नरेंद्र मोदी अडवाणींची रक्ततुला करणार होते..

आपल्या गल्लीत युवा कार्यकर्ते असतात. नेत्याचा वाढदिवस म्हणजे त्यांच्यासाठी एखादा सण समारंभ असतोय. अगदी उत्साहाचा झरा खळाळत वाहवा अशी त्यांची कंडिशन झालेली असते. अगदी आपल्या नेत्याचे बॅनर लावण्यापासून ते त्याच्या वह्यांची तुला करण्यापर्यंत अनेक गोष्टी चालत असतात.

अशीच गोष्ट एकेकाळच्या उत्साही युवा कार्यकर्त्याची.

त्याच नाव म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी.

साधारण ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे.

गुजरातमध्ये आरएसएसने जोर धरला होता. गावोगावी त्यांचे प्रचारक हिंडत होते. यातच होते नरेंद्र दामोदरदास मोदी. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत होऊन केलेल्या कामामुळे संघाच्या वरिष्ठ वर्तुळात मोदींच नाव पोहचल होत. आपला संसार घरदार सोडून  प्रचारक झालेल्या मोदींना गुजरातच्या सुरत वडोदराबरोबरचं दिल्लीमध्ये देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.

एकदा आरएसएसच्या एका मिटिंगसाठी नरेंद्र मोदी अहमदाबादला आले होते. तेव्हा कोणीतरी त्यांची ओळख एका तरूणाशी करून दिली,

“इनसे मिलीये, ये एबीव्हिपी मै बहुत बढीया काम करते है. बहुत उत्साही कार्यकर्ता है. इनका नाम है अमितभाई शाह”

त्या दिवसापासून अमित भाई शाह हे नाव आयुष्यभरासाठी नरेंद्र मोदींशी जोडलं गेलं. तोवर नरेंद्र मोदी यांना आरएसएस मधून भाजपमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. या दोघं गुरु शिष्याची जोडी गुजरात मध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली.

१९८७ मध्ये नरेंद्र मोदींकडे अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. मोदींनी भाजपा युवा मोर्चाच्या अमित शहा यांच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन जोरदार कॅम्पेनिंग केलं. भाजपाने तिथे सहज विजय मिळवला. याच निवडणुकी दरम्यान या दोन्ही नेत्यांची गाढ मैत्री झाली.

दिवसेंदिवस गुजरात भाजपमध्ये या दोघांच्या नेतृत्वाचा बोलबाला सुरु झाला.

अशातच एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण देशात हिंदुत्वाचं नवीन वारं भरलं. यात गुजरातच्या या जोडगोळीचा देखील खारीचा वाटा होता. ती घटना म्हणजे,

लालकृष्ण अडवाणी यांची रामरथ यात्रा

पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्या येथील विवादित बाबरी मशिदीची कुलपे उघडल्यापासून रामजन्मभूमीचा प्रश्न तापला होता. याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी भाजपच्या पालनपूर शिबिरात प्रमोद महाजन यांनी संपूर्ण देशभरात रामरथ यात्रा काढण्याची योजना सांगितली. वाजपेयींचा याला विरोध होता पण लालकृष्ण अडवाणी या रामरथ यात्रेसाठी तयार झाले.

आधी कन्याकुमारीपासून अयोध्यापर्यंत ही रथयात्रा जाणार होती. पण नंतर प्लॅन बदलून गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून ते अयोध्येपर्यंत राम रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं. मुख्य सारथी होते प्रमोद महाजन. रथयात्रेची आयडिया त्यांचीच होती. त्यांनीच एका गाडीला आलिशान रथात रूपांतर करून रामलल्लाची सुटका करण्यासाठी अडवाणींना त्यात आरूढ केलं होतं.

गुजरातपासून हि रथ यात्रा सुरु होणार होती. मग तिथल्या कार्यकर्त्यांवर सर्वात मोठी जबाबदारी होती. सगळ्यात आघाडीवर होते दोन कार्यकर्ते. नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा.

या दोघांनी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेचं शिवधनुष्य आपल्या हातात घेतलं. त्यांच्या उत्साहाने व मॅनेजमेंट मुळे अडवाणी देखील चकित झाले. विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यात बरंच टॅलेंट लपलेलं आहे हे त्यांना आणि प्रमोद महाजन यांना जाणवलं. फक्त रथ यात्रा नाही तर रामजन्मभूमी आंदोलनाचं वारं जनतेच्या पर्यंत पोहचावे यासाठी देखील दोघे प्रयत्न करत होते. त्यांच्यामुळेच गुजरातमधून अनेक कारसेवक तयार झाले. अयोध्येला जथ्थेच्या जथ्थे कार सेवा करण्यासाठी जाऊ लागले.

अशातच नरेंद्र मोदी यांना एक कल्पना सुचली. लालकृष्ण अडवाणी यांची रक्ततुला करायची.

हि रक्ततुला म्हणजे मोदींनी आयोजित केलेल्या शिबिरात कार्यकर्ते रक्तदान करणार व या रक्ताच्या बाटल्याचे अडवाणींच्या सोबत तुला करून ते दान देण्यात येणार. तस बघायला गेलं तर हि चांगली कल्पना होती. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी याबद्दल नकारात्मकता पसरवली.

अगदी केंद्रीय पातळीपर्यंत हा विषय जाऊन पोहचला. रामजन्म भूमीसाठी रक्त वाहायला देखील आम्ही तयार आहोत असे कार्यकर्ते म्हणत होते याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. आधीच रथयात्रे बद्दल वाद सुरु झाला होता त्यात ही रक्ततुलेची आणखी भर पडली. या रक्ततुला संज्ञेला निरनिराळे अर्थ चिकटले. 

या रक्ततुलेवर राष्ट्रीय पातळीवर टीका होऊ लागली आणि खुद्द लालकृष्ण अडवाणी यांना स्वत: हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी मोदींना समजावून सांगितलं,  ही संभाव्य रक्ततुला रद्द करावी लागली होती. तो कार्यक्रम रद्द झाला मात्र मोदींचा उत्साह कमी झाला नाही. 

मोदींचा हाच उत्साह पाहून अडवाणींनी पुढची लोकसभेची निवडणूक गुजरातमधल्या गांधीनगर येथे लढवायची ठरवली. अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी आकाशपाताळ एक केले आणि लालकृष्ण अडवाणी गांधीनगर मधून उच्चंकी मतांनी निवडून आले.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.