हिडिओ एडिटर फक्त 19 वर्षाचा आहे, फक्त 19 वर्ष…

वयाच्या अठरा एकोणिसाव्या वर्षात तुम्ही, अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं काय करत होतात काय? नाय जास्त लोड घेऊ नका आम्ही पण शाईन मारणं आणि लायसन्स नाही म्हणून फाईन भरणं यापलीकडे कायच करत नव्हतो.
पण हां… ह्याच वयात कायतरी करून दाखवायची हौस मात्र खूप होती.
आता आपण पुढे पण हौशी कलाकारच राहिलो पण एक कलाकार भिडू त्याच्या लहान वयात पण, फक्त हौस नाय तर हवा करतोय तेही अख्ख्या देशात. 

आपण बोलतोय एकोणीस वर्षांच्या उज्वल कुलकर्णीबद्दल.

पठयाने काय केलंय म्हणून काय विचारता, दंगा केलाय दंगा.

आता तुम्हाला कन्नड सुपरस्टार यशचा आलेला KGF 2 पिक्चर माहीतच असेल.
ह्या केजीएफमध्ये रॉकीभाई लय अशक्य गोष्टी करतो. वीस-वीस लोकांना एकटा मारतो. उचलून उचलून आपटतो. सगळ्यांचा  गेम वाजवतो.
पण आपल्याला माहितीये की हे सगळं काय खऱ्या आयुष्यात होऊ शकत नाय आणि इथंच, कस लागत असतो तो पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांचा. डायरेक्शन, ॲक्टिंग, मेक अप,  सिनेमेटोग्राफी, हे सगळं तर आहेच पण अजून एक गोष्ट गंडून चालत नसते ती म्हणजे पिक्चर चं एडिटिंग.
आणि केजिएफ 2 पिक्चरचं अख्खं एडिटिंग केलय फक्त एकोणीस वर्षाच्या उज्वल कुलकर्णीने.
यू ट्यूब शॉट्स, इंस्टा रील्स आणि टिक टॉक सारख्या तीस सेकंदांच्या दुनियेत हल्लीची पोरं आपलं स्किल आजमावत असतात. त्यांना कोण सिरियासली घेत नाय. ते स्वतः सुद्धा हे सगळं कितपत सिरियासली घेतात हाही एक प्रश्नय. पण ह्या सगळ्यात उज्वलसारखे सुद्धा असतात जे नाशिब काढतात आणि पुढे त्यांचं सगळं उज्वल होतं.

 

uj
एकोणीस वर्षांचा उज्वल आत्तापर्यंत गंमत म्हणूनच एडिटिंग करत होता. त्याने काही शॉर्ट फिल्म्सही एडिट केल्या होत्या आणि शिवाय गाजलेल्या सिनेमांचं फॅन कसं एडिटिंग करतात, तसं करून त्याने ते यू ट्यूबवर टाकलं होतं.
आता यू ट्यूबवर गोष्ट गेली की लपून राहत नसते. आणि गोष्टीत दम असला की ती हिटही होत असते.
उज्वलच्या कामातही दम होता… शिवाय उज्वल आधीपासूनच ‘केजीएफ’ पिक्चरचा फॅन होता. उज्वलने केजिएफ पिक्चरचा ट्रेलर एक फॅन म्हणून एडिट करून यू ट्यूबवर टाकला होता.
झालं, त्याचं काम पोचलं डायरेक्ट केजिएफ 2 चे दिग्दर्शक असलेल्या प्रशांत नील ह्यांच्या बायकोपर्यंत.  प्रशांत नील यांच्या बायकोने जेव्हा त्यांना, उज्वलने एक फॅन म्हणून एडिट केलेला केजिएफ पिक्चरचा ट्रेलर दाखवला तेव्हा प्रशांत नील यांना उज्वलचं काम बेकार आवडलं.
आणि उज्वलच्या कामाविषयी खात्री पटल्यावर मग तर त्यांनी डायरेक्ट, केजिफएफ 2 ह्या एवढ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटाचं अख्खं एडिटिंगचं कामच उज्वलवर सोपवलं. 
ह्यात डायरेक्टरला पण मानलं पाहिजे. एका सिनेमाच्या मागे एवढा पैसा लावल्यावर एका बारक्या पोराच्या हातात अख्खा सिनेमा देणं म्हणजे काय खायचं काम नव्हतं. 
पण आता तर रिजल्ट्स आपल्या समोर आहेत. पिक्चर लोकांच्यात आणि बॉक्स ऑफिसवर दंगा घालतोय.  सगळ्यांचीच कामं गाजतायत आणि त्यात कर्नाटकचा अवघ्या एकोणीस वर्षांचा उज्वल पण मागे नाहीये.
पूर्ण भारतात पाहिलं तर  KGF Chapter 2 कोटींच्या घरात खेळतोय. KGF Chapter 2 ने पहिल्याच दिवशी ११६ कोटींचं कलेक्शन केलं. शिवाय सुपरस्टार यश सोबत सिनेमात संजय दत्त आणि रवीना टंडन सारखे सुपरहिट लोकं असल्यावर विषयच नाय. 
बाकी उज्वलचं वय आणि अनुभव पाहता त्याचं स्ट्रगल आणि सक्सेस स्टोरी सांगायची झाली, तर ह्या भिडूला अजून लय काम करायला लागतंय.

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.