हॉटेलच्या बिलावर १५ सेकंदात लिहलेलं शब्द म्हणजे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या….

काही गाणी हृदयाच्या जवळ असतात. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. असं म्हणतात की,’जेव्हा आपण खुश असतो तेव्हा गाणं आनंदाने ऐकतो, आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा गाण्यांमधला शब्दांचा अर्थ कळतो.’

असंच मराठी मधलं एक हृदयस्पर्शी गाणं म्हणजे ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’. लता मंगेशकरांचा आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि सुरेश भटांचे शब्द. ‘उंबरठा’ सिनेमातलं स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं.

परंतु हे गाणं सहज आकाराला आलं नव्हतं. किंबहुना ‘उंबरठा’ साठी सुद्धा हे गाणं सुरेश भटांनी लिहिलं नव्हतं..

झालं असं की, जयश्री गडकर आणि बाळ धुरी एक सिनेमा बनवत होते. या सिनेमासाठी त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांना संगीतकार म्हणुन बोलावले. हृदयनाथ मंगेशकरांनीच सिनेमासाठी गीतकार निवडावा, असं ठरवण्यात आलं. हृदयनाथ यांनी सुरेश भटांची निवड केली. 

हृदयनाथ आणि सुरेश भटांची घनिष्ट मैत्री. हृदयनाथ मंगेशकरांना सर्व बाळासाहेब म्हणायचे. सुरेश भट नागपुरातुन मुंबईत दाखल झाले. सुरेश भटांना कथा ऐकवण्यात आली. त्यांनी ४-५ गाणी सिनेमासाठी लिहावी अशी सर्वांची अपेक्षा होती. दोन दिवस झाले सुरेश भटांनी एकही गाणं लिहिलं नव्हतं. 

हृदयनाथांनी सुरेश भटांना काय झालं विचारलं. एकत्र असल्यावर सुरेश भट आणि हृदयनाथ मंगेशकर एकमेकांशी हिंदीतुन बोलायचे. सुरेशजी म्हणाले,’कुछ सुंज नही रहा तो मे क्या लिखू.’ दोनाचे चार दिवस झाले. सुरेश भट यांनी चार दिवसात एकही गाणं लिहिलं नव्हतं. जयश्रीताई आता मात्र अस्वस्थ होऊ लागल्या.

कारण सिनेमाचं बजेट आधीच कमी, तसेच सुरेश भट ज्या हाॅटेलमध्ये राहत होते त्याचं बिल वाढत होतं. 

सात दिवस झाल्यावर जयश्रीताईंना राहवलं नाही. त्या हृदयनाथ मंगेशकरांना म्हणाल्या,’मला नको तुमचे भट साहेब. जाऊ दे परत त्यांना नागपुरला.’ बाळासाहेबांकडुन हे ऐकल्यावर सुरेश भट नाराज झाले आणि ते पुन्हा नागपुरला जायला निघाले. जयश्रीताई हाॅटेलचं बिल भरु लागल्यावर सुरेश भट म्हणाले,’तुम्ही नका भरु बिल. माझा मित्र बाळासाहेब बिल भरेल हाॅटेलचं.” 

सुरेश भटांनी टॅक्सी बोलवली. टॅक्सीत बसल्यावर अचानक त्यांनी बाळासाहेबांकडे कागद मागितला. बाळासाहेबांनी हाॅटेलच्या जुन्या बिलचा कागद सुरेश भटांच्या हातात दिला. त्या कागदावर १५ सेकंदात सुरेश भटांनी झरझर शब्द लिहिले. शब्द होते… 

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 

तुझेच मी गीत गात आहे

अजुनही वाटते मला की 

अजुनही चांदरात आहे. 

गाणं वाचल्यावर जयश्री ताई एकदम खुश झाल्या. त्यांनी तिथल्या तिथे १५,००० रुपयांचा चेक तयार करुन सुरेश भटांच्या हातात ठेवला.

पण सुरेश भटांनी चेकचा स्वीकार केला नाही. ‘ये मेरी अमानत है. और मे मेरी अमानत कभी बेचता नही. रखो आप इसे.’ असं सुरेश भट म्हणाले. पुढे जयश्रीताईंचा हा सिनेमा आला नाही. आणि सुरेश भटांचं हे गाणं हृदयनाथ यांच्याकडे राहिले. 

१९८० नंतरची गोष्ट. जब्बार पटेल यांनी ‘उंबरठा’ सिनेमा बनवायला घेतला.

त्यांनी संगीताची जबाबदारी हृदयनाथ मंगेशकरांकडे आणि गाणी लिहिण्याची जबाबदारी सुरेश भटांना दिली. यावेळी हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेशला आधी लिहिलेलं ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गाणं ‘उंबरठा’ सिनेमात वापरण्याची कल्पना सुचवली. सुरेशजींनी सुद्धा याला सहमती दिली. 

गाणं संपुर्ण लिहुन झालं. जब्बार पटेलांना सुद्धा गाणं आवडलं. पण त्यांना एक शब्द खटकत होता. गाण्याचं दुसरं कडवं असं होतं..

कळे न मी पाहते कुणाला

कळे न हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे

कुणीतरी आरशात आहे

यातल्या ‘कुणीतरी’ शब्दावर त्यांनी आक्षेप घेतला. ‘सिनेमाची नायिका विवाहीत स्त्री आहे. त्यामुळे कुणीतरी शब्द नको. गाण्याचा अर्थ बदलतोय’ असं पटेलांनी सुरेश भटांना सांगीतलं. सुरेशजींनी अनेक शब्द वापरले. पण ते नीट जुळत नव्हते. हृदयनाथ मंगेशकरांनी सुद्धा दोन-तीन शब्द सुचवुन बघितले. चाल, सेटअप सर्व तयार होतं पण एका शब्दामुळे गाण्याचं रेकाॅर्डींग थांबलं होतं. 

रेकाॅर्डींग रुममध्ये लतादीदी उपस्थित होत्या. लतादीदींना भेटायला कवयित्री शांता शेळके आल्या. त्यांना सर्व प्रकरण कळाले. त्यांनी संपुर्ण गाणं एकदा ऐकलं. आणि लगेच म्हणाल्या,”अरे काय कठीण आहे यात. ‘कुणीतरी’ ऐवजी ‘तुझे हसू’ हा शब्द वापर”.

शांताबाईंनी सुचवलेला शब्द सर्वांना आवडलाच आणि गाण्याच्या मीटरमध्ये सुद्धा चपखल बसला. 

लतादीदींनी त्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं गायलं. त्यांच्या आवाजाने हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर गेलं. ‘उंबरठा’ मध्ये स्मिता पाटील यांची प्रमुख भुमिका. स्मिता पाटील यांनी गाणं ऐकताच त्या लतादीदींसमोर रडल्या होत्या. 

आजही हे गाणं आणि या गाण्याचे शब्द दर्दी रसिक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. रविन्द्र शर्मा says

    या गाण्या सोबत जर या गाण्या ची ओडिओ किव्हा विडियो क्लिप सोबत ठेवली अस्ति तर बर झाल असत . 🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.