बहुजन समाजाची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी क्षात्र जगद्गुरु पिठाची स्थापना केली..

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मोगलांच्या जुलमी राजवटीपासून मुक्ती प्राप्त करून देणारे पहिले छत्रपती म्हणून शिवप्रभूंचा गौरव केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर काही कालखंड गेल्या वर महाराष्ट्रातील बहुजनांच्या वाट्याला उच्च्वर्णीयांची धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी अली, त्या गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात सामाजिक क्रांतीची पताका महात्मा फुलेंनी फडकावले.

तीच पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातील बहुजनांची सर्वकंष गुलामगिरीतून मुक्तता करणारे राज्यकर्ते म्हणजे

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज

शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच्या प्रयत्नांसाठी त्यांनी मिळेल त्या साधनांचा पुरेपूर वापर केला. वेळप्रसंगी नवे प्रयोग केले. काही रूढी परंपरा बदलण्यासाठी पाऊल उचललं. यातीलच एक महत्वाचं पाऊल म्हणजे क्षात्र जगद्गुरु पिठाची स्थापना.

आद्य शंकराचार्यांनी भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागांत अनुक्रमे जगन्नाथपुरी व द्वारका, तर दक्षिण आणि उत्तर भागांत शृंगेरी व बद्रीनारायण अशा चार मठांची स्थापना केली होती. महाराष्ट्राचा प्रदेश द्वारकेच्या शारदा मठाच्या कक्षेत येतो. करवीर पीठाची स्थापना प्राचीन काळात कोल्हापूरच्या राजाने केली होती.

शंकराचार्यांचे करवीर पीठात संकेश्वर व करवीर असे दोन मठ अस्तित्वात असल्याचे मानले जाते.

करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी आपला वारसा निवडताना कोल्हापूरच्या छत्रपतींशी विचार-विनिमय करून तो वारसा निवडायचा होता. इतकेच नव्हे, तर त्याची निवड झाल्यावर कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्याला मान्यता देणे आवश्यक होते. कोल्हापुरात जेव्हा वेदोक्त प्रकरण घडले, त्या वेळी विद्याशंकरभारती ऊर्फ गुरुस्वामी करवीर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांनी आपला वारस म्हणून काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर यांची निवड केली होती. तेच पुढे विद्यानृसिंहभारती ऊर्फ शिष्यस्वामी म्हणून ओळखले जात होते.

हा वारस निवडताना विद्याशंकरभारती यांनी शाहू छत्रपतींशी सल्लामसलत न करता सांगलीकर पटवर्धन यांच्याशी विचारविनिमय केला. त्यामुळे शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानच्या हद्दीतील मठाची मालमत्ता जप्त केली होती.

शाहू छत्रपतींनी दि. १० जून १९१७ रोजी डॉ.कुर्तकोटी यांची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. डॉ.कुर्तकोटी हे संस्कृतचे गाढे पंडित होते. पीठासनावर आरूढ होताच या नव्या स्वामींनी आपल्या भाषणांतून अनेक सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला. अस्पृश्यतेचा जाहीर निषेध केला. पण, वर्षभराच्या आतच त्यांनी आपले प्रतिगामी स्वरूप प्रकट केले. शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांचे वतन बंद केले. त्या प्रकरणात कूर्तकोटी यांनी कुलकर्ण्यांची बाजू घेऊन छत्रपतींना विरोध केला. त्यांच्यावर टीका सुरू केली.

त्यामुळे छत्रपतींनी एक ठराव करून डॉ.कुर्तकोटी यांची करवीर पीठाच्या शंकराचार्य पदावरून हकालपट्टी केली.

ब्राम्हण धर्मगुरुंच्याकडून बहुजन समाजाची होणारी धार्मिक व आर्थिक पिळवणूक कायमची थांबविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी खूप विचारांती कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या ठिकाणी असणाऱ्या शिव छत्रपतींचे गुरु मौनी महाराज यांच्या गादीवर सत्यशोधक विचारांचा अभ्यासक असणाऱ्या सदाशिव लक्ष्मण पाटील-बेनाडीकर या तरुणाची मराठ्यांचा क्षात्र जगद्गुरु म्हणून नेमणूक केली.

सदाशिवराव बेनाडीकर यांचा जन्म बेनाडी गावच्या वतनदार पाटील घराण्यात झाला होता. बेनाडीकर यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. ते व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगचे विद्यार्थी होते. नंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. संस्कृत व तत्त्वज्ञान या विषयांत ते पारंगत होते.

