म्हणून लोकं म्हणतायत, “मोदींचा सिंह आणि सम्राट अशोक यांचा सिंह वेगळाय..”

भारताच्या नवीन संसद भावनाचं काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या संसद भावनापेक्षा जास्त मोठी आणि आकर्षक वास्तू बनवण्यावर सरकारने भर दिला आहे. संसद भावनाची निर्मिती हा नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे.

दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘ल्युटेन्स दिल्ली’ या भागाचा पुनर्विकास करण्यासाठी हा प्रकल्प असून त्यासाठी २० हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. 

या प्रकल्पअंतर्गत येणाऱ्या संसद भवनाच्या बांधकामाचा आढावा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या भव्य अशोक स्तंभाचं अनावरण केलं. या अनावरणावरून एकीकडे या अशोकस्तंभाची खूप चर्चा सुरू झालीये तर दुसरीकडे देशात नवीन वादंग निर्माण झाला आहे. 

मोदींनी केलेलं काम हे ‘असंवैधानिक’ आहे असं म्हणत मोदींवर विरोधी पक्ष आणि इतर नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. 

हा वादंग काय आहे जाणून घेऊच मात्र त्याआधी अशोक स्तंभाचा इतिहास, त्याचं महत्त्व याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. 

अशोकस्तंभ हे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे. हे कुठून घेण्यात आलं याचं उत्तर त्याच्या नावातच मिळतं. 

भारताच्या इतिहासातील अनेक बलशाली साम्राज्यांपैकी एक म्हणजे मौर्य साम्राज्य. इसवी सन पूर्व २७३ च्या कालखंडात मौर्य साम्राज्याचे शासक होते सम्राट अशोक. हाच तो काळ होता जेव्हा सम्राट अशोक यांना क्रूर शासक मानलं जायचं. पण कलिंगचं युद्ध झालं आणि त्या युद्धातील नरसंहार पाहून सम्राट अशोक हादरून गेले. त्यांनी सिंहासन सोडलं आणि शांतीसाठी बौध्द धर्म स्वीकारला.

इथेच अशोक स्तंभाच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. 

बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सम्राट अशोक त्याचे प्रचारक बनले. या प्रचारासाठी त्यांनी आपल्या आवडीचा पर्याय निवडला. सम्राट अशोक यांना शिल्पकलेची आवड असल्याने त्यांनी आपल्या साम्राज्यात स्थापत्यकलेचे अनेक उत्तम नमुने उभारले होते. याच आवडीनुसार त्यांनी बौध्द धर्माच्या प्रसारात चार दिशांना तोंड असणाऱ्या चार सिंहांच्या आकाराचा स्तंभ बांधला. 

स्तंभासाठी सिंहाची निवड करण्यामागे काही ठराविक कारणं होती. एक म्हणजे भगवान बुद्धांना सिंह म्हटलं जातं. बुद्धांच्या शंभर नावांमध्ये शाक्यसिंग, नरसिंग ही नावं आहेत. याशिवाय भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये बौद्ध धर्माचा जो उपदेश केला होता त्याला ‘सिंह गर्जना’ म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच बौध्द धर्माच्या प्रसारासाठी सिंहांच्या आकृतीला महत्त्व देण्यात आलं. 

बौद्ध धर्माच्या अखंडतेचं प्रतिक म्हणून हे स्तंभ उभारण्यात आले.

देशातल्या वेगवेगळ्या भागांत सम्राट अशोकांनी हे स्तंभ उभारले. त्यांनी सारनाथमध्ये असाच स्तंभ बनविला ज्याला ‘अशोक स्तंभ’ असं म्हणतात. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच सरनाथच्या स्तंभावरून भारताचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोक स्तंभाचा स्वीकार करण्यात आला. भारताच्या राज्यघटनेनुसार संस्कृती आणि शांती या दोन गोष्टींना खूप महत्व देण्यात आलं आहे. हे दोन्ही घटक अशोक स्तंभ दर्शवतात म्हणून भारत सरकारने २६ जानेवारी १९५० रोजी अशोक स्तंभाला राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारलं होतं.

या स्तंभावर चार सिंह आहेत.हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल या प्राण्यांचं चित्र कोरलं आहे. प्रत्येक प्राण्याचं एक विशिष्ट महत्व आहे. सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे. घोडा म्हणजे गती आणि उर्जेचं प्रतिक आहे. बैल कठोर परिश्रम, मेहनत आणि स्थिरतेचं प्रतिक आहे तर हत्ती अफाट सामर्थ्याचं प्रतिक आहे.

