खुद्द नेहरूंना देखील लव जिहादची चौकशी करण्यासाठी जावं लागलं होतं… 

लव जिहाद आणि राजकारण, तुम्हाला वाटत असेल या हे संकल्पना आजची आहे. पण भिडूंनो हे काय आज चालू नाही. लव जिहादची भिती दाखवण्याचे उद्योग अगदी १०० वर्षांपासून होत आहेत. फक्त लव जिहाद हा शब्द अलिकडचा म्हणता येईल इतकच. 

जुन्या काळातलं सांगायचं झालं तर नेहरू आणि महात्मा गांधींना देखील हिंदूत्ववादी लोक लव जिहादवरुन अडचणीत आणण्याचे काम करत होते.

तेव्हा या गोष्टीला आंतरधर्मीय लग्न अस म्हणलं जात असे.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी शंभर वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्नासंबधितत चर्चा केलेली आहे. खुद्द महात्मा गांधींच्या सुचनेवरून नेहरूंना सध्याच्या युपीमधील आझमगड इथे जावून चौकशी करण्यास सांगितले होते. 

जवाहरलाल नेहरूंनी हिंदू महासभेचे नेते भाई परमानंद यांना एक पत्र लिहले आहे त्यात ते म्हणतात, 

१९२१ सालातील मे जून महिन्यातील ही गोष्ट आहे.

शौकत अली आणि मी कॉंग्रेसच्या दौऱ्यानिमित्ताने पुर्व उत्तरप्रदेशातील शहरांचा दौरा करत होतो. त्यावेळी एक हिंदू मुलीला पळवून घेवून गेल्याची बातमी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती. आम्हीही त्याच शहराच्या जवळ होतो. तेव्हा गांधींना आम्हाला शक्य असल्यास तिथे जावून घटनेची चौकशी करण्यास सांगितलं होतं.  

नेहरू लिहतात की,

ते गाव मऊच्या जवळपासच होतं. आझमगडहून बलियाला जाताना आमची गाडी मऊ येथे दोन तास थांबली होती. इथून आम्हाला दूसरी गाडी पकडायची होती. त्याच रात्री आम्हाला बलिया येथे एका बैठकीसाठी जायचं होतं म्हणून गावातून एक चक्कर टाकून चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जेव्हा आम्ही मऊत चौकशी केली तेव्हा कळालं संबंधित गाव इथून पाच मैल दूर आहे.

गावाकडे जाण्याची सोय नसल्याने चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या काळात लू होती. उन्हाचे वातावरण असल्याने पाच आणि पाच असे दहा मैलाचे अंतर चालत जाणे अशक्य वाटत होते. माझ्यासोबत असणाऱ्या शौकतअली यांना चालत जाणं किंवा टांग्यातून जाणं अशक्य वाटत असल्याने मीच एक टांगा घेतला व त्या गावात जावून पोहचलो. 

मी त्या गावात गेलो आणि संबधित मुलीची भेट घेतली.

तिच्यासोबत मी गप्पा मारण्यास सुरवात केली. बोलण्यास सुरवात केल्यानंतर तिने सांगितलं तिने आपल्या मर्जीने घर सोडल असून आपल्या राजीखुषीने मुस्लीम मुलासोबत आली आहे. त्याचसोबत तिने इस्लाम देखील कबूल केला होता आणि आत्ता ती परत आपल्या घरी जाण्यास तयार नव्हती.

माझा निकाह झाला आहे आणि मी इथे खूष आहे अशी तिची भूमिका होती. 

तेव्हा मी तिला घरातल्या इतर लोकांपासून वेगळं घेवून सांगितलं की, भ्यायचं काहीही कारण नाही. तुझ्यावर जबरदस्ती होत असेल तर तू सांगू शकतेस. तेव्हा देखील तिने पहिल्याचं गोष्टी पुन्हा सांगितल्या व मी इथेच खुष असल्याचं तीने सांगितलं. 

नेहरूंनी हा उल्लेख केला होता ते पत्र भाई परमानंद यांना २६/११/१९३३ साली लिहलं होतं. या पत्रात त्यांनी १९२१ साली घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला आहे. २४ नोव्हेंबर १९३३ साली भाई परमानंद यांनी नेहरूंना जे पत्र लिहलं होतं, यामध्ये १९२१ साली घडलेल्या आतंरधर्मीय लग्नाचा विषय मांडण्यात आला होता.

यावर उत्तर देताना नेहरूंनी हा प्रसंग मला आठवत असून मी स्वत: गांधींजींच्या सांगण्यावरून तिथे जावून चौकशी केली होती अस सांगितलं आहे. 

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या वर्षी युपीतल्या कानपूर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या आंतरधर्मीय अशा चौदा लग्नांची चौकशी कानपूर पोलीसांनी केली. पण त्यातील एकाही केसमधून लव जिहादसारखा प्रकार उघडकीस आला नाही. 

त्या काळात देखील धार्मिक कट्टरता पसरवण्यासाठी हिंदू मुस्लीम या आंतरधर्मीय लग्नाचा राजकीय वापर करण्यात आला. याचा विस्तृत अहवाल नेहरूंनी गांधींना पाठवला पण थेट वर्तमानपत्रातून या गोष्टीचा उल्लेख करण्याचं त्यांनी टाळलं, धार्मिक गटांना कारण मिळू नये व वातावरण चिघळू नये या दृष्टिकोनातून नेहरूंनी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.