अझरचा क्रिकेट कॅप्टन पुढे जाऊन मुख्यमंत्री बनला, त्याच्याच काळात काँग्रेस बुडाली.

मध्यंतरी पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान त्यांचा पंतप्रधान बनला. भारतात सुद्धा क्रिकेटर्स राजकारणात येणे ही काय नवी गोष्ट नाही. पण भारतीय क्रिकेटपटू राजकारणाच्या खेळात कधी मोठा टप्पा गाठू शकले नाहीत.

त्यातल्या त्यात कीर्ती आझाद, नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्रीपदाची सेटिंग लावलेली पण पण राजकारण्यांनी त्यांना क्लीन बोल्ड केलं.

पण एक क्रिकेटर असा होता ज्याने मुख्यमंत्रीपदा पर्यंत मजल मारलेली. त्याच नाव किरण कुमार रेड्डी.

किरण कुमार रेड्डी हे मूळचे राजकीय घराण्याचे वारसदार. त्यांचे वडील हे पीव्ही नरसिंहराव आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात होते. पण किरण कुमार याना लहानपणापासून राजकारणापेक्षा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता.

त्यांच्या शाळेच्या टीममध्ये ते विकेटकिपर बॅट्समन म्हणून फेमस होते.

पुढे हैद्राबादमध्ये क्रिकेटसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजाम कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. तिथे त्यांची ओळख एका स्फोटक बॅट्समनशी झाली,

त्याचं नाव मोहम्मद अझरुद्दीन!

अझहर अगदी कॉलेजच्या काळापासून स्टार होता. त्याची बॅटिंग बघायला सगळं गाव गोळा व्हायचं. किरणकुमार रेड्डी सुद्धा चांगलं खेळायचे. एका मॅच मध्ये तर त्यांनी अकरा षटकार ठोकले होते.

पण अझरुद्दीन नावाच्या वादळात बाकीच्या टीम मेम्बर्सची नावे झाकोळून जायची.

अझर आणि किरणकुमार निजाम कॉलेजमध्ये, पुढे उस्मानिया विद्यापीठात आणि त्यानंतर हैद्राबादच्या अंडर 19 रणजी टीम कडून त्यांनी एकत्र खेळले.

शांत स्वभावाचा किरण कुमार रेड्डी त्यांच्या टीमचे कॅप्टन असायचे. या टीम मध्ये एक चष्मीश स्पिनर असायचा जो पुढे जाऊन भारताचा सर्वात फेमस कॉमेंटेटर बनला.

त्याच नाव हर्षा भोगले.

त्याकाळी ही टीम भारतातली सगळ्यात डेंजरस टीम मानली जात होती. त्यांनी एकत्र अनेक मॅचेस जिंकले, बऱ्याच ट्रॉफी जिंकली.

काही घटना अशा घडल्या की किरण कुमार रेड्डी क्रिकेटमधून बाहेर पडून घरच्या राजकीय वारश्याची जबाबदारी उचलावी लागली. याच काळात अझरुद्दीन टीम इंडिया साठी सिलेक्ट झाला.

अझरकडे इंटरनॅशनल लेव्हलला खेळण्यासाठी चांगलं किट नव्हतं, तेव्हा तो आपल्या पहिल्या सिरीज साठी किरणकुमार रेड्डी यांचं किट व त्यांची बॅट घेऊन गेला होता.

दोघेही आपापल्या करियरमध्ये रमले. अझर भारताचा कॅप्टन बनला, त्याकाळचा जगातला सर्वात शैलीदार बॅट्समन आणि यशस्वी कप्तान म्हणून त्याची कारकीर्द गाजली. पण मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याच्या इनिंगला ब्रेक बसला.

एकेकाळी देशाचा हिरो म्हणवला जाणारा मोहम्मद अझरुद्दीन देशवासियांसाठी सर्वात मोठा व्हिलन ठरला होता.

कोणीही व्यक्ती त्याच्याशी संपर्क ठेवण्यास तयार नव्हती. त्याचे अगदी जवळचे सुद्धा त्याच्या पासून दूर गेले.

अशा संकटाच्या समयी अझरुद्दीनला एकमेव सहारा दिला तो म्हणजे त्याचा जुना मित्र व कप्तान किरण कुमार रेड्डी!

अझर मॅच फिक्सिंग करूच शकत नाही यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनीच त्याला राजकारणात आणलं. अझरची इमेज सुधारण्यास मदत केली. युपी च्या मुरादाबादमध्ये काँग्रेसच खासदारकीच तिकीट मिळवून देऊन निवडून देखील आणलं.

तो काळ आंध्रमध्ये वायएसआर रेड्डी यांच्या करिष्म्याचा होता.

वाय एस आर शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांनी काँग्रेसला आंध्रमध्ये मोठं यश मिळवून दिलं, ज्यामुळे केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आली. मनमोहनसिंग पंतप्रधान बनू शकते यात मोठा वाटा वायएसआर यांचा होता.

किरणकुमार रेड्डी वायएसआर गटाचे पक्के समर्थक होते. त्यांच्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद किरण कुमार यांच्या कडे होतं.

पण दुर्दैवाने वायएसआर रेड्डी यांचं अपघाती निधन झालं आणि काँग्रेसचे दिवस फिरले.

वाय एस आर रेड्डीच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री करा असा आग्रह धरला पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगनमोहन हे अनुभवी नाहीत या कारणामुळे याला नकार दिला.

के रोसय्या हे जुने वयस्कर नेते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

पण वायएसआर गटाच्या आमदारांनी प्रचंड मोठी आंदोलने केली, यातून मध्यममार्ग काढण्यासाठी व जगनमोहन यांना दडपण्यासाठी सोनिया गांधी यांनी त्यांच्याच गटातल्या किरणकुमार रेड्डी यांना फोडून मुख्यमंत्री बनवलं. पण यामुळे खवळलेला जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडली व स्वतःचा वेगळा पक्ष काढला.

काँग्रेसला हा फक्त आंध्र मध्येच नाही तर संपूर्ण देशातील राजकारणात एक मोठा फटका बसला.

ही चूक सुधारण्यासाठी सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी दिलेले सल्ले काँग्रेसला आणखी बुडवत गेले.

एकेकाळी काँग्रेसला सर्वात जास्त खासदार निवडून देणारा हा बालेकिल्ला संपूर्णपणे ढासळून गेला याला कारणीभूत असणाऱ्यामध्ये मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांचा देखील समावेश आहे.

किरण कुमार रेड्डी यांची तीन वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द तशी बरी होती. त्यांनी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या पण जगनमोहन यांचा करिष्मा त्यांच्या कडे नव्हता.

पुढे काँग्रेसने आंध्रप्रदेशची विभागणी करून तेलंगणा राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीही पक्ष सोडला.

किरण कुमार रेड्डी हे एक चांगले क्रिकेटर, सज्जन व्यक्ती म्हणून नावाजले गेले पण राजकारणात संधी मिळूनही त्यांना खूप मोठा चमत्कार दाखवता आला नाही व ते बाजूला पडले. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये पुनरप्रवेश केला आहे असं म्हणतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.