महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं विमान दिल्लीत लँडचं होत नव्हतं…

महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र ज्यांना खऱ्या अर्थाने अतरंगी म्हणता येईल असे मुख्यमंत्री म्हणजे बाबासाहेब भोसले. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं. त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीची वाट बघतात अशी टीका व्हायची. बाबासाहेब भोसलेंच्या कारभाराबद्दल त्याकाळी देखील अनेक टीका व्हायच्या, आजही होतात.

पण बाबासाहेब भोसलेंची विनोदबुद्धी मात्र आजवरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सरस होती. त्यांनी कोणते निर्णय घेतले हे कुणी सांगू शकत नाही पण त्यांचे विनोद मात्र आजही जुने लोक चवीने सांगतात.

ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.

इंदिरा गांधीना अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे.

बाबासाहेब भोसले यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द फक्त एका वर्षाची होती पण या काळात त्यांनी केलेल्या कामापेक्षा त्यांचे किस्से जास्त फेमस आहेत. असाच एक किस्सा जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या “राजधानीतून” या पुस्तकात सांगितला आहे.

बऱ्याचदा भोसले महाराष्ट्र सरकारचं छोटेखानी विमान घेऊन दिल्लीला येत. बऱ्याचदा त्यांचा हा विमान प्रवास पक्ष कार्यासाठी निधी आणण्यासाठी व्हायचा. ही रोख रक्कम घेऊन यायची झाली तर त्या दृष्टीनं सरकारी छोटे विमान त्यांना सुरक्षित वाटायचं असं म्हणतात. गर्दी असते म्हणून इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं प्रवास करायची त्यांना भीती वाटायची. 

त्यांच्या विमान प्रवासाचा एक किस्सा एका सुरक्षा कर्मचाऱ्यानं एकदा अशोक जैन यांना सांगितला होता.

नेहमी प्रमाणे एकदा बाबासाहेब भोसले राज्य सरकारच्या विमानानं दिल्लीला निघाले होते. फायलींच भारा उपसता उपसता त्यांना कंटाळा आला. दिवसभराचा थकवा कमी करायसाठी मुख्यमंत्री महोदयांनी चक्क थोडं मद्य प्राशन करून ताणून दिली. बाबासाहेबांचं विमान खऱ्या अर्थाने ढगात पोहचलं होतं. 

विमान दिल्लीजवळ आलं पण त्यांची मद्यानंदी टाळी लागलेली. त्यांचे अधिकारी व इतर सहकारी बुचकळ्यात पडले. खुद्द मुख्यमंत्री झोपलेत म्हटल्यावर त्यांना कोण उठवणार ? अखेर खुद्द वैमानिक आपल्या केबिनमधून बाहेर आला व त्याने बाबासाहेबांना ‘आता उठा’ असं अदबीनं सुचवलं. 

 इकडे बाबासाहेबांचं विमान वेगळ्याच धुंदीच्या गगनात विहार करत होतं. ते जागृतीच्या धावपट्टीवर यायला जरा वेळच लागला. कसबस ते जागे झाले. या अस्वस्थेत उतरलो तर थेट पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत तक्रार जाणार याची त्यांना खात्री होती. बाबासाहेबांनी वैमानिकाला फर्मान सोडलं,

 “मी जरा तयार होतो. तेव्हा तोवर आकाशातच चकरा मारीत राहा.

वैमानिकाला इलाज नव्हता. त्याने लँडिंगच्या ऐवजी विमानतळावरच आकाशात घिरट्या मारण्यास सुरवात केली. इकडे दिल्लीच्या पालम विमानतळावरच्या कंट्रोल टॉवरला, आपण उतरायची परवानगी देऊनही ते विमान खाली का उतरेना, हे कळत नव्हतं. 

त्यांनी रेडिओ यंत्रावरून वैमानिकाला प्रश्न विचारला पण तो बिचारा तरी खरं कारण त्यांना सांगू शकत नव्हता. महाराष्ट्र राज्याच विमान बराच वेळ घिरट्या घालत राहिलं. जेव्हा बाबासाहेब पूर्णपणे जागे झाले आणि तयार झाले तेव्हाच विमान लँड झाल. 

बाबासाहेब भोसलेंनी कितीही खबरदारी घेतली तरी हा किस्सा दिल्लीकरांपर्यंत पोहचलाच. आजही ही आठवण तिखट मीठ लावून सांगितली जाते.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.