मोठमोठी आलिशान हॉटेल सोडून सचिन-सलमानही लोणावळ्यात फासे मम्मींकडे जेवायला जातात
लोणावळा,महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ. पावसाळ्यात तर देशभरातून इथं पर्यटक येत असतात. इथल्या निसर्गाची भुरळ जशी सर्वसामान्य नागरिकांना तशीच नेते, अभिनेत्यांना सुद्धा आहे. हे नेते अभिनेते कार्यक्रम, शूटिंगसाठी लोणावळ्यात नेहमी येत असतात.
इथं मोठ-मोठे आलिशान हॉटेल, रेस्टॉरंट आहेत मात्र तरीही हे नेते, अभिनेते लोणावळ्यात आले की, होमली फूड खानावळीतच जेवायला जातात.
त्याचं कारण म्हणजे होमली फूडच्या शैलजा फासे यांच्या हातची जादू.
फासे मम्मी यांचं होमली फूड ही लोणावळ्याची ओळख झाली आहे. इथले घरगुती पद्धतीनं तयार होणारे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ फेमस आहेत.
या खानावळीचा सगळा पसारा सक्षमपणे एकट्या शैलजा फासे सांभाळतात.
शैलजा फासे यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खानावळ सुरु करण्याचा विचार केला होता. त्यावेळी हॉटेल व्यवसायाबद्दल त्यांना कुठलाही अनुभव नव्हता. त्यांच्याकडे लोणावळ्यात ३ रूम आणि १ किचन असणारं एक घर होतं. त्या जागेवर हॉटेल सुरु करण्याचा त्यांचा विचार होता.
मात्र त्यांच्या पतीनं खानावळ सुरु करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शैलजा यांनी आपलं ५० तोळे सोने विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून मिळालेल्या पैशातून शैलजा फासे यांनी लोणावळ्यातल्या इतर हॉटेल चालकांना विचारून खानावळीला लागणाऱ्या वस्तू जमा केल्या. काही वस्तू खरेदी केल्या. तर, न परवडणाऱ्या वस्तू त्यांनी भाड्याने घेतल्या.
शैलजा फासे यांनी १९७५ साली होमली फूड खानावळ सुरु केली.
स्वयंपाक हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे शैलजा यांनी खानावळीसाठी लोणावळ्यातील स्थानिक महिलांना सोबत घेतले. खानावळ सुरु केली तेव्हा त्यांच्याकडे फक्त तीन महिला कामाला होत्या. खानावळ सुरु करण्याची कल्पना शैलजा फासे यांच्या कुटुंबियांना फारशी आवडली नव्हती, पण त्यांनी आपले पाय या व्यवसायात घट्ट रोवले.
शैलजा या मूळच्या कोकणातील होत्या. त्यांच्या जेवणाला एक वेगळी चव होती. खानावळीतील पदार्थ आवडू लागल्याने दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली होती. खानावळीत कामगार कमी पडू लागले होते. मात्र, आता त्यांचे कुटुंबीय मदत करू लागले होते. त्यांची सून आणि नातं त्यांना मदत करत असते.
एवढंच नाही, तर शिवसेना नेते आनंद दिघे हे शैलजा फासेंना बहीण मानत. ते लोणावळ्याला आले की, होमली फूडला भेट द्यायचे. आपल्या सोबत आलेल्या लोकांना किचन दाखवायचे आणि म्हणायचे, “कुठल्या हॉटेलचं किचन एवढं स्वच्छ पाहिलंत का ?” असा प्रश्न विचारायचे. आजही शैलजा फासे जेवणाच्या चवीसाठी आग्रही असतात, त्यापेक्षा जास्त तिथल्या स्वच्छतेबद्दल असतात.
नॉनव्हेज मध्ये सुक्क मटण, मटण मसाला, चिकन मसाला, चिकन ड्राय, कोळंबी करी, सुरमई हे पदार्थ तर व्हेजमध्ये पनीर मटर, भेंडी मसाला, उसळ, वांगं मसाला हे पदार्थ फेमस आहेत.
शैलजा आजही सकाळी ५ तास किचन मध्ये थांबून तयार होणाऱ्या पदार्थांवर लक्ष ठेऊन असतात. काहीही झाली तर पदार्थाची चव आणि दर्जा ढासळू नये याकडे शैलजा यांचे सगळे लक्ष असते. त्यांच्याकडच्या महिला या २०-२० वर्षांपासून तिथं कामाला आहेत.
इथं काम करणाऱ्या महिलांच्या मुलाचे शिक्षण आणि इतर गोष्टींवर शैलजा यांचे लक्ष असते. इथल्या चवी बद्दल जेवढं बोलले जाते, तेवढंच इथल्या स्वच्छतेबद्दल पण काळजी घेतलेली पाहायला मिळते.
किचनमधलं काम संपले की, शैलजा खानावळीत जेवायला बसलेल्या ग्राहकांना वाढायच्या, त्यांच्याशी गप्पा मारायच्या त्यामुळे त्यांना सगळे ग्राहक मम्मी म्हणू लागले होते. आजही त्यांना येणारे सगळे ग्राहक मम्मी म्हणूनच हाक मारत असतात.
ही खानावळ सूरू झाल्यानंतर सगळ्यात आधी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे इथं येऊन गेल्याची आठवण शैलजा फासे सांगतात. लोणावळ्यात येणारे अभिनेते, नेते यांना या खानावळी बद्दल ऐकायला मिळू लागलं होत. त्यामुळे शूटिंग, कार्यक्रमानिमित्त लोणावळ्यात आलं की, ही सगळी मंडळी होमली फूड ला जेवायला यायचे.
यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, अभिनेता सुनील शेट्टी सारख्या दिग्गज लोक यांच्या खानावळीत येऊन गेले आहेत. आजही सलमान खान शूटिंगसाठी लोणावळ्यात आला तर होमली फूड मधूनच डब्बा मागवतो, सलमाननं गेली १२ वर्ष इथलं जेवण मागवायचा शिरता चुकवलेला नाही.
एवढं वाचून तुमची फासे मम्मी यांच्याकडे जेवायला जायची इच्छा झाली असली, तर पत्ता देऊन ठेवतो.. लोणावळ्याला जाण्यापूर्वी अलीकडे एक बाजार लागतो तिथे ही खानावळ आहे. होमली फूड, फासे आळी, महाराज अँड हरी इंटरनॅशनल हॉटेल जवळ. विषय कट.
हे ही वाच भिडू
- जॉर्ज ते जॉनी प्रत्येक सेलिब्रेटी हायवे गोमंतकला जेवायला जातोच
- मटण-चिकन खायचं असेल तर पुण्यातली ही ’10’ हॉटेल्स बेस्ट पर्याय आहेत..
- नागपूरच्या कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी पैज लावून एक डिश बनवली : सावजी मटण
- पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर ; महाराष्ट्रातल्या या आहेत टॉप 10 प्रसिद्ध मिसळ…