त्या एका पत्रामुळे मराठी भाषेला एक नवा शब्द मिळाला, ” महापौर “

महापौर. संपूर्ण शहराचा प्रथम नागरिक. महाराष्ट्रात या शब्दाला देखील मोठा मान आहे. पूर्वी मात्र महापौरांना मेयर म्हणून ओळखलं जायचं. इंग्रजाळलेल्या या शब्दाला अस्सल मराठी रूप कस मिळालं या मागे देखील एक मोठी स्टोरी आहे.

या स्टोरीमागे आहेत गणपत महादेव नलावडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते.

गणपतराव नलावडे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे होती. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून वडील पुढे शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले. त्यांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ते ‘संग्राम’ नावाचे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करीत.

नलावडे यांना धंद्यापेक्षा समाजकार्यात मोठा रस होता. याचमुळे काही वर्षांनी ते साप्ताहिक बंद पडले. हिंदुत्ववादी विचारांच्या नलावडे यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याकडे आकर्षण निर्माण झाले. १९२८ ते १९५४ या काळात गणपतराव आधी पुणे नगरपालिकेचे, आणि १९५० साली महानगरपालिका झाल्यावर तिचे सदस्य बनले. हिंदू महासभा स्थापन झाल्यावर त्याचे कार्य राज्यपातळीवर नेण्यात पुण्याच्या गणपत नलावडे यांचा सिंहाचा वाटा आहे.

१९४२ साली ते नगरपालिकेचे चेअरमन झाले, व कालांतराने पुणे महापालिकेचे मेयर.

पुण्याचा मेयर म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. तेव्हाचा एक प्रसंग सांगितला जातो. असं म्हणतात कि गणपतराव नलावडे यांनी सावरकरांना या विजयाची बातमी पाठवली तेव्हा सावरकरांनी लगेच अभिनंदनाचे पत्र पाठवले नाही.

गणपतरावांना आश्चर्य वाटलं. एके संध्याकाळी ते पुण्याच्या मेयर बंगल्यात अस्वस्थपणे कशाची तरी वाट पाहत होते. अचानक शिपायाने वर्दी दिली. रत्नागिरी हुन कोणीतरी जगताप म्हणून माणूस आला आहे. त्याने एक चिठ्ठी आणली आहे. खुश झालेल्या गणपतराव नलावडे यांनी गडबडीत ती चिठ्ठी फोडून पाहिली.

त्यात लिहिलं होतं,
“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस, सप्रेम नमस्कार. पुण्याची धुरा आता समर्थ हातांत आलीये म्हणायची! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच!
मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे!
उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो. ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो. ते ज्याला ‘टॉकी’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे. ‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल, ‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायूमान’ म्हणता येईल, ‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल. ‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही.
मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — महापौर!”

हे पत्र लिहिलं होत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी.

भाषाशुद्धीची मोहीम हाती घेतलेल्या सावरकरांनी जोपर्यंत मेयरला प्रतीशब्द सापडत नाही तो पर्यंत नलावडे यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले नव्हते. पण याच पत्राने फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा शब्द दिला,

“महापौर”

गणपतराव नलावडे १९६४ साली महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बॅंकेचे ते ४४ वर्षे चेअरमन होते आणि एकूण सहा वेळा बॅंकेचे अध्यक्ष झाले. ते १९५४ ते १९६२ या कालावधीत महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभेचे नेते होते. गांधींची हत्या झाल्यावर गणपतराव नलावडे यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला. गांधीहत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना १९४८मध्ये आणि १९५०मध्ये असा दोन वेळा चारचार महिने तुरुंगवास भोगावा लागला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.