शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर शिवरायांनी मुघलांना लिहिलेलं खरमरीत पत्र

छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण करणारा युगद्रष्टा राष्ट्रपुरुष. शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंविरोधात लढा दिला. काही काही वेळेस तर शिवरायांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती झाली. स्वराज्याची घौडदौड सुसाट सुरू होती.

मराठ्यांनी आता मुघलांशी उघड उघड शत्रुत्व पत्करले होते. त्यांचा एक एक मातब्बर सरदार धुळीस मिळत होता.

अशातच, शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले. सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यात शिवाजी महाराज पन्हाळगडावर स्थानबद्ध झाले. या परिस्थितीचा फायदा घ्यावा, या उद्देशाने शाहिस्तेखान भलीमोठी फौज घेऊन स्वराज्यात घुसला. पुण्यामध्ये असलेल्या ‘लाल महालात’ त्याने आपला तळ ठोकला.

पण सिद्दीच्या वेढ्यातून स्वकर्तृत्वावर बाहेर पडून शिवाजी महाराज राजगडास पोहोचले. तिथे गेल्यावर अवघ्या काही दिवसांनी शाहिस्तेखानावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात शिवरायांनी त्याची बोटे कापली.

शिवरायांनी केलेला हा हल्ला अनपेक्षित होता. प्रचंड भीतीने शाहिस्तेखानाने पुणे सोडले. औरंगजेबाने तर परस्परच त्याची बदली बंगाल प्रांतात केली. हे सगळे होत असताना शिवरायांनी महाराष्ट्रात असणाऱ्या मुघलांच्या सुभेदाराला एक पत्र लिहिले. पत्राची भाषा एवढी कडक होती, की त्या मोगल सुभेदाराच्या तोंडचे पाणीच पळाले.

छत्रपती शिवरायांची फार कमी पत्रे आज अस्तित्वात आहेत. पण त्यांपैकी मुघलांना लिहिलेल्या पत्रांमधून शिवाजी महाराजांच्या करारी बाण्याची झलक आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला कुणाचेही भय नाही, हे त्या पत्रांमधील प्रत्येक ओळ वाचताना आपल्याला जाणवते. पिलाजीराव नीळकंठ मार्फत लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात,

“आज तीन वर्षे झालं बादशाहचे मोठमोठे सल्लागार व योध्ये आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हां सर्वांस माहीतच आहे. बादशाह हुकूम फर्मावतात, ‘शिवाजीचे किल्ले व मुलूख काबीज करा.’ तुम्ही त्यावर जबाब पाठविता, ‘आम्ही लौकरच काबीज करतो.’ आमच्या ह्या कठिण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठिण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला! भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठविण्यास तुम्हास लाज कशी वाटत नाही!

कल्याणी-बिदरचे किल्ले उघड्यावर मैदानात होतें, ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. पर्वताच्या रांगा आहेत. त्या 200 फर्सग लांब व 40 फर्सग रुंद पसरल्या आहेत. नदीनाले उतरून जाण्यास वाट नाहीं. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले आज माझे तयार आहेत. पैकीं काही समुद्रकिनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशहास का कळवत नाही?

अमिरुल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे सारखा खपत होता. ‘शिवाजीचा पाडाव करून लौकरच त्याचा प्रदेश काबीज करितों’ असें बादशाहकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सुर्यास्तासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे. या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कुणीही असो; त्याची इच्छा फलद्रुप होणार नाही.

आपल्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे. आणि तुम्ही कितीही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठविल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीं चुकणार नाही.”

एप्रिल 1663 मध्ये कधीतरी हे पत्र लिहिण्यात आले.

विचार करा, जेव्हा औरंगजेब गादीवर येऊन काही काळ झाला होता, जेव्हा मुघल वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते, जेव्हा दक्षिण आशिया खंडातील सर्वात बलाढ्य बादशाह म्हणून औरंगजेबाचा नावलौकिक झाला होता तेव्हा शिवाजी महाराज मुघलांना उघड उघड धमकी देताना म्हणतात,

‘माझ्या प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा नाचवणे कठिण, मग प्रदेश काबीज करण्याच्या गोष्टी कशाला?’.

एवढेच नव्हे, तर मुघलांचे सरदार खोट्या विजयाच्या बातम्या लिहून औरंगजेबाला कळवत असत. या गोष्टीवर शिवाजी महाराजांनी अक्षरशः ‘खोट्या बातम्या लिहून पाठवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत?’ असे म्हणून अब्रूचे धिंडवडे काढले. औरंगजेबाला आपल्या सरदारांच्या या पराक्रमाची जाणीव नव्हती? नक्कीच होती.

औरंगजेबाला मरेपर्यंत त्याच्या सरदारांनी खोट्या विजयाच्या बातम्या पाठवून मानमरातब मिळवला होता. औरंगजेबाने तो दिला सुद्धा.. का? कारण त्याला आपला एकही सरदार गमवायचा नव्हता. पण शिवरायांनी मात्र कसलीही भिड न बाळगता मुघलांच्या पोकळ संरक्षण यंत्रणेवर जोरदार प्रहरच केला. राष्ट्रसंरक्षण हे आद्यकर्तव्य अशी शिकवण देणारे शिवाजी महाराज आपल्या पत्राच्या शेवटी म्हंटल,

‘माझ्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि आपले कर्तव्य बाजावण्यास कधीं चुकणार नाही..’

मोगल अधिकाऱ्याला लिहिलेले हे पत्र अत्यंत दुर्मिळ आहे. आपल्या पराक्रमावर असलेला विश्वास, देशसंरक्षणाच्या कर्तव्याची जाणीव, शत्रूची कोणतीही भिडभाव न ठेवता उघड उघड दिलेले आव्हान आणि आपल्या प्रदेशावर असलेले नितांत प्रेम.. कितीतरी भावना या वरील ओळींवरून आपल्याला जाणवतात.

‘राष्ट्रप्रथम’ ही शिकवण देणाऱ्या शिवछत्रपतींना मानाचा मुजरा..

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.