प्राण्यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेलं एक चक्र देखील आहे. या चक्राला अशोक चक्र म्हणतात. चक्रातील २४ आरे मनुष्यातील २४ गुणांचं वर्णन करतात. काही इतिहासकारांच्या मते हे २४ आरे दिवसातील २४ तास दर्शवितात. म्हणून या चक्राला ‘समय’ चक्र देखील म्हणतात. हेच अशोक चक्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर देखील आहे. 

अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं लिहिलं आहे. याचा अर्थ ‘सत्याचाच नेहमी विजय होतो’ असा आहे.

राष्ट्रीय प्रतीक असल्याने अशोक स्तंभाची घटनात्मक प्रतिष्ठा आहे, जी कोणत्याही प्रकारे दुखावली जाऊ शकत नाही.

केवळ घटनात्मक पदांवरील व्यक्तींनाच अशोक स्तंभाच्या वापराची परवानगी असते. यात भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल, न्यायपालिका आणि सरकारी संस्थांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र एकदा का हे लोक निवृत्त झाले की त्यांचा हा अधिकार जातो. 

भारतीय राष्ट्रीय बोधचिन्ह (गैरवर्तन प्रतिबंधक) कायदा, २००५ नुसार जर एखाद्या सामान्य नागरिकाने अशोक स्तंभाचा अशाप्रकारे वापर केला तर त्याला २ वर्षांचा तुरुंगवास आणि ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

असं हे अशोक स्तंभ भारताच्या नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलं आहे. हे त्याचे पहिलं वेगळेपण आहे. तर याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याची उंची ६.५ मीटर इतकी असून वजन ९५०० किलो आहे. यावरून त्याच्या भव्यतेची जाणीव होते. शिवाय हे स्तंभ पूर्णत: तांब्याने तयार करण्यात आलं आहे. त्याला सपोर्ट देण्यासाठी त्याच्या आजूबाजूला सुमारे ६५०० किलो वजनाचा स्टीलचा ढाचा तयार करण्यात आला आहे.

अशा या स्तंभाचं अनावरण काल नरेंद मोदी यांनी केल्यानंतर लगेच वादाची ठिणगी पडलीये.

सर्वात पहिले टीका केली ती ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी. राष्ट्रीय चिन्हाचं उद्घाटन करून ‘सर्व घटनात्मक नियमांचे उल्लंघन’ मोदींनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

“राज्यघटनेनं संसद, सरकार आणि न्यायपालिकेचे अधिकार वेगळे केले आहेत. सरकारप्रमुख या नात्याने मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीवर राष्ट्रीय चिन्हाचं अनावरण करायला नको होतं. त्याऐवजी लोकसभेचे सभापती यांनी त्याचं उदघाटन करायला हवं होतं.” असं ओवेसी म्हणाले. 

सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनी देखील ओवेसी यांच्या समर्थनार्थ भाष्य केलं.

दुसरी टीका यावर केली गेली ती पूजा करण्याबाबत…

मोदींनी या स्तंभाचं अनावरण करताना हिंदू धर्माप्रमाणे पूजा केली. त्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने असं म्हटलं आहे की, 

“भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र राष्ट्रीय चिन्ह स्थापनेचा संबंध धार्मिक समारंभांशी जोडला जाऊ नये. हे प्रत्येकाचं प्रतीक आहे. तेव्हा धर्माला राष्ट्रीय कार्यांपासून वेगळं ठेवावं”

अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. अनेकांनी याचं समर्थन केलं आहे.

अजून एक टीका अशोक स्तंभाच्या रचनेवर करण्यात आली आहे. मूळ अशोक स्तंभातील सिंग हे शांत आहेत. मात्र नवीन संसद भावनावर उभारलेल्या अशोक स्तंभावरील सिंग हे आक्रमक दिसत आहे. राष्ट्रीय चिन्हाबाबत छेडछाड करण्याचा हा प्रयत्न झाला आहे, असं म्हणत अनेकांनी मोदींना धारेवर धरलं आहे.

चौथा आक्षेप म्हणजे या अनावरण सोहळ्याच्या वेळी कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. यावर ‘विरोधकांसाठीही ही नवी संसद नाही का? हे कृत्य सरकारचा अहंकार दाखवत आहे. ही संघराज्यवादाची पूर्णपणे हत्या आहे’ असं टीएमसीच्या नेत्यांनी म्हटलंय.

‘संसदेची इमारत संपूर्ण देशाची आहे. तेव्हा संसदेशी संबंधित एखाद्या समारंभात सर्व राजकीय पक्षांना करणं गरजेचं आहे,’ असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

असा हा वाद तापला आहे. तेव्हा पुढे काय होतंय हे बघणं गरजेचं ठरणार आहे…

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.