शाहू महाराजांनी त्यांचे लेख वाचले, ते प्रभावित झाले. त्यांनी हेतुपूर्वक सदाशिवरावांना काही दिवस आपल्या सान्निध्यात ठेवून घेतले. त्या वेळी शाहू महाराजांनी सदाशिवरावांचे धर्मसुधारणेविषयीचे विचार मन:पूर्वक ऐकले. त्यांचे वर्तन लक्षात घेऊन त्यांची नेमणूक पाटगावच्या क्षात्रजगद्गुरुपीठावर करण्याचा शाहू छत्रपतींनी निश्चय केला.

१२ ऑक्टोबर १९२० रोजी ही ऐतिहासिक घटना घडली.

भास्करराव जाधव, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील इत्यादींना शाहू छत्रपतींचे नवे धर्मपीठ निर्माण कर्णयचे हे धोरण मान्य नव्हते. परंतु विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल, बाबुराव मल्हार कांचनकोटी इत्यादींनी शाहू छत्रपतींना यासंबंधी पाठिंबा दिला. विजयी मराठा यांसारख्या समकालीन पत्रकातून त्यांच्या या धोरणाला पाठिंबा देणारा गट प्रभावी होता.

देव आणि भक्त यामधील दलालांना हटवण्याच्या अंतिम साध्यातील हा एक महत्वाचा टप्पा होता.

‘११ नोव्हेंबर १९२० रोजी गुरुवार या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मराठा उपाध्यायांनी वैदिक मंत्राच्या घोषात सदाशिवराव लक्ष्मणराव पाटील यांना सशास्त्र पट्टाभिषेक केला. पाटगावच्या क्षत्रिय जगद्गुरुपीठाची पुनर्स्थापना केली.”

या क्षात्र जगद्गुरुपीठासाठी कोल्हापूर येथे राजेशाही थाटाचा समारंभ झाला. सर्व विधी वेदोक्त पध्दतीने यथासांग उरकल्यानंतर, ”खुद्द शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरुंसमोर जाऊन कंबर वाकवून तीनदा मुजरा केला. इतकेच नव्हे तर दरबारात जमलेल्या यच्चयावत असामींनी तसेच मुजरे करावेत, असे तोंडी फर्मान सोडले.

प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत शाहू छत्रपतींनी आपली या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली होती. क्षात्र जगद्गुरु  यांना लिहिलेल्या दोन पत्रांमध्ये त्यांची हि भूमिका अधिक चांगली समजून येते. ते म्हणतात,

“स्वामींनी देव आणि मानव यांमधील दलाल नष्ट करावयाचा प्रयत्न करायचा आहे. तेच आपले ध्येय असले पाहिजे. इतर स्वामींप्रमाणे आपण वागू नका. देशसेवा आणि जनसेवा हेच आपल्या जीविताचे मुख्य कार्य असले पाहिजे.”

दुसऱ्या एका पत्रात शाहू महाराज लिहितात,

“ब्राह्मण व मराठे अस्पृश्यांना जनावरांसारखे वागवतात. त्यांना ते सन्मानपूर्वक कसे वागवत यासाठी तुम्ही प्रयत्न करावयाचा आहे.”

याखेरीज यापूर्वी स्थापन केलेल्या शिवाजी क्षत्रिय वैदिक शाळेच्या पहिल्याच अहवालात त्यांची हि भूमिका अधिक स्पष्ट होते.

या वैदिक स्कुलमध्ये शिकण्यासाठी संस्थानातून अस्पृश्य विद्यार्थी मिळाले नाहीत, म्हणून शाहू छत्रपती स्वतः दिल्लीमध्ये गेले. तेथे त्यांनी आर्य समाजाशी संपर्क साधून काही अस्पृश्य विद्यार्थी मिळवले व त्या विद्यार्थ्यांना ते मोठ्या आनंदाने कोल्हापुरात घेऊन आले. परंतु दुर्दैवाने ते विद्यार्थी फार काळ कोल्हापुरात रमू शकले नाहीत.

भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण या उभयतांनी प्रकाशित केलेल्या घरचा पुरोहित या पुस्तिकेला त्यांनी आर्थिक मदत केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख स्वतः भास्करराव जाधव करतात. शेवटी शेवटी ते परमेश्वराला प्रार्थना किंवा पूजा याची गरज नसून त्या गोष्टी व्यर्थ आहेत. तर याउलट मानवाची चांगली कृत्ये हीच त्याची पूजा आहे असा विचार शाहू महाराज मांडू लागले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.