मोदींनी जाहिर केलेल्या क्रॅश कोर्सचं नेमकं स्वरुप कसं असणार समजून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना एका उपक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम म्हणजे १ लाख फ्रंटलाईन वॉरियर्सना तयार करणं.

या उपक्रमाची सुरुवात करताना आज पंतप्रधान मोदी म्हणाले,

कोरोना विषाणू अजूनही आपल्यात आहे आणि त्यामध्ये पुढे बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला अधिक काळजीपूर्वक आणखी आणि तयारी करावी लागेल. या उद्दिष्टाने आज एक लाख फ्रंटलाइन वॉरियर्संना तयार करण्याची मोहिम आजपासून सुरू होत आहे. हे वॉरियर्स पुढच्या तीन महिन्यांमध्ये कामासाठी तयार असतील

आता मोदींच्या या घोषणेनंतर तो उपक्रम काय आहे हे सविस्तर सांगणं आपलं काम आहे. त्यामुळे नेमकं स्वरुप कसं असणार आहे? किती राज्यांमध्ये हा उपक्रम चालणार आहे? यातुन फायदा काय काय होणार आहे हे बघणं महत्वाचं आहे.

नेमकं स्वरुपं कसं असणार आहे?

पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे,

सध्या जे डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य सेवक कोरोनाशी सामना करत आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीसाठी पुढच्या ३ महिन्यात १ लाख प्रशिक्षित तरुणांची फौज उभी करायची आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ तर उपलब्ध होईलचं शिवाय मागच्या दिड वर्षापासून आरोग्य सेवकांवर जो भार आला आहे तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत ट्रेनिंग, स्किल इंडियाचे सर्टिफिकेट, जेवण आणि निवासाची सुविधा सोबतचं स्टायपेंड आणि २ लाख रुपयांचा दुर्घटना विमा अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

हे विशेष प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित युवकांना डीएसस/एसएसडीएम या व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सगळीकडील सार्वजनिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठी आणि हॉस्पिटल्समध्ये मदतनीस म्हणून तैनात करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी एकूण २७३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत एकूण ६ कामांसाठी युवकांना तयार करण्यात येणार आहे. यात होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजेंसी केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट ॲन्ड इमर्जन्सी ॲम्बुलन्स ड्रायव्हर ट्रेनिंग या कामांचा समावेश असणार आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर,

घरी असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी, हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णांची काळजी घेण्यासाठी, कोरोना चाचण्या करण्यासाठी, वैद्यकीय उपकरण हाताळणे आणि वेळ पडली तर ॲम्बुलन्स देखील चालवू शकतील अशा एकूण ६ गोष्टींचे प्रशिक्षण केंद्र सरकार कडून मोफत देण्यात येणार आहे. या सगळ्या योजनेसाठी मोदी सरकारनं एकूण २७३ कोटी रुपयांची तरतुद केली आहे.

२६ राज्यांमध्ये १११ केंद्रावरुन हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानुसार,

कौशल्य विकास योजना ३.० या योजनेअंतर्गत आजपासून शुभारंभ झालेल्या या उपक्रमात एकूण २६ राज्यातील १११ प्रशिक्षण केंद्रांवरुन हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

या संपुर्ण कोर्सला प्रत्येक राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मागणीनुसार देशाच्या टॉप एक्सपर्ट्सनी डिझाईन केलं आहे. यात नव्यांना स्किल तर दिलं जाणार आहे. या सोबतचं ज्यांनी या आधी स्किल घेतलं आहे त्यांच देखील अप-स्किलींग होणार असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

या उपक्रमातुन होणारे फायदे..

या उपक्रमाकडे एकप्रकारे तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून देखील बघितलं जातं आहे. कारण दुसऱ्या लाटेमध्ये तयारी नसल्यामुळे अनेकांचे जीव गेल्याची टिका पंतप्रधान मोदींवर झाली होती. त्यानंतर आता शास्रज्ञांनी आगामी २ महिन्यांमध्ये तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभुमीवर भविष्यातील तयारी सुरु केली असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे.

सोबतचं एक प्रकारे आपदा में अवसर म्हणून देखील या योजनेकडे बघितले जात आहे. त्याला दोन कारण देता येतील. एक तर कोरोना काळात अनेकांच्या हाताचे काम गेल्यामुळे बेरोजगार युवकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे या उपक्रमातुन १ लाख तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होवू शकणार आहे. सोबतचं भविष्यात आरोग्य व्यवस्थेवरचा भार देखील कमी होवू शकणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.