अक्षरांचा बादशाह..पण त्यांनी एक ‘पत्र’ जीवापाड जपलं होतं.

महाराष्ट्राची संपन्न रंगभूमी आणि या रंगभूमीचा वर्षा वर नजर टाकली की एका पेक्षा एक गुणी कलाकारांची खाणच दिसून येते…त्यातलाच एक हिरा म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार, छायाचित्रकार कुमार गोखले ! 

अशी कलाकार खरोखरच दुर्मिळ..!

कुमार गोखले हे मूळचे मिरजचे होते पण त्यांची कर्मभूमी हि पुणेच होती. सुरुवातीला ते साधारण नोकरी करत असत मात्र नोकरी करत करत सुलेखनाची आवड जोपासत. सुलेखनात त्यांचा हातखंडाच होता असे म्हणायला हरकत नाही. काही काळ त्यांनी वृत्तपत्राचे सुलेखन केले होते शिवाय फोटोग्राफीची देखील आवड त्यांनी जोपासली होती. बऱ्याच नामवंत नाटय़संस्थांसाठी तसेच मराठी नाटक, चित्रपटासाठी त्यांनी काम केले.

आजच्यासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाच्या काळातही त्यांनी सुलेखनामध्ये अनेक प्रयोग केले.

व्हेंटिलेटर, लाल बाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, लोकमान्य एक युगपुरुष, बकेट लिस्ट अशा अनेक चित्रपटांचे लोगो तसेच त्यांनी काही पुस्तकांचे मुखपृष्ठ देखील बनवले होते.

त्यांनीनाटकाच्या जाहिरातीचं पहिलं कमर्शियल काम केलं ते, अजरामर नाटक ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाच्या जाहिरातींचं. त्यात त्यांनी ‘बोइंग’ विमानाचं रेखाचित्र काढून ठसठशीत अक्षरांत डिझाईन केलं होतं.

दिग्गज मराठी नट चंद्रकांत गोखले यांचा आणि कुमार गोखले यांची मैत्री खूप चांगली होती.  त्यांच्या  मैत्रीपूर्ण नात्याचा एक प्रसंग सांगावासा वाटतो…

चंद्रकांत गोखले म्हणजे भारी माणूस ! चंद्रकांत गोखले विक्रम गोखले यांचे वडील.  मराठी नाटकात त्यांनी सुरुवातीला काही काळ स्त्री भूमिका केल्या व नंतर पुरुष भूमिका करायला सुरुवात केली. रंगभूमीवरील तब्बल पाऊण शतकाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, वि.दा. सावरकर, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर, विष्णुपंत औंधकर, प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, बाळ कोल्हटकर वगैरे लेखकांच्या विविध भूमिकांना आकार दिला होता. अशा भारी माणसासोबत कुमार गोखले यांची मैत्री जुळली. त्याबाबतचा एक असा किस्सा त्यांनी एकदा त्यांच्याच शब्दात व्यक्त केला होता,

हा किस्सा तसा बराच जुना, जुना म्हणजे १९९९ मधला.

कुमार सकाळी सकाळीच कुठल्याशा नाटकाच्या जाहिरातीचं अर्जंट काम करत बसले होते, तेवढ्यात त्यांना खालून खणखणीत आवाजात हाक ऐकू आली… “कुमार, आहेस का घरात?” २-३  मिनिटांत जिन्याच्या पायऱ्या चढून शेजारच्या बिल्डिंगमधे राहणारे चंद्रकांत गोखले (बाबा) हजर झाले.
कुमार यांना घाईघाईत म्हणाले,

“कुमार, एक तातडीचं, महत्त्वाचं काम होतं..! मला कारगिल जवानांच्या मदतीसाठी १००,००० रु. पाठवयचे आहेत, पण १६,००० रु कमी पडताहेत..मला मिळतील का उसने?” त्यावर कुमार यांनी, “माझ्याकडं एवढे पैसे नाहीत, पण संध्याकाळपर्यंत बँकेतून काढून देतो” असं उत्तर दिलं. आणि त्यांनी  सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी बँकेतून १६,००० रु. तयार ठेवले.  संध्याकाळी ४ च्या दरम्यान सुमारास बाबा पुन्हा कुमार यांच्याकडे आले आणि म्हणाले, “मला येणे होते ते ३५०० रु.

आत्ताच एकाकडून मिळाले, तर आता तू मला फक्त १२,५०० रुपयेच दे” असं म्हणत म्हणत त्यांनी, कापडी पिशवीतून एक पिवळा पडलेला, नीट घडी घातलेला कागद माझ्या हातात देत म्हणाले, “हा कागद असू दे तुझ्याकडं..”

कुमार यांनी कुतूहलानं तो कागद पाहिला, तर त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या जुन्या लेटरहेडवर, १६,००० ची रक्कम कुमार यांच्याकडून उसनी घेत असल्याचं आणि ती डिसेंबर १९९९ च्या आत परत करणार असल्याचं त्यांनी ‘लिहून’ दिलं होतं, एवढंच नव्हे, तर, ‘मी जिवंत नसलो, तर माझा मुलगा विक्रम आपले पैसे परत देईल’ असंही लिहिलं होतं. तसेच दोन ‘रेव्हेन्यू स्टँप्स’ लावून, त्यावर सही करून तो ‘कागद’ त्यांच्या परीनं त्यांनी ‘प्रमाणित’ही केला होता..!

कुमार गोखले उत्तरले, “बाबा काय गरज आहे ह्या कागदाची? जमतील तेव्हा द्या पैसे परत. पण मी हा कागद ठेवून घेणार नाही!” त्यावर त्यांनी डोळ्यांत पाणी आणून आर्जवपूर्वक तो ठेवून घ्यायला त्यांनी कुमार यांना भाग पाडलं.

त्याच्या ३-४ दिवसातच चंद्रकांत गोखले पुन्हा कुमार यांच्याकडे आले आणि डिसेंबरचा ‘वायदा’ असताना पिशवीतून पैशांचा गठ्ठा काढत कुमार यांना देत म्हणाले, “अरे.. योगायोग बघ कसा आहे..! कालच मला एका चित्रपटाचं काम आलं आहे, आणि त्यांनी अ‍ॅडव्हान्सही दिलाय.. आता ती चिठ्ठी आण, आणि माझ्यासमोर फाडून टाक..!”

कुमार उत्तरले, “मुळीच फाडून टाकणार नाही..! माझा ठेवा आहे तो..!”

कुमार गोखले यांनी त्याच कागदावर तारीख टाकून आभारपूर्वक पैसे परत मिळाल्याचे लिहिले, आणि तो ‘कागद’ जपून ठेवला..! 

असा होता दोन दिग्गज कलाकारांच्या आयुष्यातला एक हळवा आणि प्रामाणिक प्रसंग. दुर्दैव म्हणजे हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत मात्र त्यांची कलाकारी आणि त्यांची कारकीर्द हे नेहेमीच आपल्या लक्षात राहण्याजोगी आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.