इंदिरा गांधींनी ज्यासाठी कृपाशंकरांना काँग्रेसमध्ये आणलं, ‘त्याचसाठी’ ते भाजपवासी झालेत

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले कृपाशंकर सिंह यांचा नुकताच भाजप प्रवेश झाला. त्यांचा भाजप मधला हा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची  खूप मोठी घडामोड मानली जात आहे.

कृपाशंकरसिंहांनी ‘ज्या’ कारणासाठी भाजपामध्ये प्रवेश केलाय अगदी त्याच कारणासाठी ७० च्या दशकात इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेस मध्ये घेतलं होत. 

यूपीच्या जौनपूर मधल्या राजपूत कुटुंबात जन्मलेल्या कृपाशंकर सिंह यांच्यावर मायानगरी मुंबई इतकी मेहरबान झाली होती की, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टप्पा गाठला. मुंबईतल्या उत्तर भारतीयांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व इतक मोठं झालं होत की, त्यांची लोकप्रियता बघूनच कॉंग्रेसने त्यांना राज्य सरकारमध्ये गृह खात्याचं मंत्रीपद दिल.

नंतर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे सोपविण्यात आलं होत.

१९७१ मध्ये कृपाशंकर सिंह जौनपूरहून मुंबईला आले. ते आणि त्यांचा भाऊ उदरनिर्वाहासाठी मुंबईत हमाली करत असल्याचं सांगितलं जात. मात्र ७० च्या दशकात त्यांचे उत्पन्न वाढले. पुढं त्यांच्या कुटुंबाने किराणा दुकानही सुरु केले. ते ज्या भागात राहत त्या भागात बऱ्याच समस्या होत्या. या समस्या सोडवण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा हिरीहिरीनं सहभाग असायचा.

ते मुंबईत येणार्‍या उत्तर भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असत. याचा परिणाम म्हणून हळूहळू हिंदी भाषिकांमध्ये त्यांची ओळख होऊ लागली आणि ते लोकप्रिय होऊ लागले. त्यांची नम्रता आणि उत्स्फूर्तपणा लोकांना आकर्षित करायचा.

असे म्हटले जाते की कृपाशंकर सिंह यांच्या जीवनात मोठा बदल झाला जेव्हा त्यांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेतली.

मुंबईतल्या एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कृपाशंकर सिंह यांनी आपल्या भागातल्या उत्तर भारतीयांच्या समस्या न घाबरता इंदिराजींना सांगितल्या. त्यांचा हा निडरपणा आणि जनसेवेची भावना बघून इंदिरा गांधी प्रभावित झाल्या. सोबतच त्यांच्यामागे मुंबईतील उत्तर भारतीय समाज देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचं त्यांना जाणवलं होतं. त्यांनी कृपाशंकर सिंहांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर कृपा शंकर सिंह कॉंग्रेस सेवा दलात सामील झाले. कॉंग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी बराच काळ काम केले.

१९८८ मध्ये त्यांना प्रतिभा पाटील यांनी मुंबई कॉंग्रेसचे सेक्रेटरी केले. १९९४ मध्ये ते आमदार झाले. तेव्हापासूनच कृपाशंकर सिंह यांचे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान राहिले आहे. मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह हे गृहराज्यमंत्री होते.

२००७ आणि २०११ मध्ये ते मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्यांचा राजकीय प्रवासच संपुष्टात आला.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप लागल्यानंतर त्यांना कॉंग्रेसने थोडे बाजूलाच सारले होते. २०१८ मध्ये त्यांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली.

कृपाशंकर सिंह यांच्या राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असं जेव्हा अनुमान काढल जात होत तेव्हा दुसरीकडे कोणतेही पद नसताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या संपर्कात होते. 

याच कारण

कृपाशंकर सिंह उत्तर भारतीयांशी थेट टिपिकल यूपी शैलीत तर दुसरीकडे अस्खलित मराठीही बोलतात. मुंबईतले उत्तर भारतीय हे कॉंग्रेसची कायमची व्होट बँक मानली जात होती. त्याचा मुख्य आधार कृपाशंकर सिंह होते. तत्कालीन काँग्रेसी नेत्यांना मुंबईतली पारंपरिक उत्तर भारतीय मतं मिळवण्यासाठी एक युपीचा चेहरा हवा होता. तो चेहरा त्यांना कृपाशंकर सिंह यांच्यात दिसला.

२०१४ नंतर ही कृपाशंकर सिंह काँग्रेसमध्येच होते.

पण २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने जी भूमिका घेतली त्यावर कृपाशंकर यांनी आक्षेप घेतला होता. त्याचवेळी निषेध म्हणून त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर गेले २० महिने कृपाशंकर हे सक्रिय राजकारणात नव्हते.

या दरम्यान त्यांची भाजपशी मात्र जवळीक वाढली होती.

२०१४ नंतर त्यांची काँग्रेसमधली राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असली तरी मुंबईतल्या या युपी वोट बँकवर अजूनही कृपाशंकर सिंहांचा होल्ड आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादाच्या लाटेत कृपाशंकर कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे ठरु लागले होते.

त्यातूनच भाजपने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत कृपाशंकर यांच्यासाठी पक्षाचे दार खुले केल्याचे बोलले जात आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.