जेजुरीच्या खंडोबानं सात कोटी सुवर्ण मुद्रांचं कर्ज तिरूपतीच्या बालाजीला दिलं होतं | लोककथा
डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या कुलदैवत खंडोबा या पुस्तकात खंडोबाबद्दल बरीच माहिती आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबाराय. आजही खंडोबाचं गुणगाण गात असताना आपण जेजूरीचा उल्लेख सोन्याची जेजूरी असाच करतो. वास्तविक लोककथा आणि लोकमानसांमध्ये आजही खंडोबाच्या पुराणकथा सांगितल्या जातात.
अशीच एक खंडोबाची कथा विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या कुलदैवत खंडोबा या पुस्तकात सांगण्यात आलेली आहे.
या प्रसंगात सांगण्यात आलय की तिरूपतीच्या बालाजीने जेजूरीच्या खंडोबाकडे मदत मागितली आणि खंडोबाने बैलगाड्या भरून मोजदाद न करता सुवर्णमुद्रा बालाजीला पाठवल्या यांची तिरूपतीमध्ये मोजदाद केल्यानंतर सात कोटींच्या सुवर्णमुद्रा भरल्या…
गोष्ट आहे ती बालाजीच्या विवाहाची.
बालाजीचा विवाह पद्मावतीशी ठरवण्यात आला होता. बालाजी ऐश्वर्याची देवता. साक्षात धनाचा देव कुबेर देखील बालाजीच्या घरात पाणी भरतो अशी कथा सांगितली जातं. बालाजीला आपला विवाह मोठ्या धुमधडाक्यात करायचा होता. तेहत्तीस कोटी देव, पृथ्वीतलावरचे राजे आणि असंख्य प्रजा अशा सर्व जणांना बालाजीने लग्नासाठी आमंत्रित केलं होतं…
पण धनवान असणाऱ्या बालाजीला सुद्धा हा खर्च जास्त वाटत होता. त्यासाठीची अजून संपत्तीची गरज होती.
बालाजी सोन्याच्या जेजूरी बद्दल ऐकून होता. खंडोबाची सुवर्णनगरी कोणालाही मोकळ्या हाताने परत पाठवत नाही हे बालाजीला माहित होतं. मणी मल्लाचा विनाश करणाऱ्या खंडोबारायांची ख्याती तिन्ही लोकांत पसरली होती.
तेव्हा आपला दूत पाठवून खंडोबारायाकडून मदत मागायची अस बालाजीने ठरवलं. त्यासाठी एका सेवकाला बालाजीने सोन्याच्या जेजूरीत पाठवलं..
बालाजीचा सेवक बालाजीचा निरोप घेवून जेजूरीच्या प्रवेशद्वारावर आला. पण इथे वेगळीच परिस्थिती होती राज्यात दुष्काळ पडला होता. खंडोबाराया देखील या संकटात आपले सोन्याचे अलंकार उतरवून साधे जीवनमान जगत होता. अन्नाची त्राही त्राही माजली होती. अशा संकटात खंडोबा आपल्या राजाला मदत करेल याची शक्यता मावळली.
तरिही सेवक हा निरोप घेवून खंडोबारायांच्या दरबारात गेला. सेवकाचा चिंतेत असणारा चेहरा पाहून खंडोबाने चिंता विचारली तेव्हा सेवकाने आपण तिरूपतीच्या बालाजीचा सेवक असून लग्नासाठी मदत म्हणून बालाजीने आपणाकडे पाठवलं असल्याचं सेवकाला सांगितलं…
बालाजी म्हणजे धनाचा देव.
त्याने लग्नासाठी मदत मागितली तर ती करायला हवी. जितकी मदत बालाजीने मागितली होती त्याहून अधिक मदत खंडोबाने केली. बैलगाड्या सोन्याच्या मुद्रांनी भरून टाकण्यात आल्या आणि सेवकाचा यथोचित पाहूणचार करून सन्मानाने सेवकाला तिरूपतीकडे रवाना करण्यात आले.
जेव्हा सोन्याने भरलेल्या बैलगाड्या तिरूपती बालाजीच्या मंदीरात पोहचल्या तेव्हा रक्कम मोजण्यात आली. एकूण सात कोटी सुवर्णमुद्रा खंडोबांनी तिरूपती बालाजीला दिल्या..
अन् याच रकमेतून तिरूपती बालाजी आणि पद्मावतीचा लग्न समारंभ पार पाडला अशी कथा आहे…
हे ही वाच भिडू
- असा आहे तिरूपती बालाजी मंदीराचा इतिहास…
- खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने
- होळकर घराण्याचं जेजुरीशी शेकडो वर्षांचं नातं आहे..