या छोट्याश्या कल्पनेमुळे गावात बिबट्या यायचा बंद झाला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर मधील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. लहान लहान लेकरांचे जीव घेतले आहेत. वन विभागाने प्रयत्न करून पण नरभक्षक बिबट्या हाताला लागलेला नाही.
इतकच काय तर गावकऱयांनी पाच एकर उसाचा फड पेटवला, चार शार्पशूटर लावले… तरीही चकवा देत बिबट्या फरारच. त्यामुळे करमाळा, पाथर्डी या तालुक्यातली लोक रात्रीच सोडा दिवसाच पण घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
आता शेवटी या बिबट्याला मारण्यासाठी बारामतीचे नेमबाज हर्षवर्धन तावरे सोलापुरात आलेत.
पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जिथल्या लोकांनी बिबट्या गावात का येतो, याच कारण शोधलं आणि त्यावर उपाय देखील केला. त्यामुळे बिबट्या गावात येणं पूर्णपणे थांबलं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रानमळा गाव.
हे गाव मागच्या दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलेलं इथल्या वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या ‘रानमळा’ पॅटर्नसाठी.
इथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून गावात कोणाचा जन्म, मृत्यू, विवाह असं काही जरी झालं तरी त्या प्रसंगाची आठवण म्हणून झाड लावायचं. त्या झाडांना नाव पण भारी दिलेली. म्हणजे कस तर जन्माला आलेल्या बाळाच्या नावानं जन्मवृक्ष, लग्न झाल्यावर सासरी जाणाऱ्या मुलीच्या आठवणीसाठी शुभमंगल वृक्ष, माहेरची साडी, मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाला स्मृती वृक्ष अशी काहीशी.
हे कमी म्हणून अजून परीक्षा पास झालं की झाड लावायचं, नोकरी मिळाली की झाड लावायचं. अशा आनंदाच्या क्षणी आनंद वृक्ष,
नुसतं लावून थांबायचं नाही तर संवर्धनाची चळवळ पण जोरात आहे. त्यामुळेच हा ‘रानमळा पॅटर्न’ २ वर्षांपूर्वी नगरविकास आणि ग्रामविकास या दोन्ही मंत्रालयांनी जीआर काढून राज्यात लागू केले आहेत.
रानमळा गावाला आधीच तिन्ही बाजुंनी हिरवगार जंगल. त्यामुळे हळू हळू इथे वन्य प्राण्याच्या अधिवास भरपूर. सोबतच या वृक्ष संवर्धनामुळे गाव आणखी हिरवं झालं. त्यामुळे हे प्राणी हळू हळू गावात शिरायला सुरुवात झाली. बिबट्या देखील गावात दिसू लागला.
जंगल असून देखील तो खाली का येतो? या प्रश्नावर गावाचे माजी सरपंच पी. टी. शिंदे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
बिबट्या जंगल आणि सोबतच ऊसात थांबणारा प्राणी. आमच्याकडे ऊसाच जास्त क्षेत्र नाही पण जंगल मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे बिबट्या खाली येण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी. त्याला खायला अन्न आहे पण प्यायला पाणी नाही, त्यामुळे तो पाणी पिण्यासाठी गावात येत असावा असा अंदाज बांधला.
आणि यावर उपाय म्हणून २० वर्षांपूर्वी गावाबाहेर जंगल सुरु होताना जिथे माणसांचा वावर नसतो अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ५×५ आकाराची टाकी बांधली. दर दोन दिवसांनी जाऊन गावातील विहिरीतील पाणी टँकरच्या साहाय्याने त्या टाकीत भरायच असं सुरु केलं.
यानंतर संध्याकाळच्या वेळी रिता मोर, लांडगे, कोल्हे असे प्राणी पाणी प्यायाला येवू लागले. आणि रात्रीच्या वेळी बिबट्या देखील येवू लागला.
पुढे गावाच्या बाहेर साखळी बंधाऱ्यांच देखील काम करून घेतले. त्यामुळे गावामध्ये येणं पूर्ण थांबलं होत.
पण मागील २ वर्षांपूर्वी पुन्हा बिबट्या गावाकडे दिसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आमच्या गावातील ३ शेतकऱ्यांनी मिळून पुन्हा अशा आणखी २ टाक्या बांधल्या. तेव्हापासून पुन्हा बिबट्याचा गावातील वावर पूर्ण थांबला आहे.
आमच्या शेजारच्या म्हणजे ६००-७०० मीटर वर असलेल्या कडूस गावात मागील ६ महिन्यांपूर्वी बिबट्याने एक गाय मारली होती. पण आमच्या गावात येत नाही हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो , असे ही माहिती शिंदे म्हणाले.
सोबतच मागील २ वर्षांपूर्वी गावातील निलेश शिंदे या युवकाने मोकळे बॅरल दोन भागात कापून त्याचा वापर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी केला. या टाक्या देखील गावाबाहेर काही अंतरावर ठेवून दिल्या, आणि दर दोन दिवसांनी पाण्याच्या टँकरने या सगळ्या टाक्या भरल्या जातात.
पुणे मिररशी बोलताना निलेश शिंदेने सांगितले होते की,
या छोट्याश्या कल्पनेमुळे गावात बिबट्या दिसायचा परत बंद झाला, बिबट्याच काय कोणताही वन्य प्राणी गावाकडे फिरकलेला नाही. गावातील शेतकऱ्यांनी देखील यामुळे प्रेरित होऊन आपल्या शेतात देखील या प्रयोगाचा वापर केला आहे. त्यामुळे रात्री – अपरात्री देखील गावकरी शेतात जात असतात.
त्यामुळे वन्य प्राण्यांना घाबरून न जात ते मनुष्य वस्तीमध्ये कशासाठी येतात या कारणांचा शोध घेतला, त्यावर उपाय केले, नैसर्गिक अधिवासात त्यांना त्यांच्या गोष्टी मिळल्या तर तर नक्कीच मनुष्य वस्तीमधील त्यांचा वावर कमी होऊ शकतो.
हे ही वाच भिडू.
- या विशेष गोष्टीमुळेच प्रकाश आमटे यांना वाघ, बिबट्या, अस्वल पाळण्याचा अधिकार आहे
- पोलीस पाटलांच्या झटापटीत बिबट्या खल्लास !!!
- मोठमोठ्या सोसायट्यांचे जंगल बनलेलं कोथरूड म्हणजे एकेकाळी खरोखरच जंगल होतं
Tumchi Post eka blog ne copy keli aahe hi…
Link :: karmalamadhanews24. com