विधानसभा अध्यक्षांच्या चाप्टरपणामुळे भुजबळांची पक्ष फुटी कायद्याने टिकली..

छगन भुजबळ यांना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखलं जायचं. एका भाजी विक्रेत्याचा हा मुलगा, मराठी माणसाच्या प्रश्नावरून बाळासाहेबांकडे ओढला गेला आणि शिवसैनिक झाला.

आक्रमकता पाहून बाळासाहेबांनी त्याला पहिल्या फळीत घेतलं. शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापासून ते अभ्यासू भाषणांनी महापालिका गाजवण्यापर्यंत त्यांचे नाव सर्वत्र पोहचले होते.

१९८५ साली जेव्हा विधानसभा निवडणूक झाल्या तेव्हा शिवसेनेतर्फे निवडून जाणारे ते एकमेव नेते होते. मात्र बाळासाहेबांचा हा एकांडा शिलेदार विधीमंडळात सत्ताधाऱ्यांना पुरून उरायचा. त्यांची आक्रमक शैली त्यांचे स्टंट यांना वर्तमानपत्रात देखील मोठी प्रसिद्धी मिळायची. त्यांना दोन वेळा मार्शल करवी विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं पण भुजबळ एवढे चिवट होते कि त्यांनी आपला आक्रमक बाणा सोडला नाही.

साधारण याच काळात बाळासाहेब ठाकरेंच्या खालोखाल सेनेतील सत्ताकेंद्र म्हणून भुजबळांच नाव घेतलं जात होतं.

१९९० सालच्या विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप पहिल्यांदाच युती झाली. या निवडणुकीच्या प्रचारात भुजबळांचा झंझावात महाराष्ट्र्भर फिरत होता. पक्षाला ग्रामीण भागात नेऊन पोहचवण्यासाठी ते झटत होते. बाळासाहेबांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून ते म्हणतील त्या उमेदवाराला तिकिटे दिली.

पहिल्यांदाच सेना भाजप युतीला दणदणीत यश मिळाले. सत्ता स्थापन करता येईल इतके आमदार जरी निवडून आले नसले तरी एका आमदारापासून थेट ५२ आमदार निवडून येण्यापर्यंत झालेली शिवसेनेची प्रगती दैदिप्यमान होती.

भुजबळांचं नाव शिवसेनेचा चेहरा म्हणून गाजू लागलं. यातूनच त्यांचे पंख छाटण्यास सुरवात झाली.

विधानसभेत जेव्हा विरोधी पक्ष नेता निवडण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांची निवड केली. अशातच मंडल आयोगावरून भुजबळ शिवसेनेवर नाराज आहेत या बातम्या बाहेर  लागल्या. शिवसेनेत भुजबळ हे बाळासाहेबांना आव्हान देत आहेत अशीच चर्चा सुरु झाली.

यातूनच एक दिवस बातमी आली, छगन भुजबळांनी शिवसेना फोडली.

विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरु होते. भुजबळ एका रात्री सेनेच्या १८ आमदारांना घेऊन विधानसभेच्या अध्यक्षांना भेटले. पक्षांतर बंदी कायदा कडक करण्यात आला होता मात्र भुजबळांकडे शिवसेनेचे एक तृतीयांश आमदार असल्यामुळे त्यांना शिवसेना गट ब अशी मान्यता देण्यात आली.

तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांची या पक्ष फुटीला फूस होती असं म्हटलं जात होतं. 

हि बातमी बाहेर पडली तशी अख्ख्या महाराष्ट्रात हाहाकार उडाला. शिवसेनेत पक्ष फोडणे हे कधी झालं नव्हतं. शिवसेनाप्रमुखानी गद्दारीला माफी नाही असं जाहीर वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. भुजबळांना नागपुरात पॉवर हाऊस येथे लपवण्यात आलं.

बाहेर पडताना त्यांना कमांडोच्या प्रोटेक्शन मध्ये आणण्यात आलं. लपत छपत ते विधानसभेत पोहचले मात्र एवढं करून ही फोडलेल्या आमदारांपैकी सहा जणांना शिवसेनेने परत फिरवलं होतं.

विधानसभेत हा पक्षांतराचा प्रश्न उभा राहिला. आता भुजबळांकडे फक्त १२ आमदार होते आणि एकतृतीयांश सदस्यांचा नियम पूर्ण होत नसल्यामुळे त्या बाराही आमदारांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते. भुजबळांना तर वाटलं आपला डाव चुकला, सेने फोडण्याचं धाडस आपली राजकीय आत्महत्या ठरते कि काय अशी शंका त्यांना चाटून गेली.

विधानसभा अध्यक्षांपुढे शिवसेनेने भुजबळांचे पक्षांतर बेकायदेशीर ठरवण्याची मागणी केली. 

तेव्हा विधानसभा अध्यक्ष पदी मधुकरराव चौधरी हे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास ४० वर्ष सक्रिय असणारे चौधरी यांना नियम व त्याच्यातील पळवाटा याच्या सर्व खाचाखोचा माहिती होत्या. ते भुजबळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

त्यांनी सेनेच्या नेत्यांपुढे गणित मांडलं,

“परवा जेव्हा १८ आमदार माझ्यासमोर उभे राहिले, मी त्यांच्या सह्या घेतल्या तेव्हा एक तृतीयांश फुटीवर शिक्कामोर्तब झालं. इथं एक इव्हेन्ट पूर्ण झाला. त्यानंतर शिवसेना ‘ब’ मधले  पुन्हा सहा आमदार फुटले. त्यावेळीही एक तृतीयांश फूट झाली. इथे दुसरा इव्हेन्ट पूर्ण झाला. त्यामुळे सर्व गोष्टी कायदेशीररित्या झालेल्या आहेत.”

विधानसभा अध्यक्षांच्या या चातुर्यापुढे अख्खा विरोध पक्ष अवाक झाला. काही शिवसेनेचे आमदार त्यांच्यावर धावून देखील गेले मात्र काही उपयोग झाला नाही. लगोलग भुजबळांनी काँग्रेस मध्ये आपला गट विलीन करून टाकला.

शिवसेनेने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण मधुकरराव चौधरी यांनी कौशल्यपूर्ण दिलेला पक्षांतराबद्दलचा निर्णय ऐतिहासिक ठरला. तो उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकला. आजही फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर कुठल्याही राज्यात पक्ष फुटल्याचा बातम्या आल्या तर तेव्हा या भुजबळांच्या पक्षपुटीची आणि त्यांनी काढलेल्या पळवाटेची चर्चा हमखास होते हